scorecardresearch

आई xx दे की रिप्लाय!

‘आई xx दे की रिप्लाय…’ असा विकृ़त भाषेतला मेसेज त्यांनी पाठवला. …यांच्यात एवढी हिंमत येते कुठून? एका बाईनं आपल्या मेसेजला उत्तर दिलं नाही त्यामुळे यांचा पुरुषी इगो इतका का बरं दुखावतो?

आई xx दे की रिप्लाय!
सध्या आजूबाजूला समाजमाध्यमांवर स्त्रियांविषयी अशीच भाषा वापरण्याची जणू चढाओढ सुरू असल्याचंच चित्र आहे

प्राची पाठक
आईवरून दिलेल्या शिवीचे हे शीर्षक वाचून थोडं दचकायला होईल ! शिवीच्या जागी फुल्या द्याव्यात हे प्रसिद्धीचे संकेत. तरीही अशी शिवी एका बाईला खुलेआम देण्याची हिंमत अनेक पुरुष दाखवतात… समाजमाध्यमावरील माझं लेखन वाचून माझ्याशी संवाद साधू पाहणाऱ्या एका पुरुषाकडून मला असाच मेसेज आला तेव्हा मीही उडालेच. तसं फारसं आश्चर्य वाटलं नाही खरं तर, कारण सध्या आजूबाजूला समाजमाध्यमांवर स्त्रियांविषयी अशीच भाषा वापरण्याची जणू चढाओढ सुरू असल्याचंच चित्र आहे. … तर मला असा मेसेज पाठवणाऱ्या महाशयांना मी प्रत्यक्ष ओळखत असल्याचं काही कारणच नाही, त्यामुळे आमच्यात संवाद घडण्याचा तसा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु या महाशयांच्या दोन मेसेजना उत्तर न दिल्यानं ‘आई xx दे की रिप्लाय…’ असा विकृ़त भाषेतला मेसेज त्यांनी मला पाठवला खरा. आणि हा मेसेज वाचल्यावर अशा प्रवृत्तीचा आणखी खोलात जाऊन विचार करू लागले- यांच्यात एवढी हिंमत येते कुठून? एका बाईनं आपल्या मेसेजला उत्तर दिलं नाही त्यामुळे यांचा पुरुषी इगो इतका का बरं दुखावतो?

आणखी वाचा : नवरा नको गं आई, मला नवरा नको!

तशी समाजामध्यमांवर मी अगदी मोकळेपणाने व्यक्त होत असते. माझे अनुभव. माझा प्रवास. माझी बाग, अन्य कामांविषयी सतत लिहीत असते. त्यामुळे अनेक लोक माझ्याशी संवाद साधत असतात, माहितीची देवाण- घेवाण करत असतात. हे आजवर माझ्यासाठी काही नवीन नाही. समाजमाध्यम हे संवादाचं एक व्यापक जाळं आहे. तिथे हरप्रकारचे लोक असतात. त्यात स्त्रियांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक स्त्रिया तिथे बिनदिक्कत व्यक्त होत असतात. मनमोकळेपणाने आणि ठामपणे आपली मतं मांडत असतात. अनेकजणी आपले अनुभव शेअर करत असतात. काही जणी त्यांच्या लिखाणातून, फोटोंमधून आपले अनुभव सांगत असतात. अनेक तरुणी तर माझ्यासारखं स्वत:चं स्वतंत्रपणे पेज चालवतात. एकूणच आपल्या अस्तित्वातून जे जग त्यांनी पाहिलंलं असतं त्या जगाचं वाचकांना कुतूहल असतं. अशा असंख्य जणी हे जग समाजमाध्यमांवर हे जग इतरांसाठी खुलं करतात. मग वाचकालाही त्यांच्याशी संवाद साधावासा वाटतो. अशावेळी या स्त्रियांच्या पेजवर व्यक्त होणं, त्यांच्याशी बोलावंसं वाटणं, आपलं मत लिहावंसं वाटणं यात काहीच गैर नाही. परंतु खासकरून फक्त स्त्रियांना उठसूट मेसेजेस पाठवणारे असे खूप बहाद्दर असतात. बरं, हे मेसेजेस म्हणजे आधी नुसतंच सेफ असं hi असतं. बरेच दिवस एकतर्फी हाय-बाय केल्यावर किंवा लगेचच कोणालाही तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता अशा प्रकारचे वैयक्तिक प्रश्न विचारणारे असतात. मेसेजेसला उत्तर मिळालं नाही, तर सतत पाठपुरावा करणं, एकतर्फी मेसेजेस, स्मायली पाठवत राहणं आणि काहीच झालं नाही तर शिवीगाळ सुरू करणं… हे खूप कॉमन होत चाललं आहे.

आणखी वाचा : World Aids Day 2022 : अद्याप महिलांमध्ये जागरुकता नाहीच!

