A posture for stretching the spine | Loksatta

पाठीच्या कण्याचे ‘स्ट्रेचिंग’ करण्यासाठीचे आसन

सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात कशी करायची हे आपल्याला माहितच आहे. ‘प्रणमासन’ ही ती पहिली स्थिती. त्यानंतरचे आसन म्हणजे ‘हस्त उत्थानासन’. श्वसनक्षमतावृद्धीस मदत करणारे, पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारणारे हे आसन आहे.

पाठीच्या कण्याचे ‘स्ट्रेचिंग’ करण्यासाठीचे आसन
पाठीच्या कण्याचे 'स्ट्रेचिंग' करण्यासाठीचे आसन

डॉ. उल्का नातू-गडाम

सूर्यनमस्काराचा दुसरा टप्पा म्हणजे हस्त उत्थानासन. आपण प्रणमासनानंतर अथवा स्वतंत्ररित्याही दंड स्थितीतील एक आसन म्हणून याचा सराव करू शकता.

असे करा आसन-

  • या आसनातील पूर्वस्थिती म्हणजे प्रणामासनाची अंतिम अवस्था किंवा दंड स्थितीतील प्राथमिक अवस्था असू शकेल.
  • आता दोन्ही पाय एकमेकांना जोडून हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताच्या बरोबर मानही वर जाईल. आता डोके, हात व पाठ तीनही थोडे पाठीमागच्या बाजूला झुकवा. हात वर घेताना खोलवर व दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना ‘ओम रवये नमः’ हा मंत्र मनात अथवा मोठ्याने म्हणा.

आसनाचे फायदे

या आसनाच्या सरावाने श्वसनक्षमता वाढते. पाठीच्या कण्याला उभ्या दिशेने खेच मिळाल्याने पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते. ओटीपोटातील रक्तसंचय कमी होतो. आसन सोडताना सावकाश पुन्हा दंडस्थितीत या किंवा पाद हस्तासनाच्या दिशेने वाटचाल करा.

आपण हे पाहिलेच, की ‘शौच’ म्हणजे शुचिता-पावित्र्य. या टप्प्यानंतरचा विचार या आसनात करायचा असतो. दुसरा नियम- संतोष. ‘आता बास. पुरे!’ ही भावना मनात येणे म्हणजे संतोष.

‘संतोष: सन्निहित साधनात् अधिकस्य अनुपादित्सा’ असे मानले जाते. अध्यात्मिक साधना करण्याच्या वाटेवर समाधान खूप महत्त्वाचे आहे.

आज एक गाडी असेल तर दुसरी हवी, एक मोबाइल असेल तरीही दुसरे सिम कार्ड, नवीन मॉडेलचा ‘लेटेस्ट’ बाजारात आलेला दुसरा महागडा फोन, चमचमीत खाणे, कपडे, दागिने, स्वतःची प्रसिद्धी या सर्व बाबींमध्ये आपण कुठेच थांबायला तयार नाही. हातात येणारा पैसा झगमगाटाची दुनिया, छानछोकी, चंगळवाद, हे एका मर्यादेपर्यंत आनंद देऊ शकतात. पण, समाधान मात्र होतेच असे नाही. आपल्या सर्वांना ‘मोरइजम’ म्हणजे हव्यासाच्या नवीन व्हायरसने पछाडलेले आहे. त्याला कुठलेही व्हॅक्सिन किंवा लस उपयोगी पडणार नाही. त्याला फक्त स्व-नियंत्रणाची मात्रा उपयोगी आहे. ही मात्रा अशा योगासनांच्या सरावातून अंगवळणी पडू शकेल.

ulka.natu@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2022 at 14:47 IST
Next Story
नातं कधीच शीळं होणार नाही, जर…