टेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..!

नवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे.

जागतिक मंदी, निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या तडाख्यात सापडूनही देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षेची सर्वोत्तम काळजी आणि आकर्षक डिझाइनसह वाहन कंपन्या आपली वाहने ग्राहकांसाठी सादर करत असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. ‘स्कोडा’नेही नव्या अवतारात आपली नवीन ऑक्टाव्हिया सादर केली आहे. वेगवान, अत्यंत आरामदायक, अत्याधुनिकतेचा साज अशी नावीन्यपूर्ण ओळख असलेली ही गाडी हौशी वाहनधारकांसाठी प्रत्येक ड्राइव्हदरम्यान नवा अनुभव देणारी ठरेल यात शंका नाही.

स्कोडाचे ऑक्टाव्हिया हे मॉडेल २००२ सालातील. मात्र त्यानंतर कंपनीने सातत्याने मागणी वाढल्याने या मॉडेलमध्ये सुधारणा करून नवीन अवतारातील ऑक्टाव्हिया सादर केली आहे. त्यामुळे २०१७ मध्ये नव्याने सादर केलेल्या ऑक्टाव्हियामध्ये स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

बारचना

नवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे. ही गाडी क्लासिक आणि मॉर्डन डिझाइनचा अद्वितीय मिलाप आहे. तिच्यामध्ये भक्कम चिसेल्ड हुड, अतिशय सुंदर फ्रंट बटरफ्लाय व अगदी वेगळे ऑल लेड लायटिंग युनिट आहे. नव्यानेच विकसित करण्यात आलेले क्वाड्रा एलईडी हेडलाइट्स क्रिस्टलग्लो एलइडी डेटाइम रनिंग लाइट्ससोबत येतात.

ऑक्टाव्हियाचा समोरील भाग अर्थात बोनेट अतिशय आकर्षक स्वरूपात असून, गाडी दिसायला लांब असल्याने या आकर्षकतेमध्ये आणखी भर पडते. आडव्या आणि तीक्ष्णपणे कापलेल्या टोरनॅडी लाइन्स ऑक्टाव्हियाच्या सुंदरतेत भर घालतात. ऑक्टाव्हियाचे एलईडी लाइट्स नव्याने सादर करण्यात आले आहेत.  रिडिझाइन्ड रियर बंपर जणू लाइट क्लस्टर्समध्ये कोरीवकाम केल्याची छाप सोडून जातो. वरच्या कोपऱ्यामधील डिझाइन्सला वेगळे करणाऱ्या ब्रेक डिझाइनला आणखीन आकर्षक बनवतो. स्कोडाने नवीन ऑक्टाव्हिया सादर करताना सर्व आरामदायक सुविधा अतिशय कमी किमतीत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाहनचालकाच्या रुबाबात वाढ झाल्याशिवाय राहत नाही.

अंतर्गत रचना

नवीन स्कोडा ऑक्टाव्हियाच्या अंतर्गत रचनेमध्येही कमालीचे आणि आकर्षक स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंत्रज्ञान आधुनिकता आणि क्लेव्हर कनेक्टिव्हिटी गुणविशेष प्रदान करते. नवीन ८ इंच कलर टच स्क्रीन डिस्प्ले आणि आठ स्पीकर्स यामध्ये देण्यात आले आहेत. अ‍ॅम्युंडसेन इन्फोटेन्मेंट युनिट हे स्कोडाकडून विकसित करण्यात आलेले नवीन पिढीतील इन्फोटेन्मेंट आहे. उच्च दर्जाच्या ग्लास डिझाइनसोबत कपॅसिटिव्ह टच स्क्रीन अगदी हलक्या स्पर्शालादेखील प्रतिसाद देतात. गाडीमध्ये मिररलिंक, अ‍ॅपल कारप्ले आणि अ‍ॅड्रॉइड ऑटो असणारी कनेक्टिव्हिटी आहे.

बॉसकनेक्टसोबत नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी कनेक्टिव्हिटी स्कोडा मीडिया कमांड अ‍ॅपमार्फत अ‍ॅम्युंडसेन नॅव्हिगेशन यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेडिओ, एक्सटर्नल डेटा स्टोअरेज (एसडी कार्ड अथवा यूएसबी) मधून आपल्याला हव्या असणाऱ्या संगीताचा आनंद घेता येतो. तसेच आवाज कमी-जास्त करणे आणि नेव्हिगेशन करणे हे मागील सीटवर बसूनदेखील करता येते. याव्यतिरिक्तएसडी कार्ड रीडर, यूएसबी, ऑक्सइन, अ‍ॅपल डिव्हाइसेस कनेक्टिव्हिटी सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्डच्या स्वरूपात येते.

ऑक्टाव्हियातील आसनेही अतिशय आरामदायी असून, ती आपल्याला आवश्यक असतील त्याप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करता येतात. ज्येष्ठ व्यक्तींना यामधून प्रवास करताना कमालीचा आरामदायीपणा मिळेल. दोन्ही सीट्समध्ये जागा भरपूर असल्याने पाय दुखून येत नाहीत.

स्कोडा ऑक्टाव्हियामध्ये मागील बाजूसही दोन यूएसबी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील प्रवासीही त्यांचे फोन स्मार्टपणे चार्ज करू शकतात. गाडीमध्ये पिलरवर तिकीट होल्डर देण्यात आला आहे. डोअर ट्रिमवरील वेस्ट बिन, फ्रंट सीट्सच्या मागे असलेले टेबल होल्डर आणि इतर गुणविशेष आहेत, जे तुम्हाला कॉम्पक्ट कारमधल्या आरामाचा सुखद अनुभव देतील.

