News Flash

टेस्ट ड्राइव्ह : रस्त्यावरील रणगाडा!

रस्त्यावर उतरलेला पाणघोडा किंवा रणगाडा हे वर्णन या गाडीला नक्कीच सार्थ ठरेल.

ती रस्त्यावरून चालते, तेव्हा इतर गाडय़ा तिच्यासमोर कस्पटासमान भासतात.. ती ऑफ-रोड धावतानाही तिच्यासमोर इतर गाडय़ा किरकोळ वाटतात.. ती गाडी नाही, तर रस्त्यावरील संपूर्ण शक्तीचं चालतंबोलतं उदाहरण आहे..

एसयूव्ही श्रेणीतील गाडय़ांचा विषय निघाला की फोर्ड एण्डेव्हर, होंडा सीआरव्ही, टाटा सफारी अशा गाडय़ांबाबत चर्चा होते. मग विषय निघतो टोयोटा फॉच्र्युनर गाडीचा आणि मग इतर गाडय़ांबाबतची चर्चा मागे पडते. २००५च्या सुमारास भारतीय रस्त्यांवर आल्यापासूनच टोयोटा फॉच्र्युनर या गाडीने आपला हा दरारा कायम ठेवला आहे. दणकट लुक्स, प्रचंड शक्ती आणि भन्नाट इंजिनीअिरग या जोरावर फॉच्र्युनरने भारतातील ठरावीक वर्गातील लोकांची पसंती अल्पावधीतच मिळवली आहे. रस्त्यावर उतरलेला पाणघोडा किंवा रणगाडा हे वर्णन या गाडीला नक्कीच सार्थ ठरेल.

पण बदलत्या काळाचा विचार करून आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील सौंदर्यशास्त्र लक्षात घेऊन टोयोटा कंपनीने या एसयूव्ही श्रेणीतील गाडीला थोडय़ाशा स्टायलिश ढंगात सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून ऑल न्यू फॉच्र्युनर टोयोटा जन्माला आली. नुकतीच ही गाडी भारतात लॉन्च झाली असून आधीच्या फॉच्र्युनरपेक्षा ती अनेक बाबतीत वेगळी आहे. फोर व्हील ड्राइव्हमुळे तर ही गाडी या श्रेणीतील इतर गाडय़ांच्या बरीच वरचढ ठरते.

लुक्स

गाडीचा लुक लक्षात घेतला, तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. टोयोटाने ही गाडी बाजारात आणताना ‘ऑल न्यू टोयोटा फॉच्र्युनर’ असा उच्चार करूनच आणली आहे. ही गाडी जुन्या फॉच्र्युनरपेक्षा सर्वार्थाने वेगळी आहे. त्याची सुरुवात गाडीच्या बारंगापासून होते, यात वाद नाही. फॉच्र्युनर म्हटल्यावर कोणालाही पहिलवान किंवा प्रचंड ताकदीचा एखादा मल्ल डोळ्यांसमोर येतो. टोयोटाने ही गाडी नव्याने आणताना स्ट्रेन्थ आणि स्टाइल या दोहोंचा विचार केला आहे. त्यामुळे ही गाडी जुन्या फॉच्र्युनरपेक्षा स्टायलिश आहे, यात शंका नाही. उठावदार बंपर्स, थ्रीडी फील देणारे फॉग लाइट्स्, पूर्वीच्या फॉच्र्युनरच्या तुलनेत स्लिक हेडलाइट्स यामुळे ही गाडी लक्ष वेधून घेते. पूर्वीच्या गाडीच्या तुलनेत ही गाडी उंचीलाही थोडी जास्त आहे. त्यामुळे ग्राउंड क्लीअरन्स चांगला मिळतो आणि त्याचा थेट फायदा ऑफ-रोड ड्रायिव्हगच्या वेळी मिळतो. गाडीच्या पुढे ग्रिलखाली, मागे आणि बाजूला सिल्व्हर लायिनग दिल्याने गाडीला एक वेगळाच उठाव प्राप्त होतो. त्याशिवाय गाडीच्या साइड मिर्स आणि टेल लाइट येथे वेगाने गाडी जाताना हवा कापण्यासाठी दिलेले खास एरो फिन्सही गाडीच्या लुकमध्ये भर टाकतात. गाडीच्या उंचीचा विचार करून गाडीत चढण्यासाठी साइड स्टेप्सही देऊ केल्या आहेत. नवीन इनोव्हामध्ये ही गोष्ट नव्हती. ही गाडी दिसताना काहीशी नवीन इनोव्हा क्रिस्टासारखी दिसते. त्यामुळे ज्यांना जुन्या फॉच्र्युनरचा दणकट लुक आवडतो, त्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर ज्यांना लुक्सची काळजी आहे, ते या गाडीची प्रशंसा करतील.

