दिप्ती शिंदे दळवी
आजची पिढी विचार करते की, ‘लग्नानंतरचं आयुष्य अधिकाधिक कसं सुरक्षित करायचं?’ विवाह समारंभावर कमीतकमी खर्च करून आपण आपल्या भविष्यासाठी अधिक बचत/ गुंतवणूक कशी करू शकतो…

दिल्लीतील एका तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे. त्यात तिने असा दावा केला आहे की, तिच्या पालकांनी तिच्या लग्नासाठी ५० लाख रुपयांची बचत केली असून हे सर्व पैसे ते फक्त दोन-तीन दिवसांच्या लग्नसमारंभावर खर्च करणार आहेत. मात्र, पालकांच्या या निर्णयावर त्या तरूणीचं असं मत आहे की, जर हेच पैसे तिच्या भविष्यासाठी गुंतवले गेले असते, तर ती आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र झाली असती.

ही पोस्ट केवळ कोणाला, कोणासाठी, कशासाठी आणि किती पैसे खर्च करायचे आहेत यासंबंधी नसून ही पोस्ट म्हणजे आधुनिक भारतातील बदलत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक मूल्यांचं प्रतिबिंब आहे.

प्रश्न पैशांचा नाही, तर मूल्यांचा

वरकरणी पाहता पालक आणि मुलीमधील हा वाद ‘खर्च विरुद्ध गुंतवणूक’ असा जरी वाटत असला तरीही खोलात जाऊन विचार केल्यास जाणवेल की हा प्रश्न ओळख, प्रतिष्ठा, सामाजिक स्वीकार आणि कुटुंबाच्या भावनिक समाधानाचा आहे. माणूस म्हटला की तो निर्णय घेताना फक्त तथ्य काय आहेत यांकडे लक्ष न पुरवता ज्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे त्या मुद्द्यासोबत जोडल्या गेलेल्या भावनांचाही खूप तीव्रतेने विचार करतो. त्यामुळे लग्नासारख्या मुद्द्याशी आणि त्यात जेव्हा ते स्वतःच्या मुलीचं असतं, तेव्हा भारतीय पालकांच्या अनेक भावना तीव्रतेने उफाळून येतात. आणि हे आजच्या काळातही कोणीही अमान्य करणार नाही असं सत्य आहे.

आजूबाजूच्या लोकांची मतं, वधू-वर दोन्ही पक्षांच्या कुटुंबातील परंपरा, त्या दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा आणि भावनिक गरजा अशा अनेक घटकांचा भारतीय लग्नांवर आणि त्या लग्नांसंबंधित एकूणच सर्वच निर्णयांवर कमालीचा प्रभाव पडत असतो.

बहुसंख्य भारतीय पालक जेव्हा स्वतःच्या मुलीच्या लग्नावर पुष्कळ खर्च करण्याचा विचार करतात आणि प्रत्यक्षात पुष्कळ खर्च करतातही, तेव्हा ते फक्त विवाहस्थळाची सजावट, जेवणव्यवस्था किंवा दागिने यांवर त्यांचा पैसा खर्च करत नसतात; तर ते जाणतेअजाणतेपणी त्यांच्याही कळतनकळत वधू-वरांच्या कुटुंबाचा सन्मान, त्यांची समाजातील प्रतिष्ठा, संबंधित नातेवाईकांमधील मानमरातब, आयुष्यभर पाहिलेलं, फ़ुलवलेलं आणि जपलेलं स्वप्न आणि आपल्या मुलीच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी इत्यादी सर्व बाबी जपण्याचा प्रयत्न करत असतात.

समाजशास्त्रज्ञ थॉर्स्टीन व्हेब्लेन यांनी अशा प्रकारच्या खर्चाचं वर्णन Conspicuous Consumption म्हणजेच ‘दिसण्यासाठी किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी केलेला खर्च’ या शब्दांत केलं आहे.

