टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय

अ‍ॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे.

शंभर सीसी वा ११० सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटर प्रामुख्याने कम्युटिंग स्कूटर म्हणून ओळखल्या जातात. मायलेज हा स्कूटरचा केंद्रबिंदू असतो. तसेच, सीसी कमी असल्याने किंमतही तुलनेने कमी असते. मात्र, मोटरसायकलऐवजी स्कूटरचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना अशा ऑटोमॅटिक स्कूटर या कमी ताकदीच्या वाटू शकतात. त्यामुळेच विशेषत: पुरुष ग्राहकवर्ग डोळ्यापुढे ठेवून दुचाकी उत्पादक कंपन्यांनी १२५ सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरचे उत्पादन लाँच केले आहे. यामध्ये पॉवर आणि मायलेज यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये आकर्षक डिझाइन व फीचर्स अधिक असणाऱ्या स्कूटरचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अशा स्कूटरच्या किमतीही अधिक आहेत. प्रामुख्याने १२५ सीसी पॉवरच्या ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी अ‍ॅक्सेस, होंडा अ‍ॅक्टिवा १२५ आणि व्हेस्पा १२५ या तीन स्कूटर आहेत, तर होंडाने नुकतीच मोटोस्कूटर डिझाइन इन्स्पायर्ड ग्राझिया ही ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली आहे. १२५ सीसीच्या स्कूटर सेगमेंटची सुरुवात सुझुकीने अ‍ॅक्सिस १२५  लाँच करून केली. अनेक वर्षे या स्कूटरला स्पर्धक स्कूटर नव्हती; पण गेल्या पाच ते आठ वर्षांत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील प्रत्येक स्कूटरची खासियत वेगळी आहे; पण यातील बेस्ट कोण, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतोच. त्यामुळे याविषयी जाणून घेऊयात.

अ‍ॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे. अ‍ॅक्सिसला मोटरसायकलसारखे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. ही स्कूटर शहरात प्रति लिटर ४०-४५ किमी मायलेज, तर हायवेवर ५०-५५ मायलेज देऊ शकते. नव्या तंत्रज्ञानामुळे मायलेज प्रति लिटर ६४ मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. स्पर्धक स्कूटरच्या तुलनेत अ‍ॅक्सेसचे सीट मोठे व रुंद असल्याने आराम मिळतो. मोटरसायकल चालविणाऱ्यांना मात्र तो कमी वाटेल, कारण मोटरसायकलची सीट मोठी व रुंद नसते. तसेच चाकाचा आकार व सस्पेन्शनमध्ये फरक असतो. नव्या अ‍ॅक्सेसला रेट्रो लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच हेडलॅम्पकडे पाहिल्यावर आपल्याला जुन्या स्कूटरची आठवण होते. अ‍ॅक्सेसमध्ये डिस्कब्रेक, डिजिटल मीटर, क्रोम हेडलॅम्प, ऑलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, फ्रंट पॉकेट, मोबाइल चार्जिगसाठी डीसी सॉकेट आदी सुविधा दिल्या आहेत. या स्कूटरचे डिस्कब्रेक व्हर्जनही उपलब्ध आहे; पण अ‍ॅक्टिवा १२५ ची या स्कूटरला जोरदार टक्कर मिळत आहे.

होंडा अ‍ॅक्टिवा १२५

या ऑटोमॅटिक स्कूटरला १२५ सीसीचे इंजिन असून, ८.५२ बीएचपी पॉवर मिळते. होंडाने पूर्णपणे नव्याने विकसित केलेले इंजिन होंडा इको टेक्नॉलॉजीने युक्त आहे. इंजिनची ताकद पिकअप घेताना चांगली असल्याचे जाणवते. तसेच, ताशी ७०-८० किमीचा वेग गाठल्यावरही इंजिनचे व्हायब्रेशन होत नाही. शहरात प्रति लिटर ४०-५० किमी मायलेज, तर हायवेवर यापेक्षा अधिक म्हणजे ५५-६० किमी मिळू शकते. चालविणाऱ्यास हादरे कमी बसावेत यासाठी पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे. तसेच, मागील बाजूस पारंपरिक सस्पेन्शन आहे; पण दोन्ही सस्पेन्शन चांगली आहेत. स्कूटरची बॉडी मेटलची असली तरीही लाइटवेट आहे. फ्रंट स्टायलिंग आकर्षक करण्यासाठी दोन्ही इंडिकेटरच्या मध्ये क्रोम दिली आहे. नव्या मॉडेलमध्ये एलईडी पायलट लॅम्प दिला आहे. अलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, कॉम्बी ब्रेकिंगसह पुढील बाजूस डिस्कब्रेकचा पर्याय दिला आहे. अ‍ॅक्टिवा ब्रँड मोठा असून, आधीच्या म्हणजे ११० सीसी मॉडेलची कामगिरी उत्तम आहे. तसेच १२५ सीसी मॉडेल चांगले आहे. त्यामुळे १२५ सीसी ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्राधान्याने याचा विचार करायला हरकत नाही.

