News Flash

टॉप गीअर : टुरिंग मोटरसायकल

स्कूटरला स्टेपनी, डिक्की स्पेस असल्याने अनेक वष्रे स्कूटर सर्व प्रकारच्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध होते.

 

आपल्याकडे दुचाकीवरून फिरणे वा लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची अनेक उदाहरणे आहेत. इतके तास, इतक्या दिवसांत कन्याकुमारी ते काश्मीर वा काही देशांच्या सफरी दुचाकीवरून केल्याच्या बातम्याही आपल्या वाचनात आल्या असतील. काहींच्या नावाने विक्रमही आहेत. स्वातंत्र्यानंतर तेही तीन ते दशके उलटल्यानंतर दुचाकीवरून फिरण्यासाठी प्रवास करणारे वाढले. अर्थात, सुरुवातीच्या काळात मोजक्याच लोकांकडे मोटरसायकल होत्या. बहुतेक लोकांकडे स्कूटर हा दुचाकीचा पर्याय उपलब्ध होता. तसेच, स्कूटरला स्टेपनी, डिक्की स्पेस असल्याने अनेक वष्रे स्कूटर सर्व प्रकारच्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध होते. लांब पल्ल्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात (पूर्वी पंक्चर काढून मिळण्याची ठिकाणेही कमी होती.) फिरायला जाणाऱ्यांसाठी स्कूटर म्हणजे सुविधेची साथीदारच होती. हीरोमोटो कॉर्प (तत्कालीन हीरो होंडा)ने भारतात मोटारसायकलचे पाळेमुळे भक्कमपणे रुजवली. तरीही स्कूटरऐवजी मोटरसायकल हे माध्यम फिरण्यासाठी (टुरिंग) २१ वे शतक लागले, कारण १९९८ नंतरच देशात शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकल येऊ लागल्या. त्यानंतर देशातील दुचाकींचे गणितच बदलले आणि एके काळी फिरणाऱ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी स्कूटर काळ्याच्या पडद्याआड कधी गेली हे कळलेच नाही. देशातील तत्कालीन आघाडीच्या स्कूटर उत्पादक कंपनीने स्कूटरचे उत्पादन बंद केले.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक आरामदायी, मायलेज चांगल्या असणाऱ्या मोटरसायकलींमुळे मोटारसायकलच आता टुरिंगचे साधन बनले आहे. अर्थात, जागतिक पातळीवर टुरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या मोटरसायकलचा उदय खूप पूर्वीचा नाही. मात्र, याचे सुरुवातीचे प्रारूप म्हणजे क्रूझर मोटरसायकल. भारतात अजूनही अशा मोटरसायकलला टुरिंग मोटरसायकल म्हणून समजले जाते आणि मार्केटिंगही तसेच करण्यात येते.

प्रत्यक्षात टुरिंग मोटरसायकल ही पूर्णपणे वेगळी आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करताना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार या मोटरसायकलमध्ये केल्याचे डिझाईनवरून दिसते. मोटरसायकल चालविणाऱ्यांना समोरून येणाऱ्या वाऱ्याचा त्रास कमी होण्यासाठी मोठे फेिरग, लांब पल्ला असल्याने मोठा इंधन टँक, मागच्या बाजूला दोन्ही बाजूंना वस्तू ठेवण्यासाठी काढता व परत बसविता येणारी (बऱ्याच मोटरसायकलमध्ये फिक्स केलेली असते) डिक्की (सॅडल बॅग्स), तसेच, मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या पाठीला आराम मिळण्यासाठी बॅक रेस्ट आणि त्यामागेही वस्तू ठेवण्यासाठी डिक्की असते. प्रवासात मोटरसायकल चालविणाऱ्याच्या पायांना पुरेसा आराम मिळण्याच्या हेतूने ब्रेक आणि गिअरची पोझिशन कारमध्ये बसल्यावर पाय पसरता येऊ शकतात, अशी असते. तसेच, फूटरेस्ट मोठे असते. तसेच, हँडलबार उंच, मोठा असतो, यामुळे खाली वाकावे लागत नाही आणि सीटची उंची कमी असल्याने मोटरसायकलवर नियंत्रण ठेवणे अन्य मोटरसायकलच्या तुलनेत सोपे असते. तसेच, हायवेवर प्रवास असल्याने प्रखर स्वरूपाचे हेडलॅम्प, फॉग लॅम्प, डे टाइम रिनग लाइट्स, डिस्कब्रेक्स, हवेचा प्रतिकार कमी होण्यासाठी एरोडायनामिक डिझाईन असते. काही टुरिंग मोटरसायकलमध्ये सॅटेलाइट फोनची सुविधाही देण्यात येते.

टुरिंग मोटरसायकलची सीसी साधारण पंधराशे सीसी, पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक फ्यूएल इंजेक्शन प्रकारचे, हायड्रॉलिक क्लच, पाइव्ह स्पीड (ओव्हरड्राइव्ह आणि इलेक्ट्रिक रिव्हर्स) आणि इग्निशनही कॉम्प्युटर कंट्रोलचे, एबीएस प्रणाली ही या मोटरसायकलची वैशिष्टय़े आहेत. भारतात या मोटरसायकलचे उत्पादन होत नाही. या सीबीयू (कम्प्लिटली बिल्ड युनिट) स्वरूपातच आयात केल्या जातात. या मोटरसायकलची किंमतही यातील फीचरप्रमाणेच आहे. देशात मुंबई, दिल्ली, बंगळुरू या ठिकाणीच अशा मोटरसायकल मिळतात. तसेच, ही मोटरसायकल घेण्यासाठी आगाऊ नोंदणीही करावी लागते. यामाहा, होंडा, हाल्रे डेव्हिडसन, बीएमडब्लू आदींकडून अशा मोटरसायकलचे उत्पादन होते. भारतात होंडा कंपनीची गोल्डिवग, हाल्रे डेव्हिडसनची रोडकिंग उपलब्ध आहे. त्यांच्या किमती सुमारे तीस ते चाळीस लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:04 am

Web Title: touring motorcycle
Next Stories
1 फर्स्ट लूक : हिमालयाच्या कुशीत
2 कोणती कार घेऊ?
3 टॉप गीअर : ऑफ रोड बाइक
Just Now!
X