कॉम्पॅक सेडान श्रेणीतील किंवा सेडान श्रेणीतील टोयोटाची इटियॉस ही गाडी भारतीयांच्या पसंतीला उतरूनही अनेक वर्षे लोटली. प्रमुख टॅक्सी कंपन्यांबरोबरच काही तारांकित हॉटेलांच्या सेवेत असणाऱ्या या गाडीची प्लॅटिनम आवृत्ती लक्ष वेधून घेणारी  आहे..

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती-सुझुकी, ह्य़ुंदाई, होंडा या मातबर कंपन्यांच्या तोडीचा ब्रँड म्हणजे टोयोटा! टोयोटा क्लालिस, इनोव्हा, नुकतीच आलेली लिव्हा, इटियॉस क्रॉस, कोरोला, कोरोला आल्टिस अशा गाडय़ांनी भारतीय मनाला भुरळ घातली आहे. त्यातीलच एक गाडी म्हणजे टोयोटा इटियॉस! व्यावसायिकदृष्टय़ा गाडी चालवणाऱ्यांची पसंती या गाडीला अधिक असते. त्या मानाने अद्याप ही गाडी लोकांच्या घराघरांमध्ये पोहोचलेली नाही. पण हीच उणीव भरून काढण्यासाठी टोयोटाने इटियॉस गाडीची प्लॅटिनम आवृत्ती आणली आहे. पेट्रोल आणि डिझेल श्रेणीतील ही गाडी भारतीय बाजारपेठेतील सध्याच्या इतर सेडान किंवा कॉम्पॅक सेडान श्रेणीतील गाडय़ांना नक्कीच चांगली टक्कर देऊ  शकेल.

गाडीचे बाह्य़रूप

टोयोटा इटियॉस पाहिलेल्यांना या गाडीच्या बाह्य़रूपातील बदल लगेचच जाणवेल. या गाडीची बांधणी जुन्या इटियॉसच्याच धर्तीवर केली असली, तरी गाडीचे टेल लाइट्स, हेडलाइसट्स, साइड मिरर आणि ग्रिल व बम्परचा काही भाग यांत चांगलाच बदल करण्यात आला आहे. गाडी एका बाजूने बघितली, तर ती कोणत्याही सेडान गाडीसारखीच प्रशस्त असल्याचे लगेच जाणवते. योग्य ठिकाणी गोलाकार डिझाइनमुळे गाडीचा आकार गतिमान आहे. त्यामुळे त्याला एक स्पोर्टी आणि तरीही सेडान लूक येतो. गाडी पुढून बघताना गाडी ‘प्लॅटिनम’ का आहे, हे लक्षात येतं. एरवी गाडीच्याच रंगाच्या बंपरमध्ये या गाडीत बदल करण्यात आला आहे. खालच्या बाजूला काळ्या रंगाचं ग्रिल, दोन्ही बाजूंना छोटे फॉग लाइट्स, बंपरच्या वरच्या बाजूलाही काळ्या रंगाचं ग्रिल यांमुळे गाडीला नक्कीच वेगळा लूक मिळतो. त्याशिवाय गाडीचे हेडलाइट्सही कोणत्याही अंधाऱ्या रस्त्यावर पुरेपूर प्रकाश टाकतील, एवढे तीव्र आणि मोठे आहेत. गाडीचे साइड मिर्स कोणत्याही सेडान गाडीसारखेच असून त्या मिररमध्येही साइड सिग्नल्स दिसण्याची सोय आहे. आता ही सोय काही विशेष राहिली नसली, तरी या गाडीच्या डौलात ती भर टाकते, एवढं नक्की. त्यातही डिझायनर्सनी हे दिवे देताना त्या दिव्यांवर चंदेरी रंगाची एक पट्टी टाकल्याने गाडीचा रंग, चंदेरी रंगाची पट्टी आणि मग हे दिवे, ही गोष्ट आणखी जमून आली आहे.

अंतर्गत रचना

गाडीच्या आतमध्ये जाण्याआधी गाडीच्या बूट स्पेसबद्दल म्हणजेच डिकीतील जागेबद्दल सांगायला हवं. कोणत्याही सेडान गाडीप्रमाणेच या गाडीची डिकीही प्रशस्त आहे. लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी ही गाडी अत्यंत परिपूर्ण आहे. गाडीत एका वेळी दोन ते तीन मोठय़ा आणि तेवढय़ाच लहान बॅगा आरामात राहू शकतात.

ही गाडी पाच जणांसाठी अत्यंत आरामदायक असून चालक आणि त्याच्या बाजूची सीट उत्तमच आहे. फक्त चालकाची सीट पुढे-मागे करण्यासाठीचा सीटखालचा खटका खूपच खालच्या बाजूला आहे. त्यामुळे सीट पुढे घ्यायची असल्यास चालकाला खूप खाली वाकावे लागते. पण सीट पुढे-मागे करण्यासाठीचे लिव्हर वापरण्यास एकदम सुलभ आहे, हेदेखील खरे. चालकाच्या बाजूच्या सीटसमोर डॅशबोर्डमध्ये एक मोठा कप्पा दिला आहे. या कप्प्यात एखादी छोटी बॅग किंवा पाऊच आरामात मावेल, एवढा हा कप्पा मोठा आहे.

