लॅण्ड रोव्हर ‘डिस्कव्हरी’

सामान्यांसाठी या गाडीची किंमत अधिक असली वाहनशौकिनांसाठी ती नक्कीच हवीहवीशी वाटणारी अशी आहे.

सात आसने, लक्झरी सुविधा, सुरक्षिततेची सर्वोत्तम काळजी, शक्तिशाली इंजिन क्षमता आणि भक्कम प्रदर्शन हे सर्व एकाच कारमध्ये मिळाले तर अनेक जण सुखावतात. अशा सुविधा आणि देखणी गाडी यामुळे नकळत तुमच्या रुबाबात भर पडत असते. मात्र यासाठी थोडी अधिक किंमत मोजायला हवी. लॅण्ड रोव्हरने पाचव्या पिढीतील डिस्कव्हरी एसयूव्ही ही भारतात दाखल केली असून, या एसयूव्हीची किंमत ६८.०५ लाख ते १.०२ कोटी रुपयांपर्यंत जाते. सामान्यांसाठी या गाडीची किंमत अधिक असली वाहनशौकिनांसाठी ती नक्कीच हवीहवीशी वाटणारी अशी आहे.

पाचव्या पिढीतील ही डिस्कव्हरी असून यामध्ये मागील पिढीच्या तुलनेत अधिक आरामदायक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. खडबडीत रस्त्यांवर धावण्यासाठी ब्लॉक ऑफ वूड शेपमधील डिस्कव्हरीची उंची अधिक आहे. गाडीतील अंतर्गत रचना अतिशय आकर्षक असून, सामान ठेवण्यासाठी मागे भरपूर जागा आहे. त्यामुळे एखाद्या दूरच्या प्रवासासाठी निघताना आवश्यक तेवढय़ा वस्तू यामध्ये घेता येतात.

अंतर्गत रचना

डिस्कव्हरी लांब आणि अधिक रुंद असल्याने आतमध्ये अधिक प्रमाणात मोकळी जागा वापरण्यास मिळते. डिस्कव्हरीने अंतर्गत रचनेत मागील पिढीच्या तुलनेत यामध्ये अधिक प्रमाणात बदल केला आहे. आसनांना प्रीमियम लेदर वापरण्यात आल्याने गाडीमध्ये बसल्यावर अधिक आरामदायक वाटते. गाडीमध्ये आसनांचे डिझाइन अतिशय आकर्षक स्वरूपात करण्यात आल्याने सामान ठेवण्यासाठी आपल्याला अधिक प्रमाणात जागा उपलब्ध होते. सर्वात मागील आसन फोल्ड करण्याची सोय असल्याने सामान ठेवण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होते. लगेज स्पेस २५०० लिटर इतकी जास्त आहे. नवीन डिस्कव्हरीमध्ये बसल्यावर गाडीतील प्रत्येक प्रवासी अत्यंत आरामदायक प्रवासाची अनुभूती घेऊ शकतो.

इंजिन

नवीन डिस्कव्हरीमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. लॅण्ड रोव्हर डिस्कव्हरीचे इंजिन २ हजार ९९३ सीसी असून यामध्ये २५५ बीएचपी ऊर्जा निर्माण होते. गाडीमध्ये ६ सिलिंडर असून, ८ गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. ही एसयूव्ही साधारणपणे १८ किमी प्रति लिटर मायलेज देते. फ्यूएल टँक ६५ लिटरचा आहे. इंजिन अत्याधुनिक असल्याने ते अतिशय स्मूथ चालते. इंजिन अधिक ताकदीचे असल्याने गाडी अतिशय वेगाने धावते. गाडी अतिशय कमी सेकंदामध्ये १०० किमी प्रति तासापेक्षा अधिकचा वेग पकडू शकते. ज्या वेळी गाडी हायवेवर धावते त्या वेळी ती कसलीही हालचाल न करता सरळ एका रेषेत धावते. त्यामुळे प्रवास करताना कोणताही अडथळा येत नाही.

वैशिष्टय़े

आधुनिक जीवनशैलीसाठी ज्या सुविधा आवश्यक असतात, त्या सर्व सुविधा या एसयूव्हीमध्ये देण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये इनकंट्रोल इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली असून, ती १० इंच आहे. तुमच्या हाताच्या एका बोटावर तुम्ही बाहेरील जगाशी यामुळे जोडले जाता. एसयूव्हीमध्ये ४जी वायफाय सुविधा देण्यात आली असून, तुम्ही ८ डिव्हाइस त्याला कनेक्ट करू शकता. नऊ यूएसबी आणि १२ व्ही चार्जिग स्लॉट, सॅटेलाइट नेव्हिगेशन सुविधा देण्यात आली आहे. गाडीमध्ये ६ स्पीकर ऑडिओ सिस्टीम, दोन सनरूफ, पॅरलल पार्क असिस्ट ही वैशिष्टय़े देण्यात आली आहेत. तसेच या एसयूव्हीमध्ये ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

