चार ते सहा सेकंदांत ताशी १०० किमीचा वेग गाठणारी, मोकळ्या रस्त्यावर ताशी १४०-१५० किमी वेगातही रस्ता न सोडणारी, कम्फर्ट सेडानच्या सर्वच व्याख्यांमध्ये अगदी चपखल बसणारी टोयोटाची कोरोला आल्टिस ही गाडी निव्वळ सुसाट आहे..

उत्तम इंजिन क्षमता, भारतातील रस्त्यांचा विचार करून बांधलेली तगडी, तरीही आकर्षक डिझाइन्स, फ्युएल एफिशियण्ट गाडय़ा, ही टोयोटाची ओळख! या कंपनीच्या इटियॉस लिव्हा, इटियॉस क्रॉस या हॅचबॅग गाडय़ांनी, इटियॉससारख्या कॉम्पॅक सेडानने, इनोव्हा किंवा क्वॉॅलिससारख्या एसयूव्ही गाडय़ांनी भारतीय बाजारपेठेची नस ओळखत अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पण अशा गाडय़ांबरोबरच टोयोटा कोरोला आल्टिस या आलिशान सेडाननेही कम्फर्ट सेडानच्या सगळ्या गरजा भागवत उत्तम ड्रायिव्हगची हमी दिली आहे.

फीचर्स
कोणत्याही आरामदायक सेडान किंवा लक्झरी सेडानमध्ये असलेली सर्व फीचर्स या गाडीतही आहेत. पॉवर विण्डो, चाईल्ड लॉक, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम या गोष्टी या गाडीत आहेतच. पण की-लेस एण्ट्री, की-लेस इग्निशन या गोष्टीही गाडीच्या टॉप व्हर्शनमध्ये देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय साइड मिररसाठी ऑटो अ‍ॅडजस्ट फीचरही गाडीत आहे. तसंच गाडीने वेग पकडला की, त्या वेगाचा अंदाज घेऊन गाडीचे दरवाजे आपोआप लॉक होतात. गाडी पार्क करताना पाìकग सेन्सर्सप्रमाणेच गाडीच्या मागील बाजूस बसवलेला कॅमेराही खूप मदत करतो. त्यामुळे गाडी पार्क करताना दुसऱ्या गाडीला, बाजूच्या िभतीला गाडी घासली जाण्याची शक्यता शून्य टक्के उरते.
ही गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या सीटला तर बटण कंट्रोल्स देण्यात आले आहेत. सीट मागे-पुढे घेण्यासाठी, वर-खाली करण्यासाठी किंवा हायड्रॉलिक कुशनसाठी ड्रायव्हरच्या उजव्या हाताला सीटच्या बाजूच्या भागात बटणं देण्यात आली आहेत. त्यांचा वापर करून गाडी चालवता चालवताही सीट आपल्याला हवी तशी करता येते. परिणामी कितीही गाडी चालवली, तरी ड्रायव्हरला थकवा जाणवत नाही. तसंच ड्रायव्हर किंवा त्याच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल, तर त्याची सूचनाही गाडी देते. त्याशिवाय तुमचा मोबाइल ब्लुटूथच्या माध्यमातून गाडीशी कनेक्ट केल्यावर मोबाइलवर येणारे मेसेजेस तुम्ही तुमच्या व्हॉइसने कंट्रोल करू शकता. त्याचप्रमाणे पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर त्या पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेत व्हायपर्स आपोआपच आपलं काम करतात. तसंच या गाडीला ऑटोमॅटिक हेडलाइट्स हे फीचरही देण्यात आलं आहे.
गाडीतील सहा स्पीकर्समुळे गाडीत बसून गाणी ऐकणं हादेखील एक भन्नाट अनुभव आहे. आपला मोबाइल ब्लुटूथने कनेक्ट करण्याशिवाय यूएसबी, ऑक्झिलरी वायर, सीडी प्लेअर, डीव्हीडी वा एमपी-३ प्लेअर यांच्या मदतीनेही तुम्ही गाणी ऐकू शकता. तसंच जीपीएस नॅव्हिगेशन सिस्टीममुळे रस्ता चुकण्याची शक्यताही कमीच असते.