आपल्याकडे भारतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील खाजगी बाब न मानली जाता दोन कुटुंबांना जोडणारा दुवा मानलं जातं आणि त्यामुळे लग्न हे दोन समाजघटकांचा उत्सव मानला जातो. परिणामी, लग्न हा अनेकदा सामाजिक सादरीकरणाचा मंच बनतो.

भारतीय मुलींच्या पालकांची मानसिकता समजून घेणं गरजेचं

भारतातील बहुसंख्य पालक त्यांच्या मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नासाठी आर्थिक बचत करण्यास सुरुवात करतात. बऱ्याच कुटुंबांमध्ये तर मुलगी जन्माला येताच तिच्या लग्नासाठी दागदागिनेही बनवायला सुरुवात केली जाते. आता हा विचार आणि वर्तनामागे अनेकविध कारणं आहेत. पण त्यातील मुख्य कारणं म्हणजे- लग्नात मुलीच्या अंगावर व्यवस्थित दागिने नाही घातले; दोन्ही पक्षांकडील नातेवाईक आणि पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार आणि मानपान नाही केला; सर्वांच्या जेवणाखाण्याची नीट सोय नाही केली; दोन्ही पक्षांच्या सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठेला साजेसं विवाहस्थळ नाही शोधलं (आणि इत्यादी इत्यादी…), तर पालक म्हणून आपल्यावर टीका होईल; आपल्या आर्थिक क्षमतेवर शंका घेतली जाईल; मुलीवरच्या आपल्या प्रेमावर बोट ठेवलं जाईल किंवा कदाचित पुढे जाऊन सासरी मुलीचा छळ होईल (आणि इत्यादी इत्यादी…). असा भयाधिष्टीत, चिंताधिष्टीत विचारच पालकांना (विशेषकरून मुलीच्या पालकांना लग्नसमारंभासाठी अधिक खर्च करण्यास भाग पाडतो.

नव्या पिढीचा बदललेला दृष्टिकोन

आजच्या केवळ मुलीच नाही तर एकूणच सर्व पिढी आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळा विचार करते. आजच्या पिढीच्या अधिमान्यता (Priorities) खूप वेगळ्या आहेत. आजच्या पिढीला आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणूक, उद्योजकता, करिअर, निष्क्रिय उत्पन्न (Passive Income) आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता इत्यादी बाबींमध्ये जास्त रस आहे. आधीच्या पिढयांसमोर प्रश्न होता – ‘लग्न केवढ्या मोठ्या प्रमाणावर करायचयं?’ आणि आजच्या पिढीसमोर प्रश्न आहे – ‘लग्नानंतरचं आयुष्य अधिकाधिक कसं सुरक्षित करायचं?’ आधीच्या पिढयांसाठी लग्न या विषयाबाबत सामाजिक प्रतिष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा होता तर आजच्या पिढीतील अनेक तरुण-तरुणींसाठी लग्नाच्या संदर्भात विवाह या काही वेळेसाठी मर्यादित असणाऱ्या समारंभावर कमीतकमी खर्च करून आपण आपल्या भविष्यासाठी अधिक बचत/गुंतवणूक कशी करू शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

भारतीय तत्त्वज्ञान विवाहाकडे कसं पाहतं?

आपल्याकडे ‘विवाह’ हा सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. धर्मपालन, आदर्श सहजीवन, कुटुंबनिर्मिती, सामाजिक स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगती हे घटक भारतीय विवाहसंस्थेचा आधारस्तंभ आहेत. सप्तपदी, अग्निसाक्ष, परस्पर जबाबदाऱ्या आणि सहजीवनाची प्रतिज्ञा यांनाच आपल्याकडे महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि सत्य तर हेच आहे की आपल्या कोणत्याच पौराणिक ग्रंथामध्ये विवाह हा भव्यदिव्यच असला पाहिजे किंवा लाखो-कोटी रुपयांचा खर्च झालाच पाहिजे, असा उपदेश किंवा साधी सूचनाही दिली गेलेली नाही. पण याचसोबत आपल्याकडे ‘अतिथी देवो भव’ असंही म्हणण्याची परंपरा आहे. सामूहिक भोजन, संगीत, नातेवाईकांसोबत आयुष्याचा आनंद घेणं आणि उत्सव यांनाही आपल्याकडे महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यांना आनंद आणि आदरातिथ्याची जोड देणं हे आपल्याकडे ओघानं आलेलं आहे. परंतु असं असलं तरीही विवाहसमारंभ हे सामाजिक स्पर्धेचा विषय होता कामा नयेत आणि लग्नामागील मुख्य उद्देश आणि मूल्यं मागे पडता कामा नयेत.

