सुरक्षा

अत्यंत सामान्यपणे किंवा सहजपणे नेहमीच उच्चारला जाणारा शब्द. तरीही, या शब्दाबरोबर येणारी जबाबदारी आणि त्याचे वजन मात्र किती तरी पटींनी मोठे. तुम्ही चालकाच्या सीटवर बसलेले असा वा को-ड्रायव्हरच्या सीटवर.. किंवा मागच्या सीटवरचे प्रवासी असा.. तुमची सुरक्षा हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो; परंतु आपल्यापकी बरेच लोक प्रवास करताना सुरक्षेसाठी घेण्याच्या काळजीबाबत ढिसाळपणा दाखवतात. मागच्या सीट्सवर बसल्यावर सीट बेल्ट्स न लावणे, हीदेखील त्यातलीच एक घातक कृती आहे.

मारुती सुझुकीतर्फे करण्यात आलेल्या १७ शहरांतील सर्वेक्षणात, सीटबेल्ट्स किंवा सुरक्षापट्टय़ांचे प्रवासादरम्यानच्या संरक्षणाबाबत असलेले महत्त्व आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन याची अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. साध्या सुरक्षा नियमांचे पालन करणे आपल्याला इतके कठीण का बरे वाटावे? या बाबतीत इतका आळस आपण का करतो? हे नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या परिणामांबाबत आपल्याकडे जागरूकता कमी असल्यामुळे असे होते का? आम्हाला आश्चर्य वाटले, अशी काही अविश्वसनीय कारणे आपण पाहू.

कायदा नाही, कोणतेही नतिक बंधन नाही

४५ टक्के लोकांच्या मते, रिअर सीट बेल्ट्सच्या वापराकडे आपल्याकडे इतके दुर्लक्ष का केले जाते, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याबाबत कोणताही ठोस कायदा आपल्याकडे अस्तित्वात नाही. भारतीय नागरिकांच्या रस्ता सुरक्षेसाठी धोरणांचे नियमन व कायदा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असल्या तरीही, आपली आपण स्वत: जबाबदारी घ्यायला हवी. कायम आपल्या नजर ठेवण्यासाठी कायद्यावर अवलंबून राहण्याची वेळ आता मागे पडली आहे.

संरक्षणावर चांगले दिसण्याची मात

४० टक्के भारतीयांच्या मते, सीट बेल्ट्स लावल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होत असून आपल्याला पाहणाऱ्या लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना पुढच्या, मागच्या आणि डाव्या-उजव्या बाजूनेही अपघात घडण्याचा धोका असतो. परिणामी, तत्काळ मृत्यू ओढवण्याचीही भीती असते. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, व्हॅन्स किंवा स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही)मधून प्रवास करताना होणाऱ्या अपघातांत रिअर सीट बेल्ट्सच्या वापरामुळे ७३ टक्के घट होऊ शकते.

माझे आयुष्य यामुळे खरोखर वाचू शकेल का?

३४ टक्के लोकांच्या मते रिअर सीट बेल्ट्सचा उपयोग आणि विश्वासार्हता फारच थोडी असल्याने त्यांच्या वापरातून आपले आयुष्य खरोखर वाचू शकेल का, असा प्रश्न या लोकांना पडतो. वास्तविक, गाडीचा अपघात झाल्यानंतर, बेल्ट्स लावले नसल्यास प्रवाशांची शरीरे एकमेकांवर किंवा गाडीतील अन्य कठीण भागांवर जोरदार आपटून मरणासन्न जखमा वा मृत्यूच ओढवण्याची भीती असते. ब्रिटन येथील इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट फॉर हायवे सेफ्टीच्या मते, सीट बेल्ट्स न लावल्यामुळे प्रवासी एअरबॅग्स किंवा स्टीअिरग व्हीलच्या दिशेने जोरात फेकले जातात आणि त्याचा वेग साधारण ३५ मल प्रति तास इतका असू शकतो.

जीवनशैली एक महत्त्वाचा मुद्दा

सर्वेक्षणातून हाती आलेल्या माहितीनुसार, ८० टक्के अविवाहित लोक, ६६ टक्के विवाहित व्यक्ती (मुलांशिवाय) आणि ५५ टक्के विवाहित व्यक्ती (मुलांसह) मागच्या बाजूला बसल्यावर सीट बेल्ट्स लावणे पसंत करीत नाहीत. आपल्या जीवनशैलीचा आपल्या सुरक्षेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर फार मोठा परिणाम होतो. अशा क्षुल्लक चुका करण्यासाठी आपले आयुष्य फारच छोटे असते आणि एखाद्या चुकीमुळे आपण आपल्या प्रियजनांची आयुष्ये धोक्यात घालण्याची शक्यता असते.

कपडय़ांविषयी सजग असणे

कपडय़ांची घडी विस्कटण्याच्या कारणामुळे ३२ टक्के लोक सीट बेल्ट्स वापरणे टाळतात. सार्वजनिक वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जास्त उद्भवत असल्यामुळे आपल्यापकी बरेच लोक स्वत:च्या खासगी वाहनांतून प्रवास करणे पसंत करतात. दररोज सीट बेल्ट्स न वापरल्यामुळे किमान १५ मृत्यू होतात, त्यामुळे तुमच्या एका आळसामुळे आपले आयुष्य कमी करून घेऊ नका. जसे कपडय़ांविषयी सजग असता त्याप्रमाणे सीट बेल्ट लावण्यासाठी सजग असणे आवश्यक आहे.

सेंटर फॉर ऑटो सेफ्टी (वॉिशग्टन डीसीस्थित ग्राहक नियमन स्वयंसेवी संस्था) या संस्थेच्या मते, अमेरिकेत मागच्या सीट्सवर बेल्ट्स न लावता बसल्यामुळे वर्षभरात १ हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू होतो.

सीट बेल्ट्सचा योग्य वापर केल्याने मृत्यूचे हे प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी होऊ शकते. आपल्या हाती अशी काही आकडेवारी अद्याप लागली नसली तरीही, २०१६ मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तब्बल ५६३८ लोकांनी सीट बेल्ट्स लावले नव्हते; परंतु आपला आळस हा आपल्या संरक्षणाआड येऊ देऊ नये. पुढच्या सीटवरील लोकांचे जीव मागच्या सीटवरील लोकांपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात, असे काही असते का? यावर सखोल विचार करून आपण सीट बेल्ट न लावण्याची धोकादायक परंपरा संपविणे आवश्यक आहे.

आकडेवारी काय सांगते

  • भारतात मागच्या सीट बेल्ट्सचा वापर ४ टक्क्यांपेक्षा कमी होतो.
  • ६९ टक्के भारतीय कधीही सीट बेल्ट्स वापरत नाहीत.
  • ८० टक्के अविवाहित व्यक्ती कधीही रिअर सीट बेल्ट्स वापरत नाहीत.
  • दक्षिण भारतात सीट बेल्ट्स न वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८० टक्के आहे.
  • पुरुषांमध्ये (९७ टक्के) सीट बेल्ट्स न वापरण्याचे प्रमाण महिलांपेक्षा (९२ टक्के) अधिक आहे.

ls.driveit@gmail.com