मुलगा असो वा मुलगी.. पोटी कोणीही जन्माला आली तरी ते आपलं अपत्य असतं. मग ते अपत्य लुळं, पांगळं असलं तरीही ते आपलंच असतं. कोणाच्या पोटी कोणी जन्म घ्यावा हे ठरवणारे आपण कोण? पण तरीही आजच्या २१ व्या युगात मुलगी नको म्हणणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. मी आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या संयुक्ताला एकत्रच डोहाळे लागलेले. त्यामुळे दोघींच्या घरात आनंदी आनंद होता. पण तिच्या घरात जास्त आनंद. कारण त्यांना वंशाचा दिवा हवा होता. आणि आम्हाला मात्र, सुदृढ बाळ!

तिची सासू अन् माझी सासू एकदा सहज गप्पा मारत बसलेल्या. माझ्या मोठ्या जावेला मुलगी होती. त्यामुळे आता बारक्या सुनेला मुलगा व्हावा असं संयुक्ताच्या सासूनं माझ्या सासूला सांगितलं. माझी सासू तशी पुढारलेल्या विचारांची. तिने कधीच मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. त्यामुळे सासूबाई म्हणाल्या, “कोणीही होवो. सुदृढ होवो म्हणजे झालं.” पण संयुक्ताच्या सासूबाई त्यांच्या विचारांवर ठाम. “एकतरी मुलगा हवाच ना घरात. वंशाचा दिवा नको का?” असं त्या म्हणाल्या. पुढे बराच वेळ या दोन्ही सासवा बोलत राहिल्या. एकमेकींची चर्चा रंगली होती. तेवढ्यात त्या म्हणाल्या, “पापी माणसांच्या पोटी मुलगी जन्माला येते. म्हणून मुलगी नको. बाकी काही नाही.” हे ऐकताच माझ्या सासूबाईंना प्रचंड राग आल्या. त्या पटकन म्हणाल्या, “तुमच्यासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या बायकांमुळेच मुलींची प्रगती थांबलीय. तुमच्यामुळेच स्त्री भ्रूण हत्या होते. अशा विचारांच्या माणसांबरोबर मला कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत.”

हेही वाचा >> हा तर महिलांचा अपमान! मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांनी शरीरधर्म उरकण्यासाठी किती पायपीट करावी?

माझ्या सासूमुळे हे नातं कायमचं एका क्षणात तुटलं. पण त्याला संयुक्ताची सासूच कारणीभूत होती. त्या पुन्हा आमच्या घरी फिरकल्या नाहीत. दोघींची मैत्री एका क्षणात तुटली. मधल्या काळात मी आणि संयुक्ता एकमेकींशी बोलत होतो. एकमेकींना काय खायला हवंय-नकोय ते पाहत होतो. लग्नानंतरची ती माझी पहिली मैत्रीण होती. त्यामुळे माझी तिच्याबरोबर चांगली गट्टी जमली होती. म्हणूनच, दोघींना एकत्र दिवस गेल्यावर आम्ही एकमेकींची जीवाभावाच्या मैत्रीणीपेक्षाही जास्त काळजी घेतली. एवढंच कशाला आम्ही एकमेकींचं ‘मॉम टु बी’ सुद्धा सेलिब्रेट केलं. फक्त आम्ही हे आमच्या सासवांपासून लपवून ठेवलं.

सातवा महिना संपल्यानंतर आम्हा दोघींनाही आता बाळंतपणाचे वेध लागले होते. दोघींनी एकाच हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं होतं. त्यामुळे चेकअपला एकत्रच जायचो. दोघींना मागच्या-पुढच्या तारखा दिल्या होत्या. पण आमची एकत्रच प्रसुती होतेय की काय असं वाटत होतं. एकेदिवशी सकाळी मला कळा जाणवू लागल्या. असह्य वेदना होत होत्या. काय करू कळत नव्हतं. सासूबाईंना कळवलं. त्याही लागलीच आल्या. नवऱ्याने तत्काळ मला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी आजच प्रसुती होईल, असं सांगितलं. त्यामुळे धाकधुक वाढली होती. संध्याकाळच्या सुमारास माझी नैसर्गिकरित्या प्रसुती झाली. छान गुटगुटीत मुलगी जन्माला आली. बाळ जन्माला आल्याचं कोण आनंद पसरला होता. मुलगा की मुलगी यापेक्षाही सुदृढ बाळ माझ्या पदरात होतं याचा जास्त आनंद होता. सर्व कुटुंब हरखून गेलं होतं. चिमुकलीच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होते. सासू-सासरे, नवरा, जाव यांनी फक्त हत्तीवरून पेढे वाटायचे बाकी ठेवलं होतं.

हेही वाचा >> पत्नीची आई झाल्यानंतर नवऱ्याने जोडले विवाहबाह्य संबंध, पतीच्या दुसऱ्या लग्नाआधीच असे तोडले बाशिंग!

तेवढ्यात संयुक्ताच्या सासूचा माझ्या नवऱ्याला फोन आला. माझी प्रसुती झाली का विचारायला त्यांनी फोन केला होता. मुलगी झाल्याचं कळताच त्यांनी “बरं का..छान छान..”, इतकीच निरुत्साही प्रतिक्रिया दिली. फोन ठेवता ठेवता त्या कुजबुजल्याच, “मला वाटलं मुलगा होईल. पण हिलाही मुलगीच व्हावी.” आम्ही सारे आनंदात होतो. त्यामुळे त्यांना उत्तर देत बसलो नाही.

दुसऱ्याच दिवशी संयुक्ताला प्रसुती कळा जाणवू लागल्या. तिलाही माझ्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संध्याकाळी तिची डिलिव्हरी झाली आणि तिलाही मुलगीच झाली….

माझ्या सासूबाईंना तिच्या डिलिव्हरीबद्दल कळल्यावर त्याही तत्काळ तिला बघायला गेल्या. तिचंही गुटगुटीत बाळ पाहून सासूबाईंना आनंद झाला. पण संयुक्ताची सासू जरा नाराजच दिसली. कारण त्याच म्हणाल्या होत्या ना… “पापी माणसांच्याच पोटी मुलगी जन्माला येते. “

हेही वाचा >> आईने लेकीच्या सासरी रमू नये, पण घरच लेकीचं असेल तर? सूनेच्या घरावर हक्क कोणाचा?

निरुत्साहाने का होईना, संयुक्ताच्या सासूने बाळाचं कोडकौतुक केलं. स्वागत केलं. आणि येता-जाता सुनेला टोमणे मारणं सुरूच ठेवलं! पण काळ सरकत गेला तसा सासूबाई या मुलीमध्ये प्रचंड रमल्या. त्यांनी त्यांच्या लेकीसाठी जेवढं केलं नसेल तेवढं या बाळासाठी केलं. तिच्यासाठी करताना त्यांना दिवस पुरत नव्हता. शेवटी त्याच माझ्या सासूला म्हणाल्या, “मुलगी घरात जन्माला यायला पदरात पुण्य असावं लागतं हो!”

– अनामिका