होंडा ग्राझिया

ही या सेगमेंटमध्ये नुकतीच दाखल झालेली स्कूटर आहे. तरुण वर्गाला डोळ्यापुढे ठेवून या स्कूटरची रचना केल्याचे जाणवते. त्यामुळेच मोटोस्कूटर इन्स्पायर्ड लुक दिला आहे. या स्कूटरची बॉडी फायबरची आहे. डिजिटल मीटर, डिस्कब्रेक, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, एलईडी टे टाइम रनिंग लाइट आदी फीचर्स दिली आहेत. मोटोइन्स्पायर्ड डिझाइन असल्याने लुक उठावदार दिसतो. यास अ‍ॅक्टिवाचे १२५ सीसीचे इंजिन बसविले आहे, मात्र स्टायलिंग वेगळी आहे. मोटोरेसिंग इन्स्पायर्ड लुक आवडणाऱ्यांसाठी ही स्कूटर एक चांगला पर्याय आहे.

व्हेस्पा १२५

पारंपरिक स्कूटरच्या डिझाइनपेक्षा संपूर्णपणे स्टायलिश स्कूटरची आवड असणाऱ्यांसाठी व्हेस्पा १२५ ही स्कूटर आहे. व्हेस्पामध्ये जुन्या डिझाइनला उजाळा दिला आहे. त्यामुळेच रेट्रो लुक असणारी नवी ऑटोमॅटिक व्हेस्पा आहे. स्कूटरची फ्रेम ही पूर्ण मेटॅलिक असून एकसंध आहे. अशी बॉडी पूर्वीच्या गिअर्ड स्कूटरना होती. संपूर्ण मेटल बॉडी असल्याने यावर रंगही खुलून दिसतात. स्कूटरमध्ये क्रोमचा पुरेपूर वार केला आहे. त्यामुळेच हेड लॅम्प सर्कल, मोनोग्राम, हँडलबार, गार्ड, मिरर, टॅल लॅम्प यांना क्रोम फिनिंग आहे आणि यामुळे स्कूटरचा लुकमध्ये चांगला फरक दिसतो. पुढील फूट रेस्ट फ्लॅट बॉटम नसून पूर्वीच्या स्कूटरसारखे आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टर डिजिटल व अ‍ॅनालॉग असून यात फ्यूएल गॅग, ट्रिप मीटर दिला आहे. स्कूटरचा फील महत्त्वाचा असल्याने मायलेजकडे दुर्लक्ष करता येऊ  शकते. ही स्कूटरला प्रति लिटर ३५-४० किमी मायलेज देऊ  शकते. स्कूटरला पुढील बाजूस सिंगल साइड ट्रेलिंग लिंक सस्पेन्शन दिले असून अँटी डाइव्ह सिस्टममुळे ब्रेक दाबल्यावर चाक एकदम पकड सोडत नाही; पण टेलिस्कोपिक सस्पेन्शन नक्कीच चांगला असतो आणि ते यामध्ये नाही. अलॉय व्हील, डिस्कब्रेकचा पर्याय यामध्ये दिला आहे. सिटी ट्रॅफिकमध्ये एक चांगला अनुभव मिळतो. अर्थात, कंपनीने केलेल्या ब्रँडिंगनुसार व्हेस्पा ही डेली कम्युटिंग स्कूटर नाही. वीकेंड पार्टी, लेजर रायडिंगसाठी ही स्कूटर आहे. लोकांनी आपल्याकडे पाहावे, थोडे हटके आपल्याकडे असावे, असा विचार करणाऱ्यांनी नक्कीच व्हेस्पाचा विचार करायला हरकत नाही; पण त्यासाठी मोजावी लागणारी रक्कम विचारात घेतलेली बरी.

obhide@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 125cc automatic scooter125cc scooter