टाटा मोटर्सच्या हेक्झा या नव्या एसयूव्हीची सध्या जोरदार चर्चा आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीला ही गाडी बाजारात दाखल होणार आहे. तत्पूर्वी हेक्झाची ओळख व्हावी, त्यात नेमके काय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, इंजिनाची ताकद काय आहे, ती दिसते कशी, पळते कशी याचा अनुभव घेता यावा यासाठी टाटा मोटर्सतर्फे हैदराबाद येथे नुकताच मीडिया ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. त्याचा हा वृतान्त..

गाडय़ांची आयात करून त्या मिरवण्याचा ट्रेण्ड जेव्हा भारतात चांगलाच रुळला होता, तेव्हा संपूर्ण स्वदेशी बनावटीची कार तयार करण्याचे स्वप्न रतन टाटांनी पाहिले. आणि त्यासाठी जिवाचे रान करून टाटा मोटर्सनी इंडिका या पहिल्यावहिल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या गाडीची निर्मिती केली. इंडिकाची निर्मिती हा त्या वेळी टाटा मोटर्ससाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता..

चारचाकी घेण्याची इच्छा तर आहे, मात्र अवाच्या सवा किमतींमुळे ती घेण्याची ऐपत नाही. त्यामुळे आपली चारचाकीची हौस दुचाकीवरच भागवणाऱ्या निम्नमध्यमवर्गीय कुटुंबाला अवघ्या लाखभर रुपयांत कार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न रतन टाटांनी पाहिले आणि त्याची पूर्तता केली. टाटांच्या नॅनो या गाडीचे काही वर्षांपूर्वी दणक्यात स्वागत झाले. आज नॅनोच्या अनेक मॉडेल्स रस्त्यांवर दिमाखात धावताना दिसतात. नॅनोची निर्मिती हा त्यावेळी टाटांसाठी, म्हणजे टाटा मोटर्ससाठी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता..

.. आणि आताही, लोकांना वेगवान, प्रचंड ताकदीची, संपूर्ण सुरक्षित आणि अद्ययावत सुखसोयींनी युक्त अशी एसयूव्ही (लाइफस्टाइल व्हेइकल) उपलब्ध करून द्यावी, असा ध्यास टाटा मोटर्सनी घेतला आणि हेक्झाच्या रूपाने त्याची पूर्तताही केली. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हेक्झा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला. असंख्य तंत्रज्ञांच्या मेहनतीने, दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, कठोर चाचण्यांमधून तावूनसुलाखून निघाल्यानंतर हेक्झाची निर्मिती करण्यात आली. पुढील वर्षांच्या सुरुवातीला हेक्झा लाँच होणार आहे.

कशी आहे हेक्झा?

हेक्झाचं बारूप अत्यंत आकर्षक आहे. हेक्झाकडे पाहून थोडा वेळ डोळे मिटून अरियाचं स्मरण केलं तर ती क्षणभर अरियाचं प्रतिरूप भासू शकते. मात्र, प्रत्यक्षात तसं नाही. कारण अरियातील फीचर्स आणि हेक्झाचं अंतर्बाह्य रूप यांत फरक आहे, हे हेक्झाचं जवळून निरीक्षण केल्यानंतर जाणवतं. दणकट बोनेट, गाडीच्या पुढच्या बाजूला टाटांचे ठेवणीतले ग्रिल्स आणि त्यापुढे टाटांचे आश्वासक बोधचिन्ह. दोन्ही बाजूला एलईडी हेडलॅम्प्स. हे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स ढगाळ वातावरणात अतिशय उत्तम कामगिरी पार पाडतात. डेटाइम रिनग लॅम्प्सही साथीला आहेतच. मागील बाजूलाही एलईडी प्रोजेक्टर टेललॅम्प्स आहेत. या एलईडी लॅम्प्सचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते जवळून आणि दुरूनही अगदी एकसंध दिसतात. म्हणजे छोटय़ा छोटय़ा एलईडी लाइट्सची माळ या लॅम्प्समध्ये लावलेली आहे, असं दिसत नाही. तब्बल १९ इंची उंचीचे डायमंड कट्स व्हील्स गाडीला राजेशाही थाट देतात. हिचा ग्राऊंड क्लिअरन्सही सर्वोत्तम आहे. हे झालं हेक्झाचं बारूप..

