पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडी काढून लाँग ड्राइव्हला जाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. बाहेर पडणारा पाऊस, त्या पावसाचा गाडीवर चाललेला अनाहत नाद, वायपरचा ‘सप्.. सप्..’ असा आवाज, आतमध्ये ‘पिया बसंती रे..’सारखं गाणं आणि दोघांच्या गप्पा.. अनेकांच्या प्रेमाच्या संकल्पनेतील ही आयडियल लाँग ड्राइव्ह! पण शनिवार-रविवार या दिवशी रोमँटिक वाटणारा पाऊस आठवडय़ातील इतर दिवशी शिक्षेसारखा भासतो. गाडी सोसायटीबाहेर काढायचीही चोरी आणि नुसती उभी केली तरी पंचाईत! पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडय़ांची विशेष काळजी घ्यावी लागते. मुंबई किंवा कोकणात पडणारा मुसळधार पाऊस असो किंवा पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पडणारा बेताचा पाऊस असो, गाडीच्या एकंदरीत आरोग्यासाठी तो अनेकदा धोकादायक ठरू शकतो. त्यासाठी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यादरम्यानही काही गोष्टी करणं आवश्यक असतं. त्याबाबत मारुती-सुझुकी आणि फियाट क्रिसलर ऑटोमोबाइल्स इंडिया (एफसीए) यांच्या तज्ज्ञांनी दिलेल्या काही खास टीप्स..

गाडीचा बाह्य़भाग

बहुतांश कंपन्यांच्या गाडय़ा मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी तयारच असतात. तरीही गाडीच्या आत पाणी शिरू नये, याची खबरदारी घेण्याची गरज असते. त्यासाठी खिडक्या व दरवाज्यांच्या भोवती असलेले रबर तपासणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे गाडीचा रंग खराब होऊ नये, यासाठी उघडीप असेल तेव्हा व्ॉक्स पॉलिश करून घ्यायला हवं. पावसाचं पाणी थोडय़ा प्रमाणात अ‍ॅसिडिक असल्याने ते गाडीवर जास्त काळ राहू नये, म्हणून व्ॉक्स पॉलिश उपयोगी ठरतं. त्याचप्रमाणे पाणी तुंबलेल्या भागातून गाडी शक्य तो नेऊ नये. तसंच जास्त पाऊस पडल्यावर पाणी तुंबतं, अशा सखल भागांमध्ये गाडी उभी करू नये. सूर्यप्रकाश पोहोचणार नाही अशा दमट जागी गाडी उभी करत जाऊ नये. त्यामुळे आधीच थोडे खराब झालेले भाग जास्त खराब होण्याची शक्यता असते.

एसीचा वापर..

उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही दमट वातावरण असतं. हवेतील आद्र्रता उन्हाळ्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे एसी यंत्रणेचा वापर पावसाळ्यातही जास्त केला जातो. रात्रीच्या वेळी किंवा अगदी जोरात पाऊस पडत असेल तेव्हा गाडीतील डीफ्रॉस्ट हे फंक्शन खूपच उपयोगी पडतं. पण पावसाळ्यात एसीचा उत्तम परिणाम मिळण्यासाठी कण्डेन्सर स्वच्छ असणं आणि एसीचे फिल्टर सुस्थितीत असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी पावसाळ्याआधी गाडीच्या सव्‍‌र्हिसिंगच्या वेळी एसी यंत्रणेचं सव्‍‌र्हिसिंगही महत्त्वाचं आहे.

बॅटरी आणि इतर

पावसाळ्याच्या काळात बॅटरीची स्थिती तपासून घेतलीच पाहिजे. तसंच बॅटरीच्या टर्मिनल्सना पेट्रोलियम जेलीचा एक हात लावून घ्यायला हवा. त्यामुळे तिथे पाणी लागत नाही आणि बॅटरी उडण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे प्रचंड जोरात पाऊस पडत असेल आणि काही अंतरावरचं दिसणंही कठीण असेल, तर गाडीचे हेडलॅम्प आणि फॉग लाइट्स चालू करूनच गाडी चालवणं सुरक्षित आहे. एखाद्या ठिकाणी पाणी साचलं असेल आणि गाडी त्यातून पुढे न्यायची असेल, तर गोंधळून जाऊ नका. गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकून हळूहळू पुढे जा! साचलेल्या पाण्यात गाडी आली की, अजिबात थांबू नका. गाडी थांबवली, तर पाणी टेल पाइपमधून आत शिरून गाडी बंद पडू शकते.

