scorecardresearch

Premium

आहारवेद : हृदयविकारांत उपयुक्त लसूण

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतरही जर रुग्णाने लसूण खाणे सुरू केले, तर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते.

Garlic useful in heart disease
आहारवेद : हृदयविकारांत उपयुक्त लसूण

डॉ. शारदा महांडुळे

स्वयंपाकघरातील कोणतीही भाजी बनविताना लसणाची फोडणी दिल्याशिवाय ती भाजी रुचकर होत नाही. त्यामुळे प्रत्येक गृहिणीच्या घराबरोबर मनात लसणाने स्थान मिळविले आहे. अगदी प्राचीन काळापासून आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लसणाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद केलेले आहे. आहार, औषधी, सौंदर्यप्रसाधने अशा विविध स्वरूपात लसणाचा वापर केला जातो. लसणाची उत्पत्ती मध्य आशियातील असून, अगदी प्राचीन काळापासून त्याची भारत, फिलिपिन्स, चीन, केनिया, ब्राझील, मेक्सिको अशा अनेक देशांत लागवड केली जाते. मराठीमध्ये ‘लसूण, हिंदीमध्ये ‘लहसुन’, संस्कृतमध्ये ‘लशून’, इंग्रजीमध्ये ‘गार्लिक’, तर शास्त्रीय भाषेत ‘एलिअम सटायव्हम’ (Allium Sativum) म्हणून ओळखला जाणारा लसूण हा ‘लिलीएसी’ कुळातील आहे.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

लसणाचे रोप कांद्याच्या रोपाप्रमाणेच एक ते दीड फूट उंचीचे असते. लसणाची लागवड करताना त्याचे बी नसल्यामुळे लसणाची पाकळी लावून लागवड करतात. त्यानंतर जमिनीत १० ते १५ कळांचा एकत्रित असा लसणाचा गड्डा तयार होतो. त्याचा आकार मोदकाप्रमाणे असतो. जमिनीच्यावर लसणाची पात (पाने) उंच, चपटी व अणकुचीदार येते. याचाही फोडणी देण्यासाठी उपयोग करतात. लसणाच्या पातीचे पिठले ही खरोखरच स्वादपूर्ण डिश असते. बाजरीच्या भाकरीसोबत एकदा तरी प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा. लसणाचे पांढरे आणि लाल असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारच्या लसणाचे गुणधर्म हे साधारणत: साखरेच आहेत.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदामधील अनेक ऋषिमुनींनी लसणाला अमृतासमान मानले आहे. ‘विद्यते वा न द्रव्य लशुनात्परमा’. वातरोगावर लसणासारखे दुसरे प्रभावी औषध नाही. लसणामध्ये वाताचा नाश करण्याची शक्ती आहे. असे लसणाचे महत्त्व या श्लोकात सांगितले आहे. म्हणून वातविकार असणाऱ्या व्यक्तींनी उग्र वासाच्या पण बहुगुणी असणाऱ्या लसणाचा वापर जेवणाव्यतिरिक्त इतर वेळीसुद्धा करावा. अशा रुग्णांनी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिपूर्वक लसणाचे सेवन केले, तर त्यांचे सर्व वातविकार दूर होऊन तो मनुष्य निरोगी दीर्घायुषी जगू शकतो.

आयुर्वेदानुसार : लसूण दीपक, पाचक, वायुसारक, ज्वरघ्न, कामोत्तेजक असे रसायन आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : लसणामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्व, आर्द्रता, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ ही सर्व घटकद्रव्ये विपुल प्रमाणात असतात. वरील सर्व गुणधर्मामुळे लसणाचा हृदय, फुप्फुस व श्वासनलिकेच्या विकारांसाठी, तसेच डांग्या खोकला, कुष्ठरोग, मूत्रमार्गाचे विकार, पोटदुखी, कानदुखी यावरही वेदनाशामक म्हणून वापर करता येतो.

उपयोग :

१) लसूण दीपक, पाचक असल्याने तो खाल्ल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रसरक्तवाहिन्यांमधून रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो. पर्यायाने हृदयविकाराचा धोका टळला जातो. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतरही जर रुग्णाने लसूण खाणे सुरू केले, तर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. खरेतर नंतर काळजी घेण्यापेक्षा सुरुवातीपासून रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार आजार होऊ नये व शरीर निरोगी राहावे या उद्देशाने प्रत्येकाने आहारामध्ये लसणाचा वापर नियमितपणे करावा.

२) लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनावश्यक त्रासदायक जंतूंची वाढ थांबविली जाऊन संसर्गजन्य रोगांचा नाश केला जातो. तसेच शरीरास आवश्यक अशा उपयोगी जीवाणूंची वाढ केली जाऊन शरीर स्वास्थपूर्ण बनविले जाते.