अंतर्गत रचना

हेक्झामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता त्या वेळी खरोखर प्रशस्त वाटतं. तुम्ही जर वाहनचालकाच्या भूमिकेत असाल तर तुम्हीला तुमच्या सोयीनुसार स्टीअिरग अ‍ॅडजस्ट करता येतं. ड्रायिव्हग सीटच्या बाजूला तुम्ही बसणार असाल तर भरपूर लेगस्पेस तिथे उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला हवं तसं सीट अ‍ॅडजस्ट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. मागच्या बाजूला दोन सीट्स आणि त्याच्या मागच्या बाजूला आणखी दोन सीट्स अशी रचना आहे. मधल्या रांगेत आणखी एक सीट, अशीही रचना एका मॉडेलमध्ये देण्यात आली आहे. दुसऱ्या रांगेतील सीट काहीशा लवचीक आहेत. समजा, तुमच्याकडे सामान खूप आहे आणि तुम्ही दोघे-चौघेच प्रवास करीत असाल तर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील सीट्स फोल्ड करून मागची जागा सामानासाठी वापरू शकता. या सुविधेमुळे तब्बल ६७० लिटरचा बूटस्पेस हेक्झामध्ये उपलब्ध झाला आहे.

वातानुकूलन यंत्रणा

हेक्झामधील स्वयंचलित पर्यावरण नियंत्रणप्रणालीमुळे गाडीतील वातावरण नियंत्रित करता येते. प्रत्येक रांगेत वातानुकूलन यंत्रणेचे व्हेंट्स असल्याने अगदी तिसऱ्या रांगेत बसलेल्या प्रवाशालाही वातानुकूलित हवा मिळू शकते. बा वातावरणाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. कपहोल्डर्स आहेत गाडीत. शिवाय दहा स्पीकर्स आणि ट्विटर्सची सुविधा उपलब्ध आहे. गाडीतील सीट्स आरामदायी तर आहेतच, शिवाय त्यांची रचना अशी करण्यात आली आहे की, कित्येक वष्रे त्या न फाटता-तुटता वापरल्या जाऊ शकतात.

मूड लाइट्सची मजा

हेक्झामध्ये मूड लाइट्सची सुविधा देण्यात आली आहे. आठ प्रकारचे हे मूड लाइट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. त्यासाठी पाच इंची इन्फोटेन्मेंट स्क्रीनवर सुविधा देण्यात आली आहे.

सुरक्षेचे उपाय

हेक्झामध्ये फ्रण्ट, साइड आणि कर्टन अशा एकंदर सहा एअरबॅग्ज सुरक्षिततेसाठी देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या प्रदेशात गाडी सुरक्षित चालावी, तिच्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅमही (ईएसपी) बसवण्यात आला आहे हेक्झामध्ये. ईएसपीमुळे ड्रायिव्हग स्टेबिलिटी येते. आणि संकटकाळी किंवा वाहन वेगात असताना अचानक अडथळा समोर आला तर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटू नये यासाठी ही प्रणाली लगेचच कार्यान्वित होते. शिवाय एबीएस आणि ईबीडी या सिस्टीमही आहेत दिमतीला.

गाडी चालवण्याचा अनुभव

मीडिया ड्राइव्हसाठी २० हेक्झा गाडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील दहा ऑटोमॅटिक तर उर्वरित गाडय़ा मॅन्युअल ट्रान्समिशनच्या होत्या. हैदराबाद विमानतळापासून सुमारे ९० किमी अंतरावरील एका रिसॉर्टपर्यंत गाडी न्यायची आणि पुन्हा त्याच मार्गाने परतायचे, असा जवळपास १८० किमी अंतराचा हा स्ट्रेच होता. या मार्गात आठपदरी एक्स्प्रेसवे, नंतर छोटय़ा-छोटय़ा गावांतून जाणारा आंतरराज्य रस्ता आणि शेवटचा टप्पा होता खडबडीत, कच्चा रस्ता. या तीनही प्रकारच्या रस्त्यांवर हेक्झा चालवतानाचा अनुभव चांगला होता. एक्स्प्रेसवेवर तब्बल १४०च्या स्पीडने गाडी चालवता आली. अगदी टॉप स्पीडला नेऊनही गाडी व्हॉबल होणं वगरेचा प्रकार घडला नाही. मॅन्युअल ट्रान्समिशनवर चालणाऱ्या हेक्झाचा पिकअप चांगला वाटला. मॅन्युअलमध्ये सहा गिअर्स आणि एक रिव्हर्स अशी रचना आहे. गिअरशििफ्टगही स्मूद होते. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर गाडीने कुठेही का-कू केले नाही. त्यामुळे हेक्झा चालवण्याचा आनंद लुटता आला. कम्फर्ट, ऑटो, डायनॅमिक आणि रफ रोड असे चार ड्राइव्ह मोड हेक्झामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि अर्थात रस्त्याच्या अवस्थेनुसार यापकी कोणत्याही एका मोडमध्ये गाडी ड्राइव्ह करू शकता. क्रूझ कंट्रोिलगची सुविधाही आहे. तसेच बाहेरील वातावरणानुसार ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन किंवा ऑफ होतात. पावसाचा प्रभाव होऊ नये यासाठी सेव्हन स्पीड असलेले रेन सेिन्सग वायपर्स बसवण्यात आले आहेत. कार अंधारात असताना ती लोकेट करण्यासाठी एक रिमोट की देण्यात आली आहे. दोन्ही बाजूला असलेले आरसे आपोआप अ‍ॅडजस्ट करता येतात.