सामान ठेवण्याची जागा

नवीन ऑक्टाव्हियामध्ये ५९० लिटर बूट स्पेस आहे. मागील सीट फोल्डेबल असल्याने १५८० लिटर लगेज स्पेस उपलब्ध होते. ही स्पेस या विभागात सर्वोत्तम आहे. तसेच यामध्ये लहान लहान वस्तू ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरच्या प्रवासाला जाताना अधिक लागणारे सामान घेऊन जाता येणे शक्य आहे. त्यामुळे हा प्रवास नक्कीच आनंददायी होणे शक्य आहे.

सुरक्षेची वैशिष्टय़े

नवीन ऑक्टाव्हियामध्ये स्कोडाने सुरक्षेची सर्व मानके पूर्ण केली आहेत. एखाद्या कठीण अथवा चढउताराच्या ठिकाणावर पार्किंग करताना समस्या येते. मात्र ऑक्टाव्हियामध्ये हँड्स फ्री पार्किंगची सुविधा दिली असून, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गाडी सहजतेने पार्क होते. एएफएस (अ‍ॅडाप्टिव्ह फ्रंट लाइट सिस्टम) लाइट सेन्सर्सने ऑटोमॅटिकपणे चालू केली जाते. हेडलाइट्सना लो लाइट कंडिशन्सवर स्विच केले जाते. एएफएस हेर्डिग कंट्रोल यंत्रणा लाइट बीमचा आकार बदलून वेगवेगळय़ा ड्रायव्हिंग स्थितीसोबत लाइट पॅटर्न्‍सचा अंगीकार करते. नवीन ऑक्टाव्हियामधून रात्री प्रवास केल्यास अधिक आनंद मिळतो. गाडीमध्ये कॉर्नरिंग फॉग लॅप्स देण्यात आले आहेत.

ऑक्टाव्हियामध्ये पुढे आणि बाजूला अशा डय़ुअल एअरबॅग्ज देण्यात आल्या असून, यामध्ये एकूण ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामधून स्कोडाकडून सुरक्षेवर दिला जाणारा भर अधोरेखित होण्यास मदत होते. तसेच गाडीमध्ये सेफ्टी सीट बेल्ट सिग्नल (ऑडिओ) ड्रायव्हर आणि प्रवाशाला आयबझ फटिग सिग्नल अलर्टचा समावेश होतो. जर सीट बेल्ट घातले नाही तर कायम सिग्नल देण्यात येतो. यामुळे जरी सीटबेल्ट घालण्याची इच्छा नसली तरी सीटबेल्ट लावावे लागते. यातून प्रवाशांना सीटबेल्ट लावण्याची सवय लागून प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातामध्ये गंभीर दुखापतीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. लहान मुलांना आयसोफिक्स आणि टॉप टिथर पॉइंट्स वापरून सुरक्षित करता येते. गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंगदेखील उपलब्ध आहे.

इंजिन

पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे १.४ टीएसआय ऑक्टाव्हियाचे इंजिन आहे. ते २५० एनएमचा कमाल टॉर्क तयार करते. तसेच १५०० ते ३५०० आरपीएम ऊर्जा यातून निर्माण होते. अवघ्या ८.१ सेकंदामध्ये ते १०० किमी प्रति तास हा वेग प्राप्त करते. यामध्ये ६ स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. गाडीचे इंजिन अतिशय दमदार असून, ज्या वेळी गाडी वेग पकडायला सुरुवात करते त्या वेळी स्पोर्टी कार असल्याचा फील आतमधील प्रवाशांना येतो. गाडीचे इंजिन स्मूथ असल्याने सीटवर बसलेल्यांना कसलाही त्रास जाणवत नाही.

चालविण्याचा अनुभव

ऑक्टाव्हिया चालवताना एक स्पोर्टी कार चालवण्याचा सुखद अनुभव येतो. ऑक्टाव्हिया ज्या वेळी हायवेवर धावते त्या वेळी ती सरळ एका रेषेत धावते. १४० किमी प्रति तास या प्रचंड वेगातही ती अतिशय स्थिर वाटते. ज्या वेळी तिला ऑटोमॅटिक मोडवर टाकण्यात येते, त्या वेळी ती आहे त्या वेगात पुढे जात राहते. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल येथे पाहायला मिळते. स्टेअरिंगवर सर्व काही सुविधा देण्यात आल्या असून, त्यामुळे गाडी चालवताना फक्त हाताच्या बोटावर सर्व काही अ‍ॅडजेस्ट करता येते. गाडीतील आरामदायकपणा अतिशय दिलासादायक जरी असला तरी गाडी मायलेजमध्ये मार खाते. कंपनीने सांगितल्याप्रमाणे किमान १५ किमी प्रति लिटरचे मायलेज आहे. मात्र प्रत्यक्षात गाडी १० किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच ग्राऊंड क्लिअरन्सही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यांवर चालण्यासाठी ही कार नक्कीच नाही. मात्र असे जरी असले तरी फक्त १६ लाख रुपयांमध्ये अत्यंत आरामदायी, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा स्पोर्टी कारचा आनंद शौकिन व व्यावसायिकांसाठी मिळण्याची खात्री यातून मिळते.

chandrakant.dadas@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on skoda octavia skoda car

ताज्या बातम्या