कारची किंमत अधिक असेल तर त्याचा खरेदी-विक्री, मागणीवर कसा परिणाम होतो हे आपण गेल्या लेखात पाहिले. वाहन कितीही उत्तम दर्जाचे असले तरी वाढत्या किमती कशा ग्राहक आणि कंपन्यांवर त्या किती अवलंबून असतात हेही आपण पाहिले. वाहनांच्या मागणीतील अपयशामागे केवळ वाढत्या किमतीच कारणीभूत असतात असेही नाही. स्वस्त कारनाही असा फटका बसतो. जगातील सर्वात कमी किमतीच्या कारलाही या संकटातून जावे लागले आहे. मी टाटा मोटर्सच्या नॅनोबद्दल बोलतोय.

नॅनो कार तिच्या निर्मितीपासून ते अगदी काल-परवापर्यंत चर्चेत राहिली आहे. टाटा सन्समधील वेगवान नेतृत्वबदल घडामोडीनंतर तर नॅनोची विपणन-जाहिरात मोहीम चुकली ते नॅनोचे उत्पादन बंद करून कंपनीला तोटय़ातून वाचविता आले असते, अशी जर-तर विधानेही आता प्रसारमाध्यमांचे जुने मथळे झाली आहेत.

नॅनो तिच्याबरोबर वेगवेगळे भावनिक पैलू घेऊन आली होती. नॅनो खरेदी केलेले व न केलेले पण ती हवीशी वाटणाऱ्या प्रत्येकाच्या मनामनांत ती डोकावत होती. अनेक जण तिच्यातील दोष व्यक्त करीत होते तर काही जण तिच्यावरील प्रेम. एक लाख रुपयातील कार असे जेव्हा रतन टाटा म्हणाले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कंपनी या आश्वासनाला टिकून राहील ना, अशीही अनेकांना शंका. पण ‘हम दो हमारे दो’ वाल्यांना लाखांच्या चार चाकीतून भ्रमंती करण्याचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही.

यामागे अनेक कारणे आहेत. नॅनो पहिल्यांदा जेव्हा शोरूममध्ये दाखल झाली तेव्हाच तिची किंमत एक लाख रुपयांच्या वर होती, हे स्पष्ट झाले होते. नॅनो प्रकल्पाला निर्मिती प्रकल्प जागा स्थित्यंतराचाही फटका बसला होता. नॅनो कारला आगी लागण्याचे प्रकारही काही भागात घडले होते. आधीच उत्पादन मागणीला ओहोटी आणि त्यात कारच्या प्रतिमेलाच धक्का बसत होता. कारच्या कमी किमतींमुळे तिच्यात गुणवत्ता नसेल, हा सर्वसाधारण समज मोठय़ा प्रमाणात पसरला. विविध श्रेणीतील नॅनो सादर करताना त्यात तांत्रिक बाबी, अद्ययावता जोडल्या जाऊ लागल्या; पण तुलनेत किंमत फारशी वाढू दिली नाही. असे असूनही खरेदीदारांची संख्या कमी होत गेली.

एक मात्र खरे की, नॅनो कार आतल्या बाजूने खूपच मोकळीढाकळी आहे. जागेबाबत नॅनोच्या इंजिनीअरने खूपच चांगले काम केले आहे. खर्चाची मर्यादा सांभाळताना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा नॅनोचा प्रयत्न तसा यशस्वीच ठरला म्हणायचा. कोणत्याही हॅचबॅक, सेदान कारच्या तुलनेत नॅनोतील जागा ही प्रशस्तच आहे. पाच उंचीने मोठे असणाऱ्या व्यक्तीही अगदी आरामशीर या कारमध्ये बसू शकतात. वाहनांसाठी यापूर्वी न सुचलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव नॅनोमध्ये केला गेला. पण विक्री व मागणीबाबत तिला योग्य ते साधता आले नाही, हे तेवढेच खरे. कदाचित याच्या मुळाशी कमी किंमत हे कारण तर नसेल ना?

pranavsonone@gmail.com