सुरक्षेची काळजी

सर्व नवीन डिस्कव्हरीमध्ये अ‍ॅल्युमिनियम बॉडी स्ट्रक्चर देण्यात आले असून, प्रवाशांना अविश्वसनीयपणे भक्कम सुरक्षा प्रदान करण्यात येते. गाडीमध्ये ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये प्रत्येक आसनांच्या रांगेमध्ये आयएसओफिक्स पॉइंट देण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचे संरक्षण होण्यास मदत होते. गाडीच्या पाठीमागे कॅमेरा देण्यात आल्याने कार पार्किंग करते वेळी समस्या निर्माण होत नाही. कार पार्किंग करताना अपघात होऊ नये यासाठी एलईडी लाइट देण्यात आले आहेत. डिस्कव्हरीमध्ये ट्रेलर स्टॅबिलिटी असिस्ट (टीएसए), हिल डिसेंन्ट कंट्रोल, रोल स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल या सुविधा देण्यात आल्या आहेत.

एएमटी गिअर बॉक्स

संपूर्ण जग ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या गाडय़ा वापरत असताना भारतात मात्र त्या प्रमाणात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वापरली जात नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली गाडी मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या गाडीच्या तुलनेत भारतात एक लाख रुपयांनी महाग असते हे याचं मुख्य कारण. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली गाडी कमी मायलेज देते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्स कमी असतो. (प्रसंगी खराब रस्त्यांमुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे कव्हर फुटू शकते अथवा त्याला तडा जाऊ  शकतो.) या सर्व गोष्टींवरती मात करण्याकरिता वाहननिर्मात्यांनी आता एएमटी तंत्रज्ञान असलेले गिअर बॉक्स आणायला सुरुवात केली आहे.

एएमटी म्हणजे ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन. या पद्धतीच्या गिअर बॉक्समध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारात वापरले जाणारे गिअर बॉक्सच वापरले जात असून गिअर बदलणे आणि योग्य गिअरची निवड करण्यासाठी तसेच गिअर बदलते वेळी क्लच दाबण्यासाठी एका इलेक्ट्रो हायड्रॉलिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सदर हायड्रॉलिक तंत्रज्ञान हे एका इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटद्वारे नियंत्रित केले जाते. इलेक्ट्रो हायड्रॉलिक मेकॅनिझम आणि सदर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ईसीयू) हे गिअर बॉक्सच्या वरच बसवले जाते. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गाडीमध्ये क्लच पेडल वापरले जात नाही. प्रचलित ऑटोमॅटिक ट्रान्समिशनप्रमाणेच पी (पार्किंग), आर (रिव्हर्स), एन (न्यूट्रल), डी (ड्राइव्ह) याच प्रकारची गिअर शिफ्टिंगची रचना केलेली असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीस मॅन्युअल ट्रान्समिशनप्रमाणे गिअर बदलून गाडी चालवायची असल्यास तीसुद्धा सोय एएमटी प्रकारच्या गिअर बॉक्समध्ये दिलेली असते. त्याला स्पोर्ट्स मोड असे म्हणतात. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोहोंचा उत्तम प्रकारे संयोग साधून निर्माणकर्त्यांनी एएमटी प्रकारातील गिअर बॉक्स सादर केला आहे.

एएमटी प्रकारच्या गिअर बॉक्सचे फायदे

  • एएमटी प्रकारच्या गिअर बॉक्स असलेली गाडी कमी इंधन खर्च करते.
  • भरपूर रहदारीच्या ठिकाणी रोज वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी एएमटी प्रकारातील गाडी अधिक सोयीची ठरते.
  • प्रचलित ऑटोमॅटिक गिअर बॉक्सच्या तुलनेत एएमटी गिअर बॉक्सची किंमत कमी असते.
  • एएमटी गिअर बॉक्स वापरलेल्या गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्स चांगला असतो.
  • ल्ल ड्राय प्लेट प्रकारातील क्लच वापरल्यामुळे प्रचलित ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वापरलेल्या गाडीच्या तुलनेत एएमटी गाडीचा पिकअप चांगला असतो.
  • इतर प्रकारच्या गाडीच्या तुलनेत मेंटेनन्स तुलनेने कमी असतो.
  • एएमटी गिअर बॉक्स असलेली गाडी कमी प्रदूषण करते.
  • एएमटी हे एक कमी किमतीत उपलब्ध असलेला ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा एक प्रकार आहे.
  • या प्रकारचे गिअर बॉक्स (एएमटी) १९८६ पासून फेरारीसारख्या रेसिंग कारमध्ये वापरले जातात.
  • मॅग्नेटी मरेली (इटली) या कंपनीने बनवलेले एएमटी गिअर बॉक्स भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश गाडय़ांमध्ये बसवले जातात.

यापुढे भारतात २०२० सालापर्यंत बहुतांश वाहनांमध्ये एएमटी गिअर बॉक्सचा वापर २० टक्क्यांनी वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

यांच्याशी स्पर्धा

भारतामध्ये लॅण्ड रोव्हर डिस्कव्हरीची स्पर्धा मुख्य स्वरूपात ऑडी क्यू७, बीएमडबल्यू एक्स५ आणि मर्सिडीज बेंझ जीएलई यांच्याशी होणार आहे.

ls.driveit@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Land rover discovery

ताज्या बातम्या