गाडीतील मागचे आसनही तीन जणांसाठी ऐसपैस आहे. दोघेच जण असतील, तर मध्ये आर्म रेस्टही देण्यात आले आहे. तसेच मागे बसणाऱ्यांमध्ये जास्त उंचीचे लोक असतील, तरी लेगस्पेसची समस्या जाणवणार नाही. मागच्या आसनावर जाणवणारी एकमेव समस्या म्हणजे एसी कमी लागणे. ही समस्या टोयोटा इटियॉस क्रॉस या गाडीतही प्रकर्षांने जाणवते. या गाडीत चालकाच्या उजवीकडे एक, चालकाच्या समोर डावीकडे दोन आणि चालकाच्या बाजूच्या आसनाच्या डावीकडे एक असे एकूण चार ब्लोअर्स आहेत. मागे बसलेल्यांना एसीची हवा लागण्यासाठी मधले दोन्ही ब्लोअर्स मागच्या दिशेलाच ठेवावे लागतात.

त्याशिवाय गाडीत दिलेला दिवा फक्त पुढल्या बाजूला आहे. मागील बाजूलाही एक दिवा दिल्यास आणखी सोयीचे होईल. गाडीच्या स्टिअरिंग व्हीलवर मीडिया प्लेअरचा आवाज कमी जास्त करण्याचे आणि पुढील किंवा मागील गाणे लावण्याचे कंट्रोल दिले आहेत. त्याच बरोबर ब्लू टूथ कनेक्टिव्हिटी असल्याने आलेला फोन उचलण्याचे आणि कट करण्याचे कंट्रोल देणे आवश्यक होते. पण हे कंट्रोल मीडिया पॅनलवर देऊन मेळ साधला आहे. गाडीचे साइड मिरर ऑटो अ‍ॅडजस्टेबल असून त्यासाठी चालकाच्या उजव्या हाताला डॅशबोर्डवर बटणे दिली आहेत. तसेच सगळे दरवाजे लॉक किंवा अनलॉक करण्याची बटणेही याच मिरर अ‍ॅडजस्टरच्या बाजूला आहेत. गाडीचं इन्फर्मेशन पॅनल म्हणजेच स्पीडोमीटर, फ्युएल इंडिकेटर आदी गोष्टी अत्यंत आकर्षक अशा नव्या स्वरूपात या गाडीत डिझाइन केल्या आहेत. त्यामुळे गाडीच्या केबिन लूकमध्ये नक्कीच चांगली भर पडते.

इंजिन

टोयोटा इटियॉस प्लॅटिनम या गाडीत पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. १.४ लिटर डी-४डी हे डिझेल इंजिन असलेली डिझेल श्रेणीतील टॉप एण्ड टोयोटा इटियॉस प्लॅटिनम चालवण्याचा अनुभव एकदा तरी घेण्यासारखा आहे. गाडीची इंजिन क्षमता १३६४ सीसी एवढी आहे. तसेच इंजिनमध्ये चार सिलिंडर आहेत. त्याचप्रमाणे गाडीमध्ये पाच मॅन्युअल ट्रान्समिशनचे गीअर्स आहेत.

गाडीच किंमत

ही गाडी ६.५४ लाखांपासून ८.९८ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.

अनुभव

कोणत्याही कंपनीची डिझेल गाडी चालवायला घेतल्यानंतर डिझेल इंजिनचा एक परिचित आवाज सातत्याने येत असतो. इटियॉस प्लॅटिनमही या आवाजाला अपवाद नाही. या आवाजामुळे गाडी काहीशी थरथरत असल्यासारखंही वाटतं. पण प्रत्यक्षात गाडी अजिबात थरथरत नाही किंवा रस्ता सोडत नाही. या गाडीची रस्त्यावरील पकड खूपच चांगली आहे. १२० किमीच्या वेगातही गाडी जरादेखील हलत नाही. विशेष म्हणजे गाडीचे वजनही खूप जास्त नाही. त्यामुळे गाडीत बसल्यावर एखाद्या जड गोष्टीत बसल्याचा फीलही येत नाही. डिझेल इंजिन असल्याने गाडी पीक अप घ्यायला वेळ लागतो. पण एकदा वेग घेतल्यानंतर गाडी काही क्षणांतच इतर गाडय़ांना मागे टाकू शकते. खूप खड्डे असलेल्या रस्त्यांवर गाडी चालवली असता मागे बसलेल्या प्रवाशांना फार हादरे बसत नाहीत, यावरून गाडीचे सस्पेन्शन्सही चांगले आहेत, हे स्पष्ट होतं. मायलेजच्या बाबतीतही ४५ लिटर एवढी इंधन क्षमता असलेल्या या गाडीची टाकी पूर्ण भरल्यानंतर ही गाडी साधारण एक हजार किलोमीटर जाऊ  शकते. म्हणजेच गाडी प्रतिलिटर डिझेलमागे किमान २० किमी एवढं मायलेज देते. या श्रेणीत होंडा अमेझ वगळता एवढं चांगलं मायलेज देणारी दुसरी गाडी नाही.

rohan.tillu@expressindia.com