टॉप गीअर : कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय

हिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे.

मागच्या लेखात कम्युटर सेगमेंटमधील एंट्री लेव्हल सेगमेंटमधील बेस्ट पर्यायाचा मागोवा घेतला होता. अर्थात, या मोटरसायकलमध्ये बजेट हा महत्त्वाचा घटक असल्याने यामध्ये फीचर थोडी कमी, सस्पेन्शन अपेक्षेइतक्या गुणवत्तेच नसते. मात्र, मायलेजवर अधिक भर दिलेला असतो. मात्र, कम्युटर तरीही प्रीमियम अशा १०० ते ११० सीसीपर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोटरसायकलींमध्ये अधिक चांगली फीचर, गुणवत्ता, डिझाइनवर भर दिलेला असतो. मात्र, या मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ७२ ते ८३ किमी मिळते, असा दावा करण्यात येतो. शंभर सीसीच्या मोटरसायकलपेक्षा सुमारे २० ते २५ टक्के कमी मायलेज मिळते. अर्थात, एंट्री लेव्हल प्रीमियम मोटरसायकलचे डिझाइन, फीचर, फील यांना प्राधान्य देणाऱ्यांनीच अशा मोटरसायकलचा विचार करावा. अशा या प्रीमियम फॅक्टर असलेल्या मोटरसायकलमध्ये प्रामुख्याने होंडा, टीव्हीएस, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. प्रीमियम सेगमेंटमधील ११० सीसीच्या मोटरसायकल या ५५ ते ५९ हजार रुपयांपासून (यात बदल असू शकतो) सुरू होतात.      (उत्तरार्ध)      

हिरो मोटकॉर्प पॅशन प्रो

हिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे. काळानुसार कंपनीने यामध्ये बदल केले आहेत. नव्या पॅशनला ८.२४ बीएचपीचे शंभर सीसीचे इंजिन असून, आय थ्री एस हे इंधन वाचविणार तंत्रज्ञान आहे. त्यामुळे मोटरसायकलचे मायलेज सुधारले आहे. नजीकच्या प्रवासाठी म्हणजे ५०-६० किलोमीटर व शहरात प्रवास करण्यासाठी ही मोटरसायकल चांगली आहे. प्रति लिटर ८० किमीपेक्षा अधिक मायलेज मिळते, असा कंपनीचा दावा आहे. चालविण्याची सवय, शहरातील वाहतूक आदींचा विचार केल्यास ५० ते ६० किमी शहरात मायलेज मिळायला हरकत नाही. पॉवर, पिकअप, मायलेज व स्टाइल यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हिरोमोटकॉर्पने केला आहे. मात्र, टीव्हीएस व्हिक्टर, होंडा ड्रीम युगा यांच्या तुलनेत पॉवर कमी आहे. अर्थात, सर्वात जुनी मोटरसायकल असल्याने कॉस्ट ऑफ ओनरशिप कमी आहे.

टीव्हीएस व्हिक्टर

टीव्हीस मोटरने पुन्हा एकदा व्हिक्टर मोटरसायकल २०१६ मध्ये बाजारात आणली. नव्या मोटरसायकलमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. संपूर्ण आकर्षक, सेमी-स्पोर्ट्स डिझाइन, ब्लॅक ऑलॉय व्हील, डिजिटल कन्सोल, आरपीएम मीटर, डिस्कब्रेक, क्रिस्टल क्लीअर इंडिकेटर, नवा डिझाइन केलेला एक्झॉस्ट, थ्रीडी एम्ब्लेम, इको-स्पोर्ट मोड, उत्तम रंगसंगतीबरोबर वापरण्यात आलेल्या मटरेलिअलची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे मोटरसायकलला एक प्रीमियम लुक आला आहे. ११० सीसी नवे इंजिन व्हायब्रेशन देत नाही आणि ते ९.४६ बीएचपीचे आहे. तसेच, क्रूझिंग स्पीड म्हणजे ५० ते ५५ केएमपीएल उत्तम रायडिंगचा अनुभव देतो. प्रति लिटर ६० ते ७० मायलेज ११० सीसी सेगमेंटमध्ये उत्तम वाटते. ग्रिप चांगली मिळण्यासाठी विशिष्ट रचना केलेले टायर बसविण्यात आले आहेत. ११० सीसी सेगमेंटमधील अन्य मोटरसायकलच्या तुलनेत लुक, फीचरबाबतीत नवी व्हिक्टर उजवी ठरते. त्यामुळेच ५८ हजार रुपयांपेक्षा अधिक बजेट असणाऱ्यांनी या सेगमेंटमधील पॅशन प्रो, ड्रीम युगा, लिवो आणि व्हिक्टर यांची टेस्ट ड्राइव्ह नक्की घ्यावी आणि आपल्याला योग्य वाटणारी मोटरसायकल घ्यावी.

होंडा लिवो, ड्रीम युगा

होंडा कंपनीने ११० सीसी सेगमेंटमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. लिवो आणि ड्रीम युगा या दोन मोटरसायकल पर्याय कंपनीने ग्राहकांना दिले आहेत. दोन्ही मोटरसायकलना आठ बीएचपीपेक्षा अधिकचे ११० सीसीचे इंजिन बसविले आहे. मात्र, दोन्ही मोटरसायकलाच्या डिझाइन, फीचरमध्ये फरक आहेत. ड्रीम युगा ही पारंपरिक डिझाइनची मोटरसायकल आहे. लिवो ही सेमी स्पोर्ट्स डिझाइनची मोटरसायकल आहे. यामध्ये डिस्कब्रेकचा पर्याय दिला असून, टय़ूबलेस टायरही दिले आहेत. तसेच, पुढील चाकास टेलिस्कोपिक व मागील चाकास फाइव्ह स्टेप अडजस्टेबल हायड्रॉलिक सस्पेन्शन दिले आहे. दोन्ही मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ७० किमीच्या पुढे मिळत असल्याचा दावा आहेत. हँडलिंग, कम्फर्ट चांगला आहे. पॅशन प्रोपेक्षा लिवो डिझाइनमध्ये सरस आहे. मात्र, मायलेजबाबत पॅशन प्रो ही ड्रीम युगा व लिवोपेक्षा पुढे आहे. अर्थात, या तीनही मोटरसायकलची स्पर्धा ही टीव्हीएस व्हिक्टरशी आहे.

obhide@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Entry level premium motorcycle premium options in the computer segment

ताज्या बातम्या