आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ | Aharathaveda: snake gourd - Nutritive properties | Loksatta

आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ

लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासात स्थूल व्यक्तींना आहारामध्ये नियमितपणे पडवळाचा वापर केल्यास फायदा होऊ शकेल…

Nutritive properties, snake gourd
आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ

डॉ. शारदा महांडुळे

ग्रामीण भागामध्ये बहुधा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी मांडवावर पडवळे लोंबकळताना दिसतात. लांबलचक, चपटे-जाड, साल फिकट हिरवी, सर्पाकृती आकाराचे पडवळ असल्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला ‘स्नेक गोर्ड’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये ‘पटोल’, तर शास्त्रीय भाषेत ‘ट्रीचोसानथिस डॉईका’ म्हणतात. पडवळ ही वनस्पती ‘कुकर बिटेसी’ या कुळातील आहे. पडवळ ही फळभाजी संपूर्ण भारतात आढळते. त्यात दक्षिण भारतात ती फारच लोकप्रिय आहे. पडवळाचा वेल वर्षांयू आणि भरभर वाढणारा असतो. पडवळाचा वेल हा सहसा उष्ण हवेत वाढतो.

औषधी गुणधर्म

कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, रियबोफ्लेमिन, थायमिन, कॅरोटिन, नायसिन, प्रथिने, आर्द्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, स्निग्धता, हे पोषक घटक असतात. आयुर्वेदानुसार पडवळ हे शीतल, रेचक, सारक, कृमीनाशक आणि वांतीकारक आहे.

उपयोग

  • पित्तप्रकोपाने ताप आल्यास पडवळाचा काढा घ्यायला सांगतात. पडवळ हे रेचक गुणधर्माचे असल्याने पोट साफ होऊन ताप उतरतो. ताप अधिक प्रमाणात असल्यास या काढ्यात कोथिंबीर, काडेचिराईताचा रस व मध घालून प्यायला सांगतात.
  • पडवळामध्ये कमी उष्मांक असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह या आजारांत ते चांगले मानले जाते. या आजारांमध्ये पडवळ नियमित खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर होतो व रक्तपुरवठा सुरळीत होऊन वरील आजार कमी होतात असे मानले जाते.
  • लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठीच्या प्रवासात आहारामध्ये नियमितपणे पडवळाचा वापर करावा असे सांगितले जाते.
  • छातीत धडधडणे, दुखणे, चमका येणे इत्यादी तक्रारींमध्ये पडवळाचा रस दिवसातून ३ वेळा २ चमचे घ्यायला सांगितले जाते.
  • पडवळ हे कृमीनाशक असल्यामुळे पोटातील कृमी शौचावाटे पडून जाण्यासाठी पडवळाच्या बियांची पूड १-१ चमचा दोन वेळा घ्यावी.
  • अपचन, पोटात गुबारा धरणे, शौचास साफ न होणे, या तक्रारींवर पडवळाच्या बियांची पूड १-१ चमचा दोन वेळा घ्यावी. यामुळे पोटातील गुबारा कमी होऊन शौचास साफ होते.
  • सांधे सुजून दुखत असतील, तर अशा वेळी पडवळाच्या पानांचा रस कोमट करून सांध्याच्या ठिकाणी लावायला सांगतात. साध्यांची सूज कमी होते.
  • पडवळाचे मूळ हे रेचक गुणधर्माचे असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचाविकारांवर ते चांगल्या प्रकारे परिणाम करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. पडवळाच्या कोवळ्या फांद्या व वाळलेली फुले यांचा काढा साखर घालून घेतल्यास पचनक्रिया सुरळीत व्हायला मदत होते.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 10:07 IST
Next Story
सासरीही मिळतंय प्रेम आणि पाठबळ – श्रेया बुगडे