डॉ. शारदा महांडुळे

आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली मेथी ही भाजी सर्वांनाच परिचित आहे. संपूर्ण भारतभर मेथीचे पीक घेतले जात असून, स्वयंपाकघरात तिचे स्वतःचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी मेथीची भाजी निसर्गाने दिलेले वरदानच आहे. मेथीला संस्कृतमध्ये ‘मेथिका’, इंग्रजीमध्ये ‘फेनुग्रीक’, तर शास्त्रीय भाषेत ‘ट्रायगोनेल्ला फोनुमग्रीकम’ (Trigonella foenumgroecum) या नावाने ओळखली जाणारी मेथी ‘पॅपिलिओनसी’ या कुळातील आहे.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

आहारामध्ये मेथीची भाजी व बी हे दोन्ही उपयोगात आणले जातात. मेथीचे रोप हे पंचवीस ते पन्नास सें.मी.पर्यंत वाढते. त्याला पिवळ्या रंगाची फुले व तपकिरी छोट्या शेंगा येतात. या शेंगांच्या आतमध्ये बी असते व या बियांचा उपयोग फोडणी देण्यासाठी, मसाल्यासाठी व औषधी म्हणूनही करतात. यांची पाने आकाराने लहान, अंतरा अंतरावर व तीन-तीन पाने एकत्र अशी असतात. याच मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी ही चवीला किंचित कडू पण रुचकर लागते व त्यासोबत शरीर निरोगी ठेवते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : सुश्रुताचार्यांनी मेथी पित्त व वातनाशक, बृहणीय, बल्यकर, पोषक, रक्तशुद्धीकर, उष्ण, तिक्त गुणात्मक, दीपक, पाचक व वीर्यवर्धक सांगितली आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : मेथीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, आर्द्रता, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व घटक विपुल प्रमाणात असतात.

उपयोग :

१) मेथीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे तिचा आहारात नियमित वापर करावा. मेथी नियमित खाल्ल्यास संधिवात, आमवात, गुडघेदुखी व कंबरदुखी असे वातविकार होत नाहीत.

२) मेथी ही वातरोग, बाळंतरोग, मधुमेह, कावीळ, जुनाट ताप, नाक व डोळ्यांचे विकार, पंडुरोग (ॲनिमिया) या सर्व आजारांवर गुणकारी आहे. म्हणून कर्तव्यदक्ष गृहिणीने भाजी, आमटी यांना फोडणी देताना जिरे, मोहरीसोबत मेथीच्या बियांचा आवर्जून वापर करावा.

३) मेथी बीपासून बनवलेले डिंकलाडू व मेथीपाक हे पदार्थ हिवाळ्यामध्ये आवर्जून खावेत. या पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून वर्षभर कोणतेही आजार होत नाही. मेथीपाक बनविण्यासाठी एक किलो मेथी दळून आणून त्यामध्ये दोन किलो साजूक तूप टाकावे आणि त्यानंतर त्यात साधारणत: सात-आठ लिटर गायीचे दूध टाकून हे सर्व मिश्रण उकळावे. साधारणतः मधाप्रमाणे हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये तीन किलो साखर घालावी. अशाप्रकारे मेथीपाक बनवावा.

४) बाळंतिणीने रोज दोन चमचे सकाळ-संध्याकाळ मेथीपाक खावा व त्याबरोबरच खारीक, खोबरे, बदाम, गोडांबी, हळीव व मेथीपासून बनविलेला लाडू रोज एक खावा. यामुळे बाळंतिणीच्या शरीरातील वातप्रकोप कमी होतो व वातविकार टळतात. त्याचबरोबर शरीराची झालेली हानी भरून निघते. तसेच गर्भाशयाचे आकुंचन होऊन रक्तस्राव थांबविण्यास मदत होते.

५) मधुमेह आजार आटोक्यात ठेवण्यासाठी रोज रात्री मेथ्या पाण्यात भिजवून सकाळ-संध्याकाळ दोन-दोन चमचे जेवणाआधी चावून चावून खाव्या. यामुळे शरीरातील ग्लुकोज, एल.डी.एल. कोलेस्टेरॉल (वाईट) व ट्रायग्लेसराईड्स यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व मुत्रातून अतिरिक्त साखर जाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून मधुमेही रुग्णांनी शरीरातील साखरेचे प्रमाण (ग्लुकोज ) आटोक्यात ठेवण्यासाठी मेथीच्या भिजविलेल्या बिया नियमितपणे चावून खाव्यात.

६) भिजवलेले मेथीदाणे दोन चमचे सकाळी उठल्याबरोबर खाल्ल्यास आतड्यात चिकटून राहिलेला मल पुढे ढकलण्यास मदत होते. त्यामुळे शौचास साफ होऊन पोट साफ होते.

७) सौंदर्य उपचारांमध्येही मेथीचा उपयोग होतो. मेथीची पाने वाटून तो कल्क केस धुण्यापूर्वी केसांना लावल्यास केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होऊन केस काळे व मुलायम होतात.

८) केसांमधील कोंडा घालविण्यासाठी मेथी घालून सिद्ध केलेले तेल केसांच्या मुळाशी लावल्यास कोंडा कमी होतो.

९) त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, तसेच काळे डाग, पुटकुळ्या कमी होण्यासाठी मेथीच्या पानांचा कल्क चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळावा. या प्रयोगाने चेहरा उजळ होऊन तजेलदार दिसतो.

१०) शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असेल, तर नियमितपणे मेथीची भाजी खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.

११) गृहिणींनी कल्पकतेने मेथीच्या भाजीचा व बियांचा आहारात वापर करावा. मेथीची भाजी, पराठा, थालीपीठ, तसेच बियांची फोडणी देऊन वेगवेगळे पदार्थ बनवावेत.

१२) कैरीचे, लिंबाचे लोणचे बनविताना इतर मसाल्यांसोबत मेथीच्या बीचा वापर करावा. यामुळे लोणचे रुचकर तर होतेच, शिवाय त्यासोबत आरोग्यही चांगले राखते. या लोणच्यामुळे वातविकार होत नाहीत.

सावधानता :

गर्भवतीने गर्भावस्थेमध्ये सहसा मेथीची भाजी व बीपासून बनविलेले पदार्थ खाऊ नयेत व खाल्लेच तर अगदी कमी मात्रेत खावेत. कारण मेथीमुळे गर्भाशय आकुंचन होत असते व त्यामुळे गर्भपात होणे किंवा बाळाची वाढ कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून शक्यतो मेथीचा वापर गर्भवतीने टाळलेलाच बरा.