तो दिवस २६ जानेवारी होता. मुंबई-नाशिकचा दूरवर पोहोचलेला सरळसोट तुळतुळीत रस्ता. एका सुरात गाडी तल्लीन होऊन चालली आहे. एखादा लांब उतार किंवा तीव्र चढण घेत गाडी मध्येच दम लागल्यासारखी करू लागते आणि मनात शंकेची पाल चुकचुकते. इतक्यात डिजिटल स्पीडोमीटर अचानक गायब होतं. पुन्हा येतं. पुन्हा जातं. काही अंतर पुन्हा तेच तेच घडत राहतं; मात्र बाइकचा हेतू काही केल्या लक्षात येत नाही. ती आता आपला टॉपवरचा वेग मध्येच सोडून देत व्रुम..व्रुम..भकक..फटफट..करीत अक्षरश: ब्रेक लावल्यासारखी थांबते. थांबते ती थांबतेच. रुसून बसलेल्या या बयेला आता लांब, तीव्र चढण ढकलत न्यावी लागणार. आठ ते नऊ लिटर पेट्रोलने भरलेली गाडी ढकलताना अधिकच जड जाणार या भीतीने पायातलं त्राण निघून गेलेलं असतं. मग ढकलगाडी सुरू होते. आता तुम्ही कुठल्या तीर्थस्थळी जात असाल तर देवाला भेटण्याची इच्छाशक्ती म्हणा वा निर्धार किंवा त्याच्याच मनात आहे म्हणून कुणी तरी हुकमी माणूस तुमच्या मदतीला येतो. ज्या चढणीवर बाइक बंद पडली ती कसाऱ्याजवळ कुठे तरी आहे, असं वर चढून आल्यावर कळतं. हा जो हुकमी मदतगार असतो. त्यालाही बाइकने असाच दगा दिलेला असतो. मग समदु:खी मी त्याला आपलासा वाटू लागतो. तोही गाडीतल्या आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी स्क्रू ड्रायव्हर, पाना घेऊन इंजिनभोवतीचं कव्हर खोलतो आणि जुजबी तपासणी करतो. पण व्यर्थ.
मात्र या दादाकडे शेवटचा पर्याय असतो. तो त्याच्यासोबतच असतो. म्हणजे त्याच्याकडे महिंद्राची पिकअप गाडी असते. तो म्हणतो, भाऊ आता काहीही उपाय शिल्लक नाही. हिला थेट गाडीत टाकू या आणि कसारा गावात घेऊन जाऊ या. तिथं राजू कसारा नावाचा गॅरेजवाला आहे. तो करेल काही तरी हिचं आणि चालू करून देईल. तसं ठरतं. मग आणखी दोघांच्या साथीनं आम्ही पाच जण मिळून हिला पिकअपमध्ये चढवतो. पिकअप पुढे चार किलोमीटरवर असलेल्या कसारा गावाकडे रवाना होते. जुन्या पुलावरून मोठमोठय़ा खड्डय़ांना चुकवत पिकअप कसारा गावात पोहोचते.