इंजिन आणि तेल

गाडीचं इंजिन म्हणजे गाडीचा आत्मा असतो आणि तो नीट ठेवणं खूप गरजेचं असतं. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात वातावरण थंड आणि अधिक दमट असतं. त्याचा परिणाम इंजिनवर होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी गाडी स्टार्ट करणं आवश्यक असतं. दोन-तीन दिवसांच्या अंतराने गाडी चालू केली, तर ती चालू होण्यास वेळ लागतो. तसंच पाऊस सुरू होण्याआधी किंवा सुरू झाल्यानंतरही एकदा गाडीच्या इंजिनची पूर्ण तपासणी करण्याचीही गरज असते. कंपनीने आखून दिल्याप्रमाणे गाडीतील तेलाचं प्रमाणही पावसाळ्यात सांभाळावं लागतं. तेलाचं प्रमाण पावसाळ्यात तपासून घेणं खूप गरजेचं आहे.

बॉनेट आणि गाडीचा खालचा भाग

आजकाल जवळपास सर्वच गाडय़ांमध्ये गंज लागणारे भाग खूप कमी झाले आहेत. तरी गाडीच्या बॉनेटमधील अनेक भाग आणि मुख्य म्हणजे गाडीची चेसीस यांची काळजी घ्यावी लागते. गाडीचं बाह्य़रूप कितीही चकाचक असलं, तरी अनेकदा गाडीच्या खाली प्रचंड चिखल लागलेला असतो. हा चिखल कडक झाल्यानंतर तो गाडीसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाळ्यात ओल्या रस्त्यावरून गाडी वेगाने चालवताना पाणी आणि चिखलाचे कण हमखास चेसीसपर्यंत पोहोचतात. त्यामुळे गाडी खराब होऊ नये, यासाठी जास्त चिखलाच्या भागातून गाडी चालवल्यानंतर ती खालूनही धुऊन घ्यावी. तसंच पावसाळ्याआधी किंवा गाडी चालणार नसेल अशा दिवशी गाडीच्या चेसीसला अ‍ॅण्टी रस्ट किंवा गंजरोधक सोल्यूशन लावून घ्यावं. तसंच पावसाळ्यादरम्यान एक किंवा दोन वेळा गाडी खालच्या बाजूने धुऊन घ्यावी.

टायरचं काय?

पावसाळा असो किंवा उन्हाळा, गाडीच्या टायरमधील हवेचा दाब नेहमीच तपासून पाहायला हवा. पावसाळ्यात ही काळजी जरा जास्त घ्यावी लागते. त्यासाठी कंपनीने सुचवलेल्या हवेच्या दाबाइतकी हवा आहे का, हे तपासायला हवं. त्याचप्रमाणे वेळोवेळी हा दाब तपासून पाहायला हवा. त्याचप्रमाणे टायरचा विचार करून ओल्या रस्त्यांवर गाडी कमी वेगाने चालवायला हवी. पावसाळी दिवसांमध्ये गाडीचे टायर गुळगुळीत असतील, तर गाडी घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याआधी टायर तपासून घ्यायला हवेत. तसंच चिखलातून गाडी चालवताना अचानक ब्रेक लावणं किंवा अचानक अ‍ॅक्सलरेटर दाबणं, या गोष्टी टाळायला हव्यात. त्यामुळेही गाडी घसरू शकते. टायरमध्ये दिलेल्या भेगांमधील अंतर किमान १.६ मिमी असावं. त्यापेक्षा कमी अंतर असेल, तर तो टायर वापरण्यायोग्य नाही, याची नोंद घेतली पाहिजे.

गाडीचा ब्रेक.. उत्तमच हवा!

ब्रेक कॅलिपर हा गाडीतील अनेक महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तो वेळोवेळी साफ करून घ्यायला हवा. ब्रेक खूप घट्ट किंवा खूप सैल असता कामा नयेत. त्याचप्रमाणे ब्रेक ड्रम्सवर पाणी येत असल्याने ब्रेकची कार्यक्षमता थोडीशी कमी होते, हे लक्षात घ्यायला हवं. त्याचप्रमाणे ब्रेक फ्लुइड लेव्हल, ब्रेक पॅड्स आणि पार्किंग ब्रेक यांचीही तपासणी करून घेतली पाहिजे. ब्रेकमध्ये जरा जरी गडबड वाटली, तर त्वरित जवळच्या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घेणं उत्तम!

rohan.tillu@expressindia.com