scorecardresearch

घर आणि करिअर : कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे

प्रत्येक करिअर करणाऱ्या स्त्रीने कुटुंबाचा डोलारा सांभाळताना आपल्या कामाचा समतोलही साधायला हवा तरंच घर, करिअर आणि नातेसंबंध यांची गुंफण उत्तमरीतीने साधली जाईल.

घर आणि करिअर : कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे
प्रत्येक करिअर करणाऱ्या स्त्रीने कुटुंबाचा डोलारा सांभाळताना आपल्या कामाचा समतोलही साधायला हवा तरंच घर, करिअर आणि नातेसंबंध यांची गुंफण उत्तमरीतीने साधली जाईल.

कविता लाड- मेढेकर

घर आणि करिअर याचा मी जेव्हा माझ्यापुरता विचार करते तेव्हा खूप समाधान वाटतं. कारण याबाबतीत जे माझ्या मनात होतं तसंच झालं. मला एक ‘बॅलन्स्ड’ आयुष्य हवं होतं. म्हणजे केवळ उत्तम करिअर केलं असतं आणि कुटुंबाच्या आघाडीवर सगळ्या गोष्टी जमल्या नसत्या तर मला तेही आवडलंच नसतं. त्यासाठीच मी स्वतः जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या, जपल्या आहेत. त्यामुळे उत्तम भूमिका, उत्तम काम तर मला करता आलंच, पण त्याचबरोबर आपली माणसंही कायम जोडलेली राहिली. 

माझा नवरा, मुलं, नातेवाईक, सासू सासरे आणि आई-वडील या सगळ्यांचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण. ते दिवस आणि माझा वाढदिवस, माझ्या कुटुंबाबरोबर साजरा करावा असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे दिवाळीला सकाळी प्रयोग करणं मला कधीच पटलं नाही. आतासुद्धा जेव्हा मी पुन्हा नव्याने नाटकाला सुरुवात केली, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चे प्रयोग लागले. तेव्हा प्रशांतला (दामले) मी म्हटलं होतं, की गणपती आणि दिवाळीला प्रयोग नको लावू. त्यानं ते मान्य केलं म्हणून मी प्रयोग करायला तयार झाले. गणपतीची सारी जबाबदारी माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर सोपवली आहे. ती मी अगदी मनापासून पार पाडते. खरंतर माझ्या सासूबाई गेल्यानंतर माझे सासरे मला म्हणाले, “अगं, नाटकाचे प्रयोग, शूटिंग या तुझ्या सगळ्या कामात तुला हे सगळं जमेल का? नाहीतर आपण गौरींचं विसर्जन करू आणि गणपती दीड दिवस करू.” त्यावर त्यांना मी सांगितलं की तुम्ही दिलेला हा पर्याय मी नक्की लक्षात ठेवते, पण सध्या तरी मला जमेल तितके दिवस करतेच. मला स्वतःला मुळात या गोष्टी खूप आवडतात.    

घरात या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघत आल्यामुळे माझा मुलगा ईशान आणि मुलगी सनाया दोघांनाही या सगळ्यांची आवड आहे. अर्थात एवढं सगळं असून कधीतरी सणासुदीच्या दिवसांतही प्रयोग करावे लागतात, दौरे करावे लागतात कारण प्रेक्षकांनाही तेच दिवस सुट्टीचे मिळतात. नाटक चालायचं असेल तर अशा तडजोडी कराव्याच लागतात. त्यावरून आठवलं, एका वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मी नेमकी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मनातून रुखरुख होतीच मी घरी नसल्याची. पण मला माझा नवरा आशीषने जेव्हा घरचे फोटो पाठवले तेव्हा मात्र मला आश्चर्य वाटलं. सानू त्यावेळी सहावीत होती. तिने सगळ्यांना आग्रह केला, की आपण गुढी उभारू या. तिनेच फुलं आणायला सांगितली, गुढीची पूजा केली. हे सगळं ऐकल्यावर, आणि तो फोटो पाहिल्यावर मला खरंच भरून आलं. मुलं आपलंच अनुकरण करतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे संस्कार आपल्या कृतीतून व्हावेत असं मला नेहमी वाटतं. माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत ते समाधान मला निश्चित मिळतं. मला आठवतं, ईशान जेव्हा १० वीला होता, तेव्हा त्याच्या प्रिलीमच्या वेळी माझा दुबई-आबुधाबीचा दौरा ठरला. तो कॅन्सल करायच्या विचारात मी होते तर ईशानने मला निक्षून सांगितलं, “दहावी माझी आहे, अभ्यास मला करायचाय, तू का दौरा रद्द करतेस? तू बिनधास्त जा. मी अभ्यास करेन.” आणि त्याने त्याचं प्रॉमिस पूर्ण केलं. त्याला १० वीला ९१ टक्के गुण मिळाले. 

आणखी वाचा – विवाह समुपदेशन : तरुण पिढीला नाती टिकवणं अवघड का जातं?

