भारतात यामाहाची ओळख झाली ती आर १०० या मोटरसायकलमुळे. यामाहाने स्वत:च्या क्षमतेवर व्यवसाय सुरू केल्यावर भारतीय बाजारपेठेत प्रामुख्याने कम्युटर म्हणजे शंभर ते सव्वाशे सीसी इंजिन क्षमता असलेल्या मोटरसायकलवर भर दिला. यामध्ये अनेक फोरस्ट्रोक मोटरसायकल मॉडेलचा समावेश होता. तसेच, देशात नव्याने आलेल्या क्रूझर मोटरसायकलमध्येही कंपनी नशीब आजमावण्यासाठी एंटायसर नावाची मोटरसायकल लाँच केली. मात्र, त्यातही कंपनीला मर्यादितच यश प्राप्त झाले. २००१ ते २००८ या काळात कंपनीची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मोटरसायकल फारच कमी आहेत. या सात वर्षांच्या काळात देशातील मोटरसायकलची बाजारपेठही बदलू लागली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्तारामुळे अनेक थेट-उप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याबरोबर लोकांची क्रयशक्तीही वाढत होती. त्यामुळे शंभर सीसी मोटरसायकलची बाजारपेठ हळूहळू १५० सीसी वा त्यापेक्षा अधिक सीसी इंजिन असणाऱ्या मोटरसायकलकडे जात होती. बजाज पल्सर, हिरो सीबीझी एक्सस्ट्रीम, टीव्हीएस अपाचे या मोटरसयाकलचा त्यात समावेश होता. तसेच, अधिक सीसीच्या मोटरसायकलमध्ये मार्जनि अधिक असल्याने या मोटरसायकलचे विपणन करण्यात कंपन्यांना अधिक रस दिसू लागला होता.

एकूण परिस्थिती पाहून यामाहा कंपनीने दीडशे सीसीच्या मोटरसयाकवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. त्यातूनच यामाहाच्या जागतिक पातळीवरील एफझेड सीरिजमधील मोटरसायकलशी मिळत्याजुळत्या फेझर ही मोटरसायकल कंपनीने भारतीय बाजारपेठेत लाँच केली. जागितक पातळीवरदेखील या मोटरसायकलची विक्री केली जाते. नेकेड मोटरसायकल संकल्पनेवर आधारित ही मोटसायकल एफझेड१६ नावाने लाँच केली. दिसायला भरभक्कम, स्पोर्टी लुक असणारी मोटरसायकल ग्राहकांना आवडली. या मोटरसायकलला १५४ सीसीचे इंजिन बसविले होते. तसेच, ही मोटरसयाकल हाफ काउलमध्येही उपलब्ध करून दिली. यास ट्विन हेडलॅम्प देण्यात आला होता. तसेच, कंपनीने या सेगमेंटमधील सर्वात रुंद व टय़ूबलेस टायर दिले होते. मोनोकॉक सस्पेन्शन, बटन स्टार्ट, सेमी-डिजिटल मीटर यांच्यामुळे तरुण वर्गात मोटरसायकल चच्रेचा विषय बनली. तसेच, या मोटरसायकलचे मायलेजही प्रति लिटर ४० ते ४५ किमी होते. त्यामुळे फेझरने यामाहला दीडशे सीसीच्या सेगमेंटमध्ये आपले स्थान मिळवून दिले.

कंपनीने स्पर्धा आणि बाजारपेठेची मागणी याचा ताळमेळ नेहमीच फेझर व एफझेडमध्ये घातला. यामध्ये काळानुसार नवे तंत्रज्ञान, फ्यूएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी, डिजिटल मीटर आदींचा त्यात समावेश केला. तसेच, कंपनीने मोटरसायकलचे मायलेज वाढवे यासाठी २०१४ मध्ये मोठा बदल फेझर सेगमेंटच्या मोटरसायकलमध्ये केला. कंपनीने इंजिनची सीसी १५४वरून कमी करून १४९ सीसीवर आणली. यामुळे मोटरसायकलचे मायलेज नक्कीच सुधारले. ही मोटरसायकल एक लिटर ५० किमी अंतर जाते. अर्थात, शहरातील वाहतुकीची स्थिती पाहता ४० ते ४३ किमी मायलेज मिळते.

भारतात एक एप्रिल २०१७ पासून पर्यावरणाचे नवे निकष लागू झाले. त्यामुळे त्याला अनुसरून इंजिनमध्ये बदल करताना व्हर्जनमध्येही काही बाह्य बदल कंपनीने केले. यामध्ये एफझेड एआय व्हर्जन २ ही फ्यूएल इंजेक्शनपर्यायतच येते. यास पाच स्पीडचा गिअर बॉक्स देण्यात आला आहे. दोन व्हॉल्व्हचे १४९ सीसीचे इंजिन असून, बारा लिटरची टाकी आहे. आकर्षक ग्राफिक, नवे इन्स्ट्रमेंटल पॅनल, स्प्लिट सीटचा यामध्ये समावेश केला. तसेच, फेझर एफआय व्हर्जन २.० मध्येही फ्यूएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह तेवढय़ाच क्षमतेचे इंजिन बसविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या व्हर्जनमध्ये सेमी नेकेड मोटरसायकल म्हणजे फेअिरग मिळते.

फेझरपेक्षा एफझेड हे नेकेड व्हर्जनच अधिक पसंतीस उतरले आहे. मोटरसायकलचे स्पस्पेन्शन चांगले आहे. तसेच, सीटची जाडी आणि उंची योग्य असल्याने आरामदायी वाटते. तसेच, ही मोटरसायकल सेमी-स्पोर्ट टूर प्रकारतील आहे. त्यामुळे दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवरून करणाऱ्यांसाठी ही मोटरसायकल चांगली आहे. रुंद टायर, डिस्कब्रेक यामुळे गाडी हाताळण्यास योग्य वाटते. सुझुकीची जिक्सर, होंडाची सीबी हॉन्रेट, पल्सर १५० एनस या मोटरसायकल यामाहाच्या एफझेडला पर्याय आहेत. मात्र, डिझाइन, कम्फर्ट, लुक्स, तंत्रज्ञान यांच्याबाबतीच एफझेड उजवी वाटते. अर्थात, या मोटरसायकलचे स्पेअर्स आणि त्याचे काम करण्यासाठी येणारा खर्च याचाही विचार करावा. या सेगमेंटमधील अन्य मोटरसायकलही चांगल्या आहेत. शेवटी आपले बजेट आणि ब्रॅण्डची आवड यावर निर्णय घेतलेला चांगला.

obhide@gmail.com