मात्र गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला की कळेल की, विवाह समारंभामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब इत्यादी समाजमाध्यमांमुळे विवाह हा अनेकदा सामाजिक प्रदर्शनाचा कार्यक्रम बनला आहे. डेस्टिनेशन वेडिंग, डिझायनर कपडे, सेलिब्रिटी फोटोग्राफर, आलिशान हॉटेल्स आणि भव्य सजावट इत्यादी खर्चिक गोष्टीनी आपल्या लग्नसंस्थेत हळूहळू प्रवेश केला आहे. यामुळे काही ‘तुलना’प्रेमी आणि ‘स्पर्धा’प्रेमी मंडळी लग्न करताना ‘अमक्याने इकडे लग्न केलं, आपणसुद्धा तिकडे जाऊनच लग्न करू’; ‘अमक्याने प्री-वेडींग फोटोशूट या समुद्रकिनारी केलं, आपण त्या किल्ल्यावर प्री-वेडींग फोटोशूट करू’, इत्यादी स्पर्धादर्शी विचारांमध्ये आणि कृतींमध्ये अडकतात आणि अनाठायी खर्च करून बसतात. आणि गंमत म्हणजे अशी स्पर्धा केवळ तरुणतरुणींमध्येच नाही तर त्यांच्या पालकांमध्येही सुरू होते, असं बऱ्याच जणांचं निरीक्षण आहे.

सुवर्णमध्य काय असू शकतो?

मग प्रतिष्ठेसाठी लग्नावर अमाप पैसा खर्च करायला तयार असणारी मंडळी जी बहुतकरून आधीच्या पिढीतील असतात आणि विशेषकरून मुलींचे पालक असतात आणि लग्न करताना कमीत कमी खर्च व्हावा असा विचार करणारी मंडळी जी बहुतकरून आजच्या तरुण पिढीतील आहेत आणि विशेषकरून तरुणी आहेत (जेणेकरून त्यांच्या पालकांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नाही) अशांनी या वादातून सुवर्णमध्य कसा काढायचा? तर त्यासाठी काही उपाय खाली दिले आहेत :

१. पारंपारिक मूल्यं जपत साधेपणाने आणि आनंदाने लग्न करणं.

२. फक्त इतरांना दाखवण्यासाठी, असलेल्या किंवा नसलेल्या आर्थिक सुबत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी कर्ज काढणं किंवा अवास्तव खर्च करणं टाळणं.

३. लग्नाच्या खर्चाबरोबरच नवविवाहित जोडप्याच्या भविष्यासाठी काही रक्कम गुंतवणं.

४. पालकांच्या भावनांना आणि मुलांच्या आर्थिक स्वप्नांना योग्य तो मान आणि न्याय देणं.

५. कुटुंबाच्या प्रतिष्ठेपेक्षा दीर्घकालीन आर्थिक सुबत्ता व स्थैर्याला प्राधान्य देणं. ही पोस्ट म्हणजे फक्त ५० लाखांच्या लग्नाचा मुद्दा नाही आहे, तर ती जुन्या आणि नवीन पिढीच्या विचार, भावना, मूलयं आणि प्राधान्यक्रम यांच्यातील दरीचा आरसा आहे. आणि तार्किकदृष्ट्या विचार केला तर जुन्या व नवीन पिढीने सामोपचाराने अशा प्रश्नांवर चर्चा करून त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत जेणेकरून दोन्ही पिढ्यांच्या विचार आणि भावनांना योग्य तो न्याय आणि मान मिळेल.