अंतर्गत रचना

अंतर्गत रचनेच्या बाबतीत आतापर्यंत आलेल्या या श्रेणीतील कोणत्याही एसयूव्हीसमोर ही गाडी नक्कीच सरस ठरते. स्टीअिरग व्हीलवर बसल्या क्षणीच आपण कॉकपिट केबिनमध्ये बसल्यासारखं वाटतं. टोयोटाने स्टीअिरग व्हीलबरोबरच सेंट्रल कंट्रोल, आर्मरेस्ट अशा अनेक ठिकाणी सॉफ्ट लेदरचा वापर केला आहे. सेंट्रल कंट्रोल पॅनलच्या बाजूला असलेलं हे किरमिजी रंगाचं लेदर आणि त्याला दिलेली शिवणीची टिप केबिन लुकला आणखी दिमाखदार बनवते. लेदर सीट्स, मधल्या आणि मागच्या आसनांच्या मध्येही आर्म रेस्ट, यांमुळेही या गाडीच्या स्टाइलमध्ये भर पडते.  विशेष म्हणजे सर्वात शेवटच्या आसनांवर बसलेल्यांनाही विशेष त्रास होत नाही. या गाडीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे चालक पुढील दोन आसनांच्या मध्ये डोक्यावर असलेला केबिन लाइट. एलईडी को-ओíडनेटेड केबिन लाइटमुळे रात्रीच्या वेळी गाडीत हवा तेवढा प्रकाश उपलब्ध होऊ शकतो. त्याशिवाय मागे बसणाऱ्या लोकांसाठी एसी व्हेण्ट्स आणि एसी कंट्रोल सिस्टीमही फायदेशीर ठरते.

फोर व्हील ड्राइव्ह

हे या गाडीचं सर्वात खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल. या गाडीच्या प्रत्येक चाकाला स्वतंत्र पॉवर सप्लाय होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनांनी तयार केलेल्या रणगाडय़ांमध्ये हे वैशिष्टय़ होतं. या रणगाडय़ांची चारही चाके स्वतंत्रपणे काम करायची. साधारणपणे गाडीचं संपूर्ण नियंत्रण पुढील दोन चाकांवर असतं. म्हणजे स्टीअिरग व्हील फिरवल्यानंतर ही दोन चाकं फिरतात. पण या गाडीत असलेला एक नॉब न्युट्रल गिअरवर फिरवला की, या गाडीची चारही चाकं नियंत्रित करता येतात. याचा फायदा ऑफ-रोड ड्रायिव्हगला जास्त होतो. एखाद्या खाचखळग्याच्या रस्त्यावरून जाताना गाडीचं एखादं चाक चिखलात फसतं. टू व्हील ड्राइव्हमध्ये इतर तीनही चाकं गरागरा फिरत राहतात. पण फोर व्हील ड्राइव्ह गाडय़ांमध्ये चिखलात फसलेलं चाक फिरायचं थांबतं, कारण त्याला होणारा पॉवर सप्लाय थांबतो आणि तो इतर तीन चाकांकडे वळतो. त्या वेळी इतर तीन चाकं स्वतंत्रपणे काम करून गाडीला त्या रबरबाटातून बाहेर काढतात. एका चहाच्या मळ्यात गाडीची टेस्ट ड्राइव्ह करीत असताना चिंचोळ्या रस्त्यावर गाडी अडकली. समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीमुळे पुढे-मागे जाण्यास जागा उरली नाही. अशा वेळी गाडी थेट डोंगरावर अक्षरश: ७०-८० अंश कोनांमध्ये चढवून ती वळवण्याची कसरत या गाडीसह सहज शक्य झाली, यातच या गाडीच्या ऑफ-रोड ड्राइव्ह करतानाच्या शक्तीची कल्पना यावी.