मोकळेपणानं व्यक्त होणाऱ्या कोणाही स्त्री-पुरुषाला आपल्या मनासारखं लिखाण नसेल, आपल्या मतांसारखं काही मांडलं नसेल, तर लगेच वेड्यात काढणं, टोपण नावं देणं, आई-बहिणीवरून शिव्या देणं हे वाढत चाललेलं दिसतं. हे करून कोणाला कसं सुनावलं, हा क्षणिक आनंद-इगो मिळू शकतो, परंतु त्यातून तुम्ही स्वतःचंच किती मोठं नुकसान करून घेत असता, हे लक्षात येत नाही का?. एकाने दुसऱ्याला शिवीगाळ केली, पण त्याचं काय वाकडं झालं, असं वाटून आणखीन लोक आयाबहिणींवरून दिल्या जाणाऱ्या गलिच्छ शिव्यांवर उतरतात. यात स्त्री-पुरुष सर्वच कळत नकळत सामील होतात.
ओळखपाळख नसलेल्या कोणाशीही इतकं शिवी देण्याइतकं प्रकर्षाने असं आपल्याला काय बोलायचं आहे, का बोलायचं आहे? समोरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईटचे रतीब घालत सुटले आहोत का, हे विचारणार का स्वतःला? काही नाही, तर उगाच कसलं तरी फॉरवर्ड पाठव, फुलं पाठव, सूचक कविता पाठव किंवा थेट मैत्री करणार का, असं लिहून मैत्री होते का? मग आपला मेसेज वाचला गेला की नाही, ब्लू टिक आल्या की नाही, ही तगमग सुरू होते. ब्लू टिक किती काळाने आली, रिप्लाय आला तर किती काळाने आला, याची गणितं सुरू होतात.

आणखी वाचा : World Aids Day 2022 : अद्याप महिलांमध्ये जागरुकता नाहीच!

तुम्हाला खासकरून स्त्रियांशी बोलावसं वाटत असेल, संवाद साधावा असं वाटत असेल, तर त्या- त्या विषयांशी संबंधित तुम्ही लिहू शकता. केवळ hi, hello पलीकडे काही स्पेसिफिक विषयांच्या चर्चेत भाग घेऊ शकता. आई बहिणीवरून शिवी देण्यात कोणता पुरुषार्थ आहे? आपल्या शिव्यांचे अर्थ बघितले तरी आपण काय बोलतोय याची जाणीव होईल. बहुतांश शिव्या आई आणि बहीण यांच्यावरूनच असतात. पुरुषांवर विशेष नसतात. असं का असावं? शिवी देण्याची उर्मी ही राग व्यक्त करायचं साधन मानली, शिवी ही अगदी ओवीसारखीच, असं हे भाषिक अभ्यासाचं साधन जरी मानलं, तरीदेखील इतकं तळमळून आपल्याला का ते साधन वापरायचं आहे? हे स्वतःला जरुरच विचारायला हवं. तोंडात सतत शिव्या, खोचक टोमणे असलेली, राग नियंत्रणात न राहणारी व्यक्ती मित्र म्हणून दूरच, आपल्या आसपास तरी कोणाला किती काळ आवडेल आणि त्यातून कोणता संवाद साधला जाणार? कोणत्या मैत्रीचं बीज रुजणार?

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच: कुत्र्यांची भीती वाटते?

आपण समाजमाध्यमांवर लिहितोय म्हणजे अज्ञात, अनोळखी पोकळीत लिहीत नसतो. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातले लोक देखील आपल्याला तिथे बघत असतात किंवा त्यांच्यापर्यंत आपलं लिखाण जाण्याच्या हजारो शक्यता असतात. कायद्याची, नियमांची चौकट असते. हे सगळं तोडून आपल्याला केवळ आपल्या इगोपायी, आपल्या मनाविरुद्ध जे काही असेल त्याला अशा घृणास्पद पातळीवर का न्यायचं आहे? दुसऱ्याची संमती ही कोणत्याही नात्याचा पाया असते. तीच जर नसेल, तर शिव्या देऊन ती आपल्याला मिळणार आहे का? हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं, तितकंच अशा व्यक्तींना सहन न करणं देखील महत्त्वाचंच. आईबहिणीवरून शिव्या देऊन मिळणारं कॅथार्सिसदेखील संवेदनशीलतेनं विचार केल्यावर आपलीच हीन अभिरुची आणि दर्जा दाखवतं, हे तसं वागणाऱ्या लोकांना जाणवून देणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच यावर बोलत राहिलं पाहिजे. स्त्रियांप्रति असलेले सामाजिक व्यवहार सुधारण्यात त्यानं मदतच होईल. पण एक खरं की, अशा धेंडांविरोधात ठामपणे उभं राहून स्त्रियांनी आपलं मत ठामपणे व्यक्त करत राहायला हवं.
prachi333@hotmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:59 IST

संबंधित बातम्या