राजू कसाराच्या गॅरेजसमोर गाडी पुन्हा पाच जण मिळून खाली उतरवतात. तो या पिकअपवाल्याचा खास दोस्त असतो. म्हणून मग तो हातातलं काम टाकून ‘होंडा युनिकॉर्न वन सिक्टी’चं ऑपरेशन हाती घेतो. दोन-तीन वेळा किक झाडल्यानंतर काही क्षणात तो निष्कर्षांपर्यंत येतो की, गाडीची ‘बॅठेरी डेड’ झालीय. म्हंजी खल्लासच. काय उपेग नाय.. बदलाया लागेल, असं सांगत त्याचं तोच ठरवतो आणि १३०० रुपयांसाठी हात पुढे करतो. वर म्हणतो, ‘ही बॅठेरी सहा मैने तरी दगा देनार न्हाय’.. अडलेला नारायण मी त्याचे आणि त्याने बसवलेल्या कुठल्या तरी कमी प्रसिद्ध कंपनीच्या बॅटरीचे पाय धरतो. बॅटरी बसवली जाते. गाडी सुरू होते. होंडाने बसवलेली ‘एक्साइड’ची मृत बॅटरी माझ्या सॅकमध्ये टाकली जाते आणि गाडी त्र्यंबकेश्वराच्या दिशेने रवाना होते. त्र्यंबकेश्वराचं मनसोक्त दर्शन आणि संकटातून तारल्याबद्दल त्याचे आभार मानून माझी गाडी पुन्हा कल्याणच्या दिशेने धावू लागते. सायंकाळचे साडेसात वाजलेले असतात. मात्र स्पीडोमीटरवर असलेले डिजिटल घडय़ाळ एक तास पुढची वेळ दाखवत असतं. ती वेळ पुन्हा पुन्हा निरखून बघितल्यानंतर मात्र सकाळची भीती अंगात पुन्हा एकदा शहारून जाते.. ही भीती पुन्हा एकदा खरी ठरते. पुन्हा ढकलगाडी सुरू होते. इथेही येणारा-जाणारा विचारत असतो, पण पुढे जात असतो. महामार्गावर विरुद्ध दिशेने कसाऱ्याजवळ भेटला तसा हुकमी मदतगार भेटतो. तो गाडी निरखून बघतो, पण तिला हात लावत नाही. तो म्हणतो, ‘‘इथून किलो दीड किलोमीटर अंतरावर गेल्यास पडघा गाव लागेल. गावच्या बाजारपेठेतच बाइकचा डॉक्टर आहे. म्हणजे ‘एमडी’च. त्याने हात लावला तर तुमची गाडी स्टार्ट होईल. मी पडघ्याच्या दिशेने अक्षरश: धावत सुटतो. बाजारपेठेतील गॅरेजमधला चेतन सुदाम राऊत दुकानाचं शटर खाली खेचण्यासाठी तयारच असतो, रात्रीचे साठेआठ वाजलेले असतात. चेतनचे इतर तीन साहाय्यक मग ‘होंडा युनिकॉर्न वन सिक्स्टी’चं इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. पुढील दहा मिनिटांत काय करायचं याचा ‘फायनल ड्राफ्ट’ तयार केला जातो आणि चेतन जाहीर करतो, ‘‘या गाडीचं दुसरं काहीही बिघडलेलं नाही. फक्त बॅटरीला करंट पुरवणारा चार्जर ‘डेड’ झालाय. तो बदलल्यास गाडी काही सेकंदांत स्टार्ट होईल. मग तुम्हाला डोंबिवलीपर्यंत जाण्यास कोणताही अडथळा येणार नाही.’’ याचं कारणही तो सांगतो की, आज नव्या गाडय़ा या ‘एसी’ म्हणजे ‘अल्टरनेट करंट’वर नाही तर ‘डीसी’ म्हणजेच ‘डायरेक्ट करंटवर चालतात. यालाच सीडीआय (कॅपेसिटर डिस्चार्ज इग्निशन) यंत्रणा म्हणता येईल. छोटय़ा आणि वेगवान गाडय़ांमध्ये ही यंत्रणा बसवलेली असते. कॅपेसिटर डिस्चार्जच्या माध्यमातूनच बाइक स्टार्ट होतात. यालाच ‘बटन स्टार्ट’ म्हणतात. त्यामुळे त्यांना किक स्टार्टची गरज भासत नाही. बॅटरी डाऊन झाली वा ती नीट चार्ज झाली नाही की बाइक स्टार्ट होणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. त्यासाठी काही मिनिटांसाठी तरी बॅटरी चार्ज करण्याची गरज असते’’. चेतन त्याची मोहीम फत्ते करतो. पुन्हा होंडानेच बसवलेली ‘एक्साइड’ बॅटरी लावली जाते आणि गाडी पूर्वीसारखीच ‘मख्खन’ जशी व्रुम..व्रुम.. व्रुम.. अशी घुमू लागते.