समोरील काचेमुळे सूर्याच्या किरणांचा तितकासा प्रभाव जाणवत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत यूएसबी चाìजग पॉइंट काढण्यात आले आहेत. याद्वारे स्मार्टफोन जलद चार्ज करता येऊ शकतात. रिव्हर्स पाìकग आणि गायडन्स सिस्टिमही हेक्झामध्ये आहे.

ऑफ रोड ड्रायिव्हग

हेक्झाचा ऑफरोड ड्रायिव्हगचा अनुभवही या मीडिया ड्राइव्हमध्ये घेता आला. तीव्र उतार असो वा तीव्र चढण हेक्झा, अर्थात मॅन्युअल ट्रान्समिशनवाली, तुम्हाला सुरक्षितरीत्या त्यातून पार पाडते. हिल डिसेंट कंट्रोल सिस्टीम हेक्झाच्या काही मॉडेल्समध्ये देण्यात आली आहे.

इंजिन

आधुनिक असे नेक्स-जेन २.२ व्हॅरिकोर ४०० डिझेल इंजिन हे ४०० एनएस टॉर्क आणि १५६ पीएस पॉवरचे आहे. ताकदवान इंजिनामुळे हेक्झा दणकट वाटते. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात ती आरामात चालू शकते आणि प्रवाशाला आश्वस्त करते.

किंमत किती?

हेक्झाची नेमकी किंमत टाटा मोटर्सनी अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र, साधारणत: १५ लाखांपासून हेक्झाची किंमत सुरू होईल, असा अंदाज आहे. या गाडीचे चार ते आठ मॉडेल्स असतील. आणि सर्वच्या सर्व डिझेलवर चालणाऱ्या असतील.

स्मार्टफोन ॅप्लिकेशन

  • हेक्झामध्ये कनेक्टनेक्स्ट म्हणून एक अ‍ॅप्लिकेशन देण्यात आले आहे. त्यात नेव्हीमॅप्स अ‍ॅप्लिकेशन, ज्यूक-कार अ‍ॅप, टाटा स्मार्ट रिमोट अ‍ॅप आणि स्मार्ट मॅन्युअल अ‍ॅप असे अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. नेव्हीमॅपच्या साह्यने तुम्ही ज्या मार्गाने मार्गक्रमण करत असाल तेथील वळणं, हायवे एक्झिट कुठे आहे वगरेचे मार्गदर्शन तुम्हाला गाडी करते. स्मार्ट रिमोट अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही अगदी तिसऱ्या रांगेत बसूनही तुमच्या मोबाइलचा वापर रिमोटसारखा करू शकता आणि त्याच्या साह्यने तुम्हाला हव्या तशा पद्धतीने गाडीतील फंक्शन्स बदलू शकता.
    हेक्झा लाँच झाल्यानंतर सर्व टाटा डिलर्सकडे ती उपलब्ध असेल. हेक्झाच्या लाँचिंगनंतर मागणीनुसार ती उपलब्ध केली जाणार असली तरी प्रीलाँचिंग सुमारे दोन ते तीन हजार हेक्झा सध्या उपलब्ध आहेत. त्यानंतर साधारणत: एका शिफ्टमध्ये १२० हेक्झा तयार होतील.
  • टाटा मोटर्समध्ये सध्या कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात वाद आहेत. मात्र, या वादाचा कोणताही परिणाम हेक्झाच्या निर्मितीवर झालेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून हेक्झाच्या निर्मितीत टाटा मोटर्सचे सर्व कर्मचारी गुंतले आहेत. आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीनही खंडांत हेक्झाची चाचणी घेण्यात आली. तसेच वजा २० अंश सेल्सिअस ते ५० अंश सेल्सिअस अशा अतिशय कठीण वातावरणात ही गाडी चालवून पाहण्यात आली. सुमारे ८० हजार किमी रिनगनंतर हेक्झा लाँचिंगसाठी सुयोग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
  • गाडीचं नामकरण हेक्झाच का करण्यात आलं.. तर या गाडीच्या प्रत्येक बाजूला षटकोनी आकाराचा अँगल आहे. षटकोनी आकाराला इंग्रजीत हेक्झागोनल असं संबोधलं जातं. म्हणून या गाडीला नाव देताना हेक्झा देण्यात आलं आहे.

स्पर्धा कोणाशी?

  • टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
  • मिहद्रा एक्सयूव्ही ५००

vinay.upasani@expressindia.com