इंजिन आणि ड्रायिव्हगचा अनुभव
या गाडीला टोयोटाने २झेड्आर-एफई, ४ सििलडर, गॅसोलिन प्रकाराचे इंजिन दिले आहे. या इंजिनाची क्षमता १७९८ सीसी एवढी प्रचंड असल्याने हे ताकदवान इंजिन परिपूर्ण ड्राइव्हचा अनुभव देण्यास सक्षम आहे. या इंजिन क्षमतेमुळे गाडी २४० किमी प्रतितास एवढय़ा वेगाने पळू शकते. हा सर्वाधिक वेग असला, तरी गाडी १६०-१७० किमी वेगापर्यंत चालवणे सुखद वाटते. ही गाडी ० ते १०० किमी प्रतितास हा वेग केवळ चार ते सहा सेकंदांत घेऊ शकते.
ही गाडीची वैशिष्टय़े झाली. पण गाडी चालवताना केवळ आरामदायक आणि सुखद व सुस्साट अनुभव, असंच या गाडीचं वर्णन करावं लागेल. ताशी १०० ते १२० किमी एवढा वेग असतानाही एखाद्या वळणावर गाडी आरामात सांभाळता येते. त्याशिवाय ट्रॅफिकमध्येही ऑटो ट्रान्समिशनमुळे गाडी चालवणं खूपच सोपं होतं. गाडीच्या ब्रेकला इनíशया (ब्रेक दाबल्यानंतरही गाडी थोडीशी पुढे जाणे) असल्याने त्याचा फायदा ट्रॅफिकमध्ये होतो. गाडीचं सर्वात आकर्षक आणि ड्रायव्हर्ससाठीचं धम्माल वैशिष्टय़ म्हणजे क्रूझ कंट्रोल. हे फीचर निवडताना समजा तुम्ही गाडी ताशी १०० किमी या वेगावर सेट केलीत, तर एक्सलरेटरवरचा पाय बाजूला काढून तुम्ही मांडी घालून बसलात, तरी गाडी त्याच वेगात पुढे जाते. त्यामुळे मोकळा आणि सरसोट रस्ता असेल, तर ड्रायव्हरचं काम अधिकच सोपं होतं. तसंच ब्रेक दाबल्यानंतर हा क्रूझ कंट्रोल सुटून पुन्हा गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात येते. या आणि अशा अनेक फीचर्समुळे ही गाडी कितीही घ्यावीशी वाटली, तरी ती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत १८.२२ लाखांच्या आसपास आहे. मात्र या गाडीत मॅन्युअल व्हर्शन घ्यायचे झाल्यास गाडीची किंमत १३.५५ लाखांपासून सुरू होते. पण त्यात या सर्व वैशिष्टय़ांचा समावेश नसेल.

गाडीचा लूक
बघताक्षणीच प्रेमात पडावं असा लूक कंपनीने या गाडीला दिला आहे. ४६२० मिमी लांबसडक, १७७५ मिमी रुंद आणि १४७५ मिमी उंचीची ही गाडी आपल्या एकंदरीत दिसण्यानेच लोकांचे लक्ष वेधून घेते. या गाडीची बूट स्पेसही ४७० लिटर एवढी प्रचंड असल्याने गाडीचा मागचा भाग लांबसडक आहे. त्याचप्रमाणे दमदार इंजिन सामावण्यासाठी बॉनेटचा भागही लांब आहे. वेगवान प्रवासासाठी गाडीचा आकारही काहीसा तिरका निमुळता ठेवल्याने गाडी वेगात असताना वारा खूप छान कापत जाते. एखाद्या वाघाने आपले डोळे बारीक करून शिकारीकडे पाहावे, तसे गाडीचे हेडलॅम्प आहेत. हेडलॅम्पच्या या आकारामुळे गाडीला एक वेगळाच डॅिशग लूक येतो. त्याशिवाय गाडीचे बम्पर गाडीच्याच रंगातले असल्याने ते खूप छान दिसतात. दोन्ही बाजूंच्या हेडलॅम्पपासून निमुळत्या आकाराच्या तीन पट्टय़ा मध्यभागी टोयोटाच्या एम्ब्लेमला येऊन मिळतात, त्यामुळे ही गाडी पंख पसरून वेगाचा वेध घेत असल्याचा भास होतो. गाडीचा पाश्र्वभाग आणि टेल लाइट्स यांची रचनाही आकर्षक आणि स्पोर्टी असल्याने गाडीच्या एकूण देखणेपणात भर पडते.

अंतर्गत रचना
कोणत्याही आलिशान सेडानला शोभेल, अशीच या गाडीची अंतर्गत रचना आहे. पुढे दोन सीट्स आणि मागे तीन लोक आरामात बसू शकतील, अशी आसनव्यवस्था यांमुळे या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव विलक्षण असणार, यात वादच नाही. ऑटो ट्रान्समिशन असल्याने गाडीचं गिअर पॅनलही आकर्षक आहे. अंधारात या पॅनलवरील खुणेचे दिवे चमकत असल्याने अंतर्गत रचनेत भरच पडते. त्याशिवाय डॅशबोर्डवर मध्यभागी एलईडी टचस्क्रीन पॅनल दिला आहे. या पॅनलवर मनोरंजनापासून ते नॅव्हिगेशनपर्यंत अनेक गोष्टी एका टचवर उपलब्ध आहेत. मागच्या आसनांसाठी लेगस्पेस हा नेहमीच मोठा जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. पण या गाडीत हा मुद्दा निकालात काढण्यात आला असून मागे बसणाऱ्यांना आरामात बसता येतं. त्याशिवाय मागे फक्त दोनच जण बसणार असतील, तर त्यांच्यासाठी आर्म रेस्टचाही पर्याय दिला आहे. गाडीच्या दारांवर पाण्याची बाटली ठेवण्यासाठीची जागा, ग्लोव्हज् क्लॉजेट अशा अनेक गोष्टींमुळे गाडीची अंतर्गत रचना सुसज्ज आहे.
रोहन टिल्लू rohan.tillu@expressindia.com