वाहनांच्या प्रसार-प्रचार मोहिमा या माध्यमातून पाहिल्या तर आपण त्याला हुरळून जातो. वाहन प्रकाराबद्दल दिले जाणारे आकर्षक लाभ, सवलती किंवा वाहनांशी संबंधित दिल्या जाणाऱ्या वस्तू आदी पाहिल्या की आपल्याकडे ही गाडी असावीच, असं मनोमन वाटू लागतं. पण अशा थोडक्या जागेत वाहनांबाबतचं सर्वच काही देणं शक्य होत नाही. तरीदेखील कंपन्यांच्या वाहन विक्रीचा प्रतिसाद नंतर उमटतोच.

वाहनांबाबतचा प्रसार करण्यामागे तीन प्रमुख कारणे असतात. एक म्हणजे नवे उत्पादन असेल तर; दुसरे, उत्पादकांपेक्षा विक्रेता हा जुना साठा संपविण्याच्या प्रयत्नात असेल तर आणि तिसरे – ते उत्पादनच लवकर बंद होणार असेल तर.

अनेकदा काही उत्पादनांचा प्रसार व्यापक प्रमाणात असतो. याउलट अधिक मागणी असलेल्या उत्पादनांना त्यापासून काही वेळला दूर राखले जाते. कारण मागणी अधिक असली तरी तुलनेत पुरवठा गरजेचा असतो. वाहन कंपन्यांबाबत तिच्या लोकप्रिय उत्पादनांसाठी ‘वेटिंग पिरिएड’ लांबला तर वाहन पुरविणे बिकट होऊन बसते व त्याचा विपरीत परिणाम कंपनीच्या संबंधित श्रेणीतील, समकक्ष अन्य वाहनांवर होऊ शकतो. तेव्हा नवीन वाहनांना अधिक सूट – सवलत देणे अनेकदा टाळले जाते. कारण तसे केले तर त्या वाहनासाठीची गर्दी अधिक होईल.

कंपन्या साधारणत: प्रत्येक तीन वर्षांनंतर त्यांच्या उत्पादनांना नवं रूप देतात. त्यात काही किरकोळ बदल केले जातात. ते अंतर्गत रचना, बाह्य रूप, इंधन अथवा इंजिनाबाबतही असतात. अशा नव्या अवतारातील वाहनांकरिता असलेली सूट ही ५०,००० रुपयांपर्यंतदेखील असते. जुन्या वाहनांचे नवे रूप येत असेल तर अथवा ती केवळ बंद होणार असतील तरी वाहन विक्रेता उपलब्ध वाहनांकरिता अतिरिक्त लाभ देतो. सणांच्या कालावधीत तर ते अधिक प्रमाणात होताना दिसते.

एकदम नव्या श्रेणीतील कार साधारणत: दर सहा वर्षांनी कंपन्या सादर करतात. यापूर्वी कंपन्या वित्तीय कंपनीच्या सहकार्याने माफक ईएमआय, झिरो पर्सेट डाऊन पमेंट तसेच वाहनाची किंमतही कमी करतात. अगदी महागडय़ा गाडय़ांवरही कमी मासिक हप्ता सादर केला जातो. अनेक वेळा अशी वाहने भविष्यात तिचे नवे उत्पादन सादर करणार असतात.

चांगल्या उत्पादनाला प्रसाराची गरज नसते, असं म्हटलं जातं. तेव्हा नवीन वाहन खरेदीसाठी कंपन्यांच्या अशा प्रसार प्रचार मोहिमांकडे जरा वेगळ्या नजरेनंही बघितलं पाहिजे. एखाद्या वाहनाचं उत्पादन बंद होतंय अथवा तिचं नवं रूप येणार आहे, यासाठी ते हेरता येतं. नवीन वाहन कधी येणार आहे अथवा आहे त्या वाहनात काही बदल होणार आहेत का याबाबतही सजग राहणं गरजेचं आहे.

pranavsonone@gmail.com