यामागचं कारण कदाचित त्यांच्या वाढीच्या वयात मी त्यांच्याबरोबर पूर्णवेळ होते हे असेल. अभिनयाच्या करिअरमध्ये जवळजवळ १० वर्षांचा पूर्णवेळ ब्रेक घेऊन ते जाणते झाल्यानंतरच मी पुन्हा अभिनयाच्या माझ्या आवडत्या क्षेत्रात आले. माझं म्हणणं हेच होतं, की मी माझ्यासाठी लग्न केलंय, मग नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाप्रमाणेच घरातल्या या सगळ्या गोष्टींनाही मी प्राधान्य दिलं पाहिजे. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा टीव्हीवर माझ्या तीन मालिका आणि एक नाटक चालू होतं. ज्याचे भरपूर प्रयोग सुरू होते. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात असं व्हायला लागलं, की घरातल्या कुठल्याच कार्यक्रमांना मी नसायचे. घरातले काहीच बोलायचे नाहीत, पण मीच थोडी अस्वस्थ झाले आणि काम थोडं कमी केलं. निर्माते सुधीर भट यांना म्हटलं, “मी महिन्याला १५ प्रयोग करते, पण १५ दिवस माझ्या घरच्यांसाठी राहू देत.” वास्तविक घरच्यांना माझ्या कामाची पूर्ण कल्पना होती सासूबाई असेपर्यंत काही प्रमाणात गणपतीतही मी शूटिंग करतच होते. पण त्यांनी कधीच याबाबतीत आडकाठी केली नाही. पण माझंच म्हणणं होतं, की आपण एखादा प्रोजेक्ट घेतो तेव्हा त्या प्रोजेक्टला पुरेसा वेळ देतो ना, तर तसंच आहे, लग्नानंतर घर-संसारालाही पुरेसा वेळ आपण दिला पाहिजे. अर्थात संसार दोघांचा आहे, त्यामुळे दोघांनी वेळ दिला पाहिजे, असं आशीषचंही म्हणणं आहे.        

आणखी वाचा – पुरुषांना बायकांच्या मनातलं ऐकायला आलं तर….

आशीष नवरा म्हणून तर सगळी जबाबदारी उत्तम सांभाळतोच, पण तो चांगला बाबाही आहे. म्हणूनच कदाचित आजही शूटिंग असो, नाटकाचा प्रयोग किंवा देश-परदेशातला नाटकाचा दौरा असो, आशीषमुळे मी अगदी निवांतपणे घराबाहेर पडू शकते. अर्थात मी जरी घराबाहेर असले तरी घरातली मॅनेजमेंट पूर्णपणे माझ्याकडेच असते. म्हणजे आता मी दीड महिना अमेरिकेत होते तरी रोज स्वयंपाकाच्या बाईला सांगणं, करवून घेणं हे मी तिथूनच करत होते. बाकीच्या गोष्टी आशीष सांभाळतोच. माझी सगळी सपोर्ट सिस्टीम उत्तम आहे. इतकी वर्षं ती घडी नीट बसवल्यामुळे आता काहीच त्रास होत नाही.        

याशिवाय दोन्ही मुलांना वाढवताना आमच्यात संवाद कसा उत्तम राहील हे आम्ही आवर्जून पाहिलं. मुलं वयात येईपर्यंत मी त्यांच्या बरोबर कायम होते. त्यांच्या दुखण्या खुपण्यापासून अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष होतं. त्यामुळे ते दोघं सगळ्या गोष्टी आमच्याकडे शेअर करतात. उत्तम संवादामुळे आम्ही चौघं एकत्र असतो तेव्हा चांगला सिनेमा पाहणं किंवा एखाद्या छान रेस्टॉरंटला जेवायला जाणं, आयुष्य एंजॉय करणं हे आम्हाला खूप आवडतं. समुद्रकिनारा हा आमचा सगळ्यांचा विक पॉइंट आहे. त्यामुळे समुद्रकिनारी फिरायला जाणं हाही आमचा आवडीचा विरंगुळा.      

मुळात मी आणि आशीष, आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यामुळे घर, संसार आणि करिअरची घडी उत्तम बसली. सगळ्यांच्या सपोर्टशिवाय एखाद्या करिअर करणाऱ्या बाईला उत्तम करिअर करणं हे कठीणंच जाऊ शकतं.        

प्रत्येक करिअर करणाऱ्या स्त्रीने कुटुंबाचा डोलारा सांभाळताना आपल्या कामाचा समतोलही साधायला हवा आणि त्यासाठी आवश्यक त्या परिस्थितीत कधी दोन पावलं मागे येत कुटुंबाचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरंच घर करिअर आणि नातेसंबंध यांची गुंफण उत्तमरीतीने साधली जाईल, असं मला मनापासून वाटतं. 

शब्दांकन – उत्तरा मोने 

uttaramone18@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress kavita lad talk about her career and personl life see details kmd