नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडीशामध्ये कमळ फुलले आहे. त्यामुळे भाजपाने मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली आहे. तर, भाजपाने या राज्यातही दोन उपमुख्यमत्र्यांची निवड केली आहे. यानिमित्ताने ओडिशाला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. के. व्ही. सिंग आणि प्रवती परिदा हे ओडिशाचे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

राजनाथ सिंह यांनी एका X पोस्टमध्ये म्हटले आहे की, “श्री मोहन चरण माझी यांची ओडिशा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्याला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेणारे ते तरुण आणि गतिमान पक्षाचे कार्यकर्ता आहेत. त्यांचे खूप खूप अभिनंदन.”

हेही वाचा >> “मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

ओडिशाचे निवडून आलेले मुख्यमंत्री मोहन चरण माझी , त्यांचे उपमुख्यमंत्री केव्ही सिंह देव आणि प्रवती परिदा यांच्यासह बुधवारी भुवनेश्वरमधील जनता मैदानावर शपथ घेतली. केव्ही सिंह देव यांनी पटनागढमधून बीजेडीच्या सरोज कुमार मेहेर यांचा १३५७ मतांनी पराभव केला, तर अन्य उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी निमापारा येथून बीजेडी नेते दिलीप कुमार नायक यांचा ४५८८ मतांनी पराभव केला.

कोण आहेत भाजप नेत्या प्रवती परिदा?

भाजपा नेत्या प्रवती परिदा या निमापारा येथील स्थानिक आहेत, तिथून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. व्यवसायाने वकील असलेल्या परिदा यांनी भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठातून एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ओडिशा उच्च न्यायालयात वकीली केली आहे.

अनेक वर्षे वकीली करत असताना परिदा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी पहिल्यांदा ओडिशामध्ये भाजपच्या महिला विंगच्या अध्यक्षा म्हणून काम केले. त्यांचे लग्न माजी सरकारी कर्मचारी श्याम सुंदर नायक यांच्याशी झाले आहे. प्रवती परिदा या निमापारा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये बीजेडीच्या समीर रंजन दाश यांनी पराभूत केलेल्या निमापारा जागेवरून भाजपा नेत्याने चौथ्यांदा निवडणूक लढवली होती. परिदा यांनी २००९ मध्ये निमापारा येथून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना केवळ ४.५२ टक्के मते मिळाली होती.

भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण?

उत्तर प्रदेशच्या सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसच्या सुचेता कृपलानी यांनी २ ऑक्टोबर १९६३ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आजच्या घडीला पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. तर, नंदिता सत्पथी या ओडिशाच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी १९७२ ते १९७६ मध्ये ओडिशाचं मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं.