अंतराळ विज्ञान या अगदी वेगळ्या भासणाऱ्या आणि शालेय पुस्तकांमधून फारशी ओळख न होणाऱ्या विषयात भारतातील अनेक शाळकरी मुलींना रुची उत्पन्न होईल असा उपक्रम सध्या सुरू आहे. यात ७५० मुलींनी मिळून एका उपग्रहाची उभारणी केली आहे. हा उपग्रह कक्षेत फार काळ राहिला नाही आणि त्यांना अपयश आले. पण आता त्या अपयशावर मात करत दुसरा उपग्रह अंतराळात धाडण्यासाठी ‘त्या’ सज्ज आहेत.

हेही वाचा >>>मॅट्रिमोनिअल साइट्सवर शोधत आहात आयुष्याचा जोडीदार? फसवणुकीपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

‘स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल’च्या (एसएसएलव्ही) ‘आझादी सॅट’ या उपग्रहाचे ऑगस्टमध्ये झालेले प्रक्षेपण सिमरन, तन्वी आणि हरी यांच्या जीवनाची दिशा बदलणारे होते… ७५० मुलींनी मिळून आठ किलो वजनाच्या ‘आझादी सॅट’ या उपग्रहाची उभारणी केली, त्यात या तिघींचा समावेश होता. तो पहिला उपग्रह भूस्थिर कक्षेत फार काळ स्थिरावू शकला नाही. मात्र त्या अपयशावर मात करत आता त्यांनी तयार केलेला दुसरा उपग्रह डिसेंबर महिन्यात अंतराळात पाठविण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्त्रो) गेल्या शनिवारी मध्यरात्री ‘जीएसएलव्ही एमकेथ्री’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ३६ उपग्रह प्रक्षेपित करत एक इतिहास रचला. त्याकडे या सर्व भारतीय मुलींचे बारकाईने लक्ष होते. या सर्व मुली ग्रामीण भारतातील शाळांमध्ये शिकत आहेत, हे विशेष. तर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुली या अकरावी किंवा बारावीत आहेत. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील या शाळकरी मुलींनी तयार केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण आता येत्या डिसेंबर महिन्यात अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>मेंदू आणि शरीराच्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाचीच!

सिमरन, तन्वी आणि हरी या तिघींनी अवकाशयानामध्ये वापरण्यात आलेले तापमान, आर्द्रता आणि अवकाशीय स्थानासंदर्भातील सेन्सरच्या कोडिंगचे काम केले आहे. अवकाश तंत्रज्ञान या विषयात स्वारस्य घेतलेल्या अमृतसरच्या सिमरनसमोर तर आता करिअरसंदर्भातील नवीन दालने उघडली गेली आहेत. ‘मला अभियंता व्हायचे नव्हते. गणित तर मला मुळीच आवडत नाही. मला खरेतर डॉक्टर व्हायचे होते. पण अवकाशात डॉक्टरचे काम काय?’ ती भुवया उंचावत म्हणते. पण जेव्हा तिला असे कळलं, की भारत लवकरच अवकाशामध्ये अंतराळवीर पाठवणार आहे, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याप्रसंगी तिने म्हटले, की मग मी अंतराळातील डॉक्टर होऊ शकते. गणिताबद्दलची अनास्था सिमरनला कोडिंग करण्यापासून रोखू शकली नाही. ‘स्पेस किड्ज् इंडिया’ या चेन्नईस्थित अंतराळ संस्थेने ऑनलाइन पद्धतीने याविषयीचे प्रशिक्षणात्मक वर्ग घेतले. त्यात त्यांनी यासंबंधी बहुतेक सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्या बळावर आम्ही सर्वजण आम्हाला पाठवलेल्या चिपचे कोडिंग करू शकलो, असेही सिमरन सांगते. अमृतसरच्या ‘गव्हर्नमेंट गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्मार्ट स्कूल’मध्ये सिमरन अकरावीत शिकते आहे.

हेही वाचा >>>करियर आणि घर: आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर सगळं शक्य

या प्रकल्पावर काम करायला लागल्यापासून तिने अंतराळ विज्ञान या विषयामध्ये विशेष रस घ्यायला सुरूवात केली होती आणि मंगळावर खरोखरच जीवसृष्टी आहे का, हे जाणून घेण्याची तिलाही ओढ लागली आहे. सिमरनचे वडील हे प्लंबर, तर आई गृहिणी आहे. मात्र तिच्या स्वप्नांचे पंख परिस्थितीपुढे झुकलेले नाहीत. ‘ज्या वेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण होत होते, त्या वेळी अनेक मोठ्या वैज्ञानिकांना मी भेटले. आता तर मलाही काहीतरी भव्यदिव्य करायचे आहे,’ असे ती भारावल्या स्वरात सांगते.

तमिळनाडूच्या थिरूमंगलम् इथल्या ‘गव्हर्नमेंट गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल’च्या दहावीच्या वर्गातली विद्यार्थिनी असलेली हरी वैष्णवी तर प्रयोगांती तयार केलेला कोड सेन्सर तिच्या तळव्याचा स्पर्श होताच त्याचे तापमान आणि आर्द्रता शोधू शकल्याने आश्चर्यचकित झाली होती. हरी वैष्णवीला आता अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात खूप काही करायचे आहे. या मुलींनी तयार केलेल्या सेन्सर्सची जुळणी-जोडणी नंतर ‘स्पेस किड्ज् इंडिया’च्या वतीने उपग्रहामध्ये करण्यात आली.

‘स्पेस किड्ज् इंडिया’च्या संस्थापक आणि सीईओ डॉ. श्रीमथी केसन म्हणतात, ‘आम्हाला ग्रामीण भारताचा चेहरा बदलायचा आहे. ग्रामीण भागातील मुली केवळ घरात किंवा शेतात काम करतात, ही प्रतिमा आम्हाला बदलायची आहे. किंबहुना, अवकाशात अंतराळयानांचे प्रक्षेपण करणाऱ्या मुली घडवायच्या आहेत.’

हेही वाचा >>>भारतीय महिला फूटबॉलमधील ‘उद्याचे तारे’ घडण्यासाठी…

ऑगस्टमध्ये या विद्यार्थिनींना श्रीहरीकोटा येथे नेण्यात आले. अंतराळयानाच्या प्रक्षेपणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्याची संधी त्यांना इथे मिळाली. मात्र चेन्नईत असताना दुसऱ्या दिवशी तो उपग्रह अंतराळ कक्षेत राहू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतरही श्रीमथी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह कणभरही कमी होऊ दिला नाही.

‘या घटनेने आम्ही किंचितही दुःखी किंवा निराश झालो नाही. उलट आपल्या चुकांमधूनच आपण कसे शिकले पाहिजे हेच आम्हाला सांगण्यात आले. प्रत्येक वेळी आम्हाला यश मिळेलच असे नाही. पृथ्वीच्या कक्षेत असताना त्यावर कदाचित आपण नियंत्रण मिळवू शकतो, परंतु एकदा का उपग्रह अंतराळात गेला की तिथे आपण काहीही करू शकत नाही,’ असे तन्वी पटेल सांगते. गुजरातच्या मेहसाणातील ‘बी. एस. पटेल कन्या विद्यालय, लाडोल’ची ती अकरावीची विद्यार्थिनी आहे.

तन्वीच्या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांनी दोन सेन्सर्सवर काम केले आहे. त्यापैकी एकाद्वारे तापमान आणि आर्द्रतेची माहिती घेतली जाते आणि दुसऱ्या सेन्सरने उपग्रहाच्या उंची आणि वेगाचा मागोवा घेतला जातो. ‘या प्रकल्पामधून आम्ही खूप काही नवीन शिकलो, जे प्रत्यक्षात आमच्या अभ्यासक्रमात कधीच नव्हतं. भविष्यात शक्य झालं तर इंजिनिअरिंग शिकून मला इस्त्रोमध्ये काम करायला आवडेल,’ असे तन्वी सांगते.

हेही वाचा >>>का रे अबोला?

या मुलींना जम्मू आणि काश्मीरमधील ‘गव्हर्नमेंट गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल’चे शिक्षक हिलाल अहमद सोफी यांसारख्या मार्गदर्शकांनीही पाठिंबा दिला आहे. सोफी यांच्या शाळेतील विद्यार्थी इयत्ता नववीचे होते आणि उपग्रहासंदर्भातील बहुतांश काम हे दहावी-अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे. या विद्यार्थ्यांना इतरांबरोबर विचारविनिमय करायला, समजून घ्यायला वेळ तर मिळालाच शिवाय अवकाश तंत्रज्ञानाबद्दल शिकायलाही मिळाले.

या सर्व मुलींच्या आता हे लक्षात आले आहे, की अवकाश हे काही फक्त वैज्ञानिक, शास्त्रज्ञ यांचेच क्षेत्र नाही, तर ते कुणाचेही क्षेत्र असू शकते. उपग्रह म्हणजे काय, तो कसा तयार करतात किंवा अंतराळ तंत्रज्ञान हे आता यांच्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान राहिलेले नाही, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला आहे. इतकेच नाही, तर त्यांनी तयार केलेला उपग्रह अवकाशात भ्रमणही करू लागला आहे.