इंजिन आणि टॉर्क

गाडी पेट्रोल आणि डिझेल इंजिन अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. डिझेसमध्ये फोर सििलडर २७५५ सीसी एवढी शक्ती हे इंजिन देतं. तर पेट्रोल किंवा गॅसोलिन श्रेणीत फोर सििलडर २६९४ सीसी एवढय़ा शक्तीचं हे इंजिन आहे. डिझेल इंजिनचा टॉर्क या श्रेणीतील कोणत्याही गाडीपेक्षा जास्त म्हणजेच ४२० ते ४५० एनएम @१६००-२४०० आरपीएम एवढा आहे. तर पेट्रोल श्रेणीत हा टॉर्क २४५एनएम @ ४००० आरपीएम आहे. डिझेल श्रेणीतील या प्रचंड टॉर्कमुळे गाडी शून्य ते शंभर हा पल्ला गाठण्यासाठी खूपच कमी वेळ घेते. गाडीतील इको आणि पॉवर हे दोन ड्रायिव्हग मोड्सही परिणामकारक आहेत. पॉवर मोडमध्ये गाडी इंधन जास्त वापरीत असली, तरी त्या वेळी मिळणारा वेग आणि शक्ती अतुलनीय आहे. खासकरून ओव्हरटेक करताना किंवा मोकळ्या रस्त्यावर या पॉवर मोडचा वापर खूपच चांगला आहे.

सुरक्षाव्यवस्था

एवढय़ा शक्तिशाली गाडीमध्ये सुरक्षाव्यवस्था चांगली असणं अपरिहार्य आहे. त्यासाठी गाडीत व्हेइकल सिक्युरिटी कंट्रोल आणि ब्रेक असिस्ट प्रणाली आहे. तसेच गाडी एखाद्या टेकडीवर चढताना किंवा उतरताना लागणारे कंट्रोलही देण्यात आले आहेत. त्याशिवाय सात एअरबॅग्जमुळे गाडीतील प्रवासी सुरक्षित राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे. गाडीत एबीएस प्रणाली असल्याने गचकन ब्रेक लागण्याची शक्यता खूप कमी आहे.

कम्फर्ट

कम्फर्टच्या बाबतीत गाडी टोयोटाच्या कोणत्याही हाय-एण्ड गाडीच्या तोडीचीच आहे. चालकाच्या आसनापासून ते शेवटच्या आसनावर बसणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला या गाडीत आरामदायक वाटावं, अशीच सोय केली आहे. गाडी ऑफ-रोड ड्रायिव्हगचा विचार करून बनवली असल्याने प्रत्येक प्रवाशाला सीट बेल्ट लावता येतील, अशी सोय आहेच. चालकाच्या आसनाचा विचार केला, तर सीट पुढे-मागे करण्यापासून वर-खाली करण्यापर्यंतचे सगळे कंट्रोल चालकाच्या उजव्या हाताला सीटच्या बाजूला दिले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्टीअिरगवर दिलेला त्याचा कंट्रोल यामुळे गाडी चालवताना आलेले फोन उचलण्यापासून एसएमएस वाचण्यापर्यंत सगळ्या गोष्टी चालकाला एका क्लिकद्वारे करता येतात. मधल्या तसेच मागच्या आसनांवर बसणाऱ्यांसाठी उत्तम लेग स्पेस, गाडीची उंची चांगली असल्याने डोके आपटण्याचा कमीत कमी धोका यांमुळे गाडी आरामदायक आहे, यात शंकाच नाही. त्याशिवाय आणखी एक फीचर म्हणजे गाडीची डिकी गाडीत बसल्या बसल्या उघडता येण्याची सोय! जवळपास सर्वच गाडय़ांमध्ये आता डिकीचे लॉक उघडणे आतून शक्य होते. पण या गाडीत मात्र डिकीचा दरवाजा आतून वर किंवा खाली करता येतो. तसेच तो किती उघडायचा, हेदेखील ठरवता येते. साइड मिररचा कंट्रोलही चालकाच्या उजव्या हातालाच असल्याने काचा खाली करून मिरर अ‍ॅडजस्ट करण्याचे कष्ट वाचतात. बाहेरच्या प्रकाशाच्या स्थितीनुसार स्वयंचलित फॉग तसेच हेड लॅम्प्स हे या गाडीचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. तसंच बाहेरच्या तापमानानुसार गाडीतील तापमान अ‍ॅडजस्ट होतं. गाडीच्या ग्लोव्ह बॉक्समध्येही एखाद्या लहान मुलाची बॅग राहील, एवढी जागा आहे.

rohan.tillu@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 12:37 am

Web Title: toyota fortuner
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 न्युट्रल व्ह्य़ू : कमी किमतीतील अपयश
3 टेस्ट ड्राइव्ह : मर्सिडीज.. मेड इन इंडिया
Just Now!
X