मंगला कपूर या स्वत:ला राखेतून उठणारा फिनिक्स पक्षी मानतात. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांच्यापुरता सीमित नाही. कितीही संकटे आली तरी आयुष्य सकारात्मकतेने कसं जगायचं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मंगला कपूर यांचं जीवन आहे. समाजाप्रती कृतज्ञता म्हणून अनेक गरजू मुलांना त्या मोफत संगीत शिकवतात. दुर्घटनेमुळे त्यांच्या शरीराला इजा झाली, पण त्यांचं मन, बुध्दी आणि ध्येयाला मात्र त्यांनी या इजेचा कधीही स्पर्श होऊ दिला नाही.

संगीत तणाव कमी करतं, संगीत तुमचा मूड फ्रेश करतं, संगीताची साथ असेल तर कधीच एकटेपणा जाणवत नाही असं म्हटलं जातं. पण संगीत कुणासाठी तरी आयुष्यभराचा सोबतीही ठरू शकतं. पद्मश्री मंगला कपूर यांची कहाणी ऐकल्यावर याची प्रचिती येते. सातत्याने प्रचंड वेदना, उपहास, टीका पदरात येऊनही त्यांनी निराश न होता आपलं आयुष्य तर उभारलंच, पण इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श समोर ठेवला आहे. त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रो. मंगला कपूर या बनारस हिंदू विद्यापीठातील माजी प्राध्यापक आहेत. संगीतातील अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘काशीच्या लता मंगेशकर’ म्हणून त्यांना ओळखलं जातं.

संगीतासाठी जीवन समर्पित केलेल्या मंगला कपूर यांच्यावर त्या सातवीत असताना ॲसिड ॲटॅक झाला होता. एखादी मुलगी अशा परिस्थितीत कोलमडून गेली असती. पण मंगला कपूर यांनी आपल्या वेदनेला सुरांची साथ दिली आणि संपूर्ण आयुष्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. शास्त्रीय संगीतातील प्रतिष्ठित विदुषी म्हणून त्यांची ओळख आहे. संकल्प, ध्येय, ध्येयाचा पाठलाग करण्यासाठीची जिद्द आणि सातत्य यांचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. मंगला कपूर. जीवघेण्या संकटावरही त्यांनी संगीताच्या शक्तीच्या साथीने मात केली. त्यांचं कुटुंबं व्यावसायिक घराणं होतं. तीन भावंडांमधील एकुलती एक मुलगी म्हणून मंगला संपूर्ण कुटुंबाच्या प्रचंड लाडक्या होत्या.

सातवीत असताना मध्यरात्री त्यांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं गेलं. त्या तेव्हा फक्त ११ वर्षांच्या होत्या. व्यावसायिक शत्रुत्वातून हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला फक्त त्यांच्या चेहऱ्यावरच झाला नाही तर त्यांचं संपूर्ण बालपण, तारुण्य त्यानं हिरावलं गेलं. हा हल्ला इतका भयानक होता की वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर तब्बल ३७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आणखी एका दुर्घटनेत त्यांच्या मांडीच्या दोन्ही हाडांनाही जबरदस्त दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याबरोबरच त्यांच्या शरीराच्या काही भागावरही अत्यंत वाईट पध्दतीने त्याचा परिणाम झाला होता. पण या दुर्घटना त्यांच्या मनाला कमकुवत बनवू शकल्या नाहीत. त्यांचा आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन बदलू शकलं नाही. प्रचंड वेदना, वर्षानुवर्षे चाललेले कंटाळवाणे उपचार असूनही त्या कधीही मोडून पडल्या नाहीत.

प्रो. मंगला कपूर यांच्या या प्रवासात त्यांच्या वडिलांना त्यांना सगळ्यात मोलाची साथ दिली. शाळेत असताना मुलं मंगला यांची थट्टा करायची, चिडवायची, अगदी ‘तुला बघून आम्ही घाबरतो,’ असंही सांगायची. साहजिकच याचा त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम झाला होता. कितीतरी वेळा आत्महत्या करावी असा विचारही त्यांच्या मनात आला होता, असंही त्या कबूल करतात. पण हे नकारात्मक विचार झटकून त्या संगीताच्या साथीने पुढे जात राहिल्या. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयातच सुवर्णपदकासह पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि पुढे पीएच.डीही केली. गाण्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत असत. त्यांच्या गोड आवाजामुळे त्या लवकरच लोकप्रिय झाल्या. त्यांना तरंग संस्थेच्या वतीने ‘काशी की लता’ असे सन्मानित करण्यात आलं.

तरीही मंगला कपूर यांच्यापुढील रस्ता सोपा नव्हता. त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून गाणं न ऐकताच त्यांना नकार दिला जात असे. पण बनारस हिंदू विद्यापीठाच्याच महिला महाविद्यालयामध्ये मंगला कपूर यांची लेक्चरर म्हणून नियुक्ती झाली. आपल्या आवाजाने आणि स्वभावाने त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनल्या.

प्रा. मंगला कपूर यांचे आत्मचरित्र ‘सीरत’ चे २०२१ मध्ये प्रकाशन झाले. त्यांच्या आत्मचरित्रात ॲसिड हल्ला आणि त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यातील घटनांवर, त्यांना सहन कराव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक वेदनांवर लिहिले आहे. मंगला कपूर या स्वत:ला राखेतून उठणारा फिनिक्स पक्षी मानतात. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांच्यापुरता सीमित नाही. कितीही संकटे आली तरी आयुष्य सकारात्मकतेने कसं जगायचं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मंगला कपूर यांचं जीवन आहे. समाजाप्रती कृतज्ञता म्हणून अनेक गरजू मुलांना त्या मोफत संगीत शिकवतात. दुर्घटनेमुळे त्यांच्या शरीराला इजा झाली, पण त्यांचं मन, बुध्दी आणि ध्येयाला मात्र त्यांनी या इजेचा कधीही स्पर्श होऊ दिला नाही. संगीत केवळ एक कला नाही तर त्यांना मिळालेलं पुनर्जीवन आहे, असं त्या मानतात. प्रा. मंगला कपूर यांच्या कार्याला सलाम!