12 December 2017

News Flash

टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटर टीव्हीएस वेगो

देशातील पहिली बॉडी बॅलन्स स्कूटर, अशी जाहिरातही झाली.

ओंकार भिडे | Updated: August 4, 2017 12:56 AM

टीव्हीएस मोटरच्या स्कूटीने खास महिलांसाठी बनविलेली लाइट वेट गिअरलेस स्कूटर, अशी ओळख निर्माण केली. सुरुवातीस टूस्ट्रोक इंजिन, ऑटोमॅटिक स्टार्ट अशा फीचरने सुरू झालेला प्रवास स्कूटी झेस्ट या शंभर सीसीच्या स्कूटपर्यंत पोचला. आजाही एक दशकाहून स्कूटी हा ब्रॅण्ड भारतातील ऑटोमॅटिक स्कूटरच्या बाजारपेठेत आहे. बदललेली जीवनशैली, तंत्रज्ञानात झालेली सुधारणा यांच्यामुळे टीव्हीएस मोटरनेही एक स्कूटर प्रॉडक्ट मर्यादित न राहता स्कूटरची नवीन मॉडेल बाजारात आणण्यास प्राधान्य दिले. त्याचाच एक भाग म्हणून वेगो ही ऑटोमॅटिक मेटॅलिक स्कूटर काही वर्षांपूर्वी बाजारात लाँच केली. देशातील पहिली बॉडी बॅलन्स स्कूटर, अशी जाहिरातही झाली. प्रामुख्याने महिला ग्राहक डोळ्यासमोर ठेवून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असले तरी ती महिला आणि पुरुष दोन्ही ग्राहक वापरू शकतात, अशी पद्धतीचे फीचर, डिझाइन करण्यात आले आहे. व्हेगोचे पहिले मॉडेल २०१० मध्ये टीव्हीएसने बाजारत आणले आणि त्यानंतर दुसरा मोठा बदल कंपनीने २०१३-१४मध्ये केला. यातील प्रमुख बदल म्हणजे वेगोला डय़ूएल टोन बॉडी देण्यात आली आणि त्यामुळेच ही स्कूटर अन्य ऑटोमॅटिकपेक्षा वेगळी ठरली होती. तसेच, यामध्ये नवा पूर्णत: डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर दिला गेला. ११० सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये असे फीचर पहिल्यांदाचा दिले गेले. यात डिजिटल स्पीडोमीटर, फ्यूएल गॅग, ओडोमीटर, बॅटरी इंडिकेटर आणि सव्‍‌र्हिस रिमाइंडरचा समावेश केला गेला. तसेच, यामध्ये सेन्सर बसविण्यात आले असल्याने स्पीडो मीटर पूर्णत: डिजिटल होण्यास मदत झाली आहे. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत दुसरे मॉडेल अधिक प्रीमियम वाटवे यासाठी टीव्हीएसने खास भर दिला आहे. तसेच, टय़ूब टायरऐवजी टय़ूबलेस टायरचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सुरक्षितेसाठी म्हणजेच तोल सांभाळणे सोपे जाण्यासाठी बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान वापरेले आहे.  बॉडी बॅलन्स तंत्रज्ञानसाठी उत्तम प्रकारचे डिझाइन आवश्यक असते. स्कूटरचे इंजिन बसविण्यासाठी विशिष्ट रचना केली असल्याने गाडी अधिकाधिक कशी समतोल राहते, असे कंपनीचे म्हणणे आहे. बॉडी बॅलन्स तंत्रज्ञानामुळे स्कूटर चालविताना स्थैर्यता मिळते आणि त्यामुळे गाडी हातळणे सोपे होण्यास मदत होते. याच्या जोडीला एसबीएस तंत्रज्ञान ही ब्रेकिंग प्रणाली यात आहे. या तंत्रज्ञानामुळे गाडी चालविणाऱ्याने मागील ब्रेक दाबल्यावर पुढील ब्रेकही लागतो. यामुळे ब्रेकिंग सुधारते आहे.

या वर्षी कंपनीने बीएस फोर मानक पूर्ण करणारे वेगोचे नवे मॉडेल लाँच केले आहे. यामध्ये फार काही वेगळे बदल करण्यात आलेले नाहीत. सीव्हीटी ट्रान्स्मिशन असणारे ८.४ एनएमचे ११० सीसीचे इंजिन कायम आहे. अलॉय व्हीलबरोबर पुढील चाकास डिस्कब्रेक ऑप्शन म्हणून दिला आहे. त्याचप्रमाणे पार्किंग करताना सुलभता व्हावी यासाठी डय़ुएल साइड हॅण्डल लॉक दिले आहे. स्कूटरवर बसून किक मारता येऊ  शकते, अशी किकची रचना आहे. रात्रीच्या वेळी चकाकणारी पट्टी इग्निशनच्या ठिकाणी दिली गेली आहे. याचा फायदा होतो. १६ लिटरच्या डिक्कीमध्ये एक हेल्मेट पूर्ण बसते. मोबाइल चार्जिगसाठी पोर्ट दिला असून, एक्स्टर्नल पेट्रोल फिलिंग कॅप दिली आहे. अनेक वेळा सेंटर स्टॅण्डवर स्कूटर लावणे अवघड जाते. त्यामुळे हा मुद्दा लक्षात कमी ताकदीमध्ये स्कूटर मेन स्टॅण्डवर लावता येण्यासाठीची प्रणाली टीव्हीएसने विकसित केली आहे. स्कूटर चालविण्यास उत्तम आणि आरामदायी आहे. शहरात प्रति किलोमीटर ४० ते ४५ किमी मायलेज मिळू शकते. एकूण विचार करता बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान, मेटल बॉडी, डिजिटल स्पीडोमीटर आणि अन्य वैशिष्टय़ांमुळे वेगो ही ११० सीसीमध्ये प्रामुख्याने महिलांसाठी ही नक्कीच चांगला पर्याय आहे.

obhide@gmail.com

First Published on August 4, 2017 12:56 am

Web Title: tvs automatic scooter