टीव्हीएसला व्हिक्टरचे यश मिळाले होते. मात्र, २००६ पर्यंत सुरुवातीस मिळालेला प्रतिसाद काहीसा मंदावला होता. त्याला स्थितीही तशीच होती. कारण, देशातील दुचाकींची बाजारपेठ झपाटय़ाने बदलत होती. ग्राहकांची वाढती क्रयशक्ती, वाढता तरुणवर्ग यांच्यामुळे मोटरसायकल खरेदीचा प्रकारही बदल होता. सीबीझी, पल्सरमुळे १५० सीसी व त्यापेक्षा अधिक सीसीच्या स्पोर्ट्स परफॉर्मन्स मोटरसायकलला मागणी वाढू लागली होती. पारंपरिक म्हणजे कॉम्प्युटर सेगमेंटमधील १०० व ११० सीसीच्या मोटरसायकलच्या मागीचा वेग मंदावत होता.

दीडशे सीसीच्या मोटरसायकलमध्ये वाढणारी मागणी व त्यात असणारी नफ्याची संधी या सेगमेंटमध्ये नसलेल्या सर्वच कंपन्यांना खुणावत होती. टीव्हीएस व सुझुकी एकत्र असताना कंपनीच्या फिएरो या दीडशे सीसी मोटरसायकलला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, काही कारणामुळे दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या. त्यामुळे टीव्हीएसने स्वत मोटरसायकल संशोधन व विकास करून २००१ पासून मोटरसायकलच्या बाजारपेठेत प्रवेश केला. त्यामुळेच कंपनीने २००६ मध्ये अपाचे ही मोटरसायकल लाँच केली. कंपनीने बाजारपेठेतील अन्य कंपन्यांप्रमाणेच अपाचे आरटीआरला १५० सीसीचे इंजिन बसविण्यात आले. ही मोटरसायकल प्रामुख्याने रेसिंगसाठी असल्याचे कंपनीने वारंवार मार्केटिंग केले आहे. तसेच, अपाचेशी जोडला गेलेला आरटीआर या शब्दाचे पूर्ण रूप रेसिंग थ्रोटल रिस्पॉन्स असा आहे.

टीव्हीएसच्या चाहत्यांकडून अपाचे आरटीआर १५० ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच कंपनीने आरटीआर १६० लाँच करताना त्यास १६० सीसीचे १६ बीएचपीचे इंजिन बसविले. हे करताना कंपनीने १५० सीसीचे मॉडेल बंद केले. १६० सीसी हँडिलग, ग्रिपसाठी चांगली असल्याने यास तरुणवर्गाकडून पसंती मिळत होती. कंपनीने हाफ अिरग, डिस्क्र ब्रेक आदी फीचर यामध्ये समाविष्ट केली होती. त्यामुळेच कंपनीने २००९च्या सुमारास फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी असणारी अपाचे आरटीआर १६० लाँच केली. फ्युएल इंजेक्शन हे प्रगत तंत्रज्ञान आहे. (त्यामुळे या मोटरसायकलची किंमतीही वाढते) मात्र, बहुतेक कंपन्यांच्या फ्युएल इंजेक्शनच्या मोटरसायकलना ग्राहकांनी मोठय़ा मनाने स्वीकारलेले नाही. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाच्या मोटरसायकल सुरुवातीस यशस्वी झाल्या नाहीत. पण, टीव्हीएसने ग्राहकांना सातत्याने नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच मोटरसायकलमध्ये पहिल्यांदा पेटल डिस्कब्रेक टीव्हीएसने लाँच केला.

बाजारातील वाढती स्पर्धा, ग्राहकांकडून होत असलेली मागणी हे पाहताना कंपनीने २०११-१२ मध्ये अपाचे आरटीआरचे नवे मॉडेल बाजारात आणले. यास १८० सीसीचे इंजिन बसविण्यात आले होते. यात दोन मॉडेलचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये मागे आणि पुढे डिस्क्रब्रेक असणारे व्हर्जन आणि दुसरे दोन पेटल डिस्कब्रेकसह अँटी ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे एबीएस असणारे व्हर्जन. यासही टीव्हीएसच्या चाहत्यांकडून प्रतिसाद मिळाला. नेकेड स्पोर्टच्या व दोनशे सीसी मोटरसायकलची मागणी देशात वाढत आहे. त्यामुळेच कंपनीने आपल्या अपाचे आरटीआर मोटरसायकलच्या प्रॉडक्ट लाइनमध्ये अपाचे आरटीआर २०० ४व्हीचा समावेश केला आहे.

या मोटरसायकलला दोनशे सीसीचे चार व्हॅल्व्हचे २० बीएचपीचे इंजिन, ऑइल कूल्ड इंजिन बसविण्यात आले आहे. त्यामुळे ही मोटरसायकल ताशी शून्य ते साठ किमी वेग ३.९ सेकंदात, तर ताशी शून्य ते १०० किमी वेग १२.०७ सेकंदात गाठते, असा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात देशातील रस्त्यांची स्थिती, वाहतूक यांचा विचार करता या उपयोग किती, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

रस्त्यावर चांगली ग्रिप मिळण्यासाठी पेरिल टायरचा पर्याय दिला आहे. त्याचप्रमाणे डबल एक्झॉस्टचा सायलेन्स देण्यात आला असून, यामुळे रेसिंग मोटरसायकलसारखा आवाज येतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, रेसिंग मोटरसायकलला ट्विन इंजिन (एक हजार सीसी) असते आणि त्याचा आवजही मोठा असतो. त्यामुळे दोनशे सीसीच्या मोटरसायकलच्या एक्झॉस्टचा किती आवाज येणार हाही प्रश्न आहे. रेसिंग मोटरसायकलचा आभास नक्की मात्र या नव्या एक्झॉस्टमुळे होतो.

प्रीमियम लुक देण्यासाठी पुढील आणि मागील बाजूस एलईडी लॅम्प देण्यात आले आहेत. त्यातही पुढील एलईडी हे मोटरसायकल सुरू करताच सुरू होतात. पुढे टेलिस्कोपिक व मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी डय़ुएल चॅनल असणारी एबीएस प्रणाली आरएलपी कंट्रोलसह देण्यात आली आहे.

अपाचे आरटीआर सीरिज ७३ हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम, शहर, राज्यानुसार फरक) पुढे उपलब्ध आहे. टीव्हीएस मोटरने मोटरसायकलबाबत आपला एक विशिष्ट चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे टीव्हीएसच्या चाहत्यांसाठी नवी अपाचे आरटीआर २०० नक्कीच चांगला पर्याय आहे. १८० सीसीची मोटरसायकल घेणाऱ्यांसाठी व एक ते १.१५ लाख रुपये बजेट असल्यास दोनशे सीसीचा पर्याय चांगला आहे.

अर्थात, प्रत्येक कंपनीच्या या सेगमेंटमधील मोटरसायकलची टेस्ट ड्राइव्ह घेऊन व आपल्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येकाने निर्णय घ्यावा. नेकेड स्पोर्ट्समध्ये कोण बाजी मारते हे येणारा काळ सांगेल. मात्र, टीव्हीएसला अपाचे आरटीआरने मात्र नक्कीच नवी ओळख दिली आहे, यात शंका नाही.

ओंकार भिडे obhide@gmail.com