३) स्त्रियांची मासिक पाळी अनियमित येत असेल, तसेच रक्तस्राव व्यवस्थित होत नसेल, तर अशा वेळी चार-पाच लसणाच्या पाकळ्या तुपात तळून खाव्यात.

४) लसूणपेस्ट, खडीसाखर व सैंधव सम प्रमाणात घेऊन त्यात दुप्पट प्रमाणात तूप कालवून त्याचे चाटण करावे. हे चाटण चाटल्याने खोकला, सर्दी, श्वसनसंस्थेचे रोग, संधिवात, आमवात, अजीर्ण, अपचन, पोटात गॅस धरणे, मंदाग्नी, भूक न लागणे हे सर्व विकार दूर होतात.

५) लसूणपेस्ट अर्धा चमचा व अडुळशाच्या पानांचा रस दोन चमचे, गायीचे तूप एक चमचा हे सर्व मिश्रण एकत्र करून चाटण करावे. यामुळे जुनाट खोकला बरा होऊन क्षयरोग हा रोग आटोक्यात येतो.

६) लसणाच्या पाकळ्या पाच-सहा, सैंधव पाव चमचा व तुपामध्ये भाजलेला हिंग पाव चमचा यामध्ये आल्याचा रस दोन चमचे घालून हे सर्व मिश्रण एकत्र करावे. या औषधाचे सेवन केल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊन वजन आटोक्यात राहते. तसेच मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांचे पोटसुद्धा साफ होते.

७) लसूण, कोथिंबीर, बेदाणे, सैंधव, काळी मिरी, जिरे व अर्धा चमचा मिरची पावडर एकत्र करून चटणी करावी व ती जेवताना खाल्ल्यास अरुची कमी होऊन भूक चांगली लागून घेतलेला आहार पचण्यास मदत होते.

८) लसणाचा कल्क (पेस्ट) एक चमचा, वावडिंगाचे चूर्ण एक चमचा, सैंधव पाव चमचा, आल्याचा रस तीन चमचे घेऊन हे सर्व पदार्थ एकत्र करावेत. हे मिश्रण रोज महिनाभर गरम पाण्याबरोबर घेतल्यास सर्दी, खोकला, दमा हे विकार दूर होतात.

९) लसणाच्या चार-पाच पाकळ्या दुधात घालून शिजवाव्यात. हे दूध मुलांना प्यायला दिल्याने जुनाट खोकला बरा होतो.

१०) त्वचेच्या विकारांमध्ये अंगावर खूप खाज येत असेल, तर लसूण वाटून त्याचा कल्क तीळतेलामध्ये शिजवावा. हे सिद्ध झालेले तेल त्वचेवर चोळावे. यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचाविकार आटोक्यात येतात.

११) लहान बालकांनी तसेच बौद्धिक काम असणाऱ्या व्यक्तींनी, बुद्धी व स्मृतीवाढीसाठी आहारामध्ये लसणाचा वापर नियमित करावा.

१२) लसूण केसांच्या आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी लसणाच्या तेलाने डोक्याच्या त्वचेला मालीश करावे व त्यानंतर डोके स्वच्छ धुवावे. याने केसातील कोंडा दूर होतो.

१३) केसांमध्ये उवा झाल्या असतील, तर त्या नाहीशा होण्यासाठी लसणाचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून रात्री झोपताना डोक्याच्या त्वचेला चोळावा. यामुळे उवा केसांमधून निघण्यास मदत होते.

१४) लसूण कफनाशक असल्याने छातीमध्ये जेव्हा कफ दाटतो, तेव्हा लसूणतेल छातीवर चोळावे. त्यामुळे कफ सुटण्यास मदत होऊन त्वरित आराम मिळतो.

१५) संधिवाताच्या विकारावर, तसेच अपघातामध्ये एखादे हाड फ्रॅक्चर झाले असेल, तर ते जोडण्यासाठी, तसेच स्नायू आखडणे, मुरगळणे, लचकणे या सर्व विकारांवर लसणाचे तेल प्रभावी ठरते.

१६) थंडीमुळे तसेच सर्दी झाल्यामुळे कानाचे पडदे बसतात. अशावेळी लसणाची सोललेली पाकळी कापसात गुंडाळून कानात ठेवावी. तसेच कान ठणकत असेल, तर लसणाचे सिद्ध तेल दोन-तीन थेंब कानात टाकावे. यामुळे कानाचा ठणका कमी होतो.

सावधानता :

अनेकजण लसूण खाल्ल्यानंतर उग्र वास येतो म्हणून तो खाण्याचे टाळतात. अशा वेळी तीळ, ओवा, धणादाळ, बडीशेप एकत्र करून हे मिश्रण लसूण खाल्ल्यानंतर खावे. यामुळे तोंडाचा उग्र वास जातो. तसेच लसूण सोलल्यानंतर हाताचा, चाकू किंवा विळीचा गंध घालविण्यासाठी त्या जागेवर मीठ चोळावे व कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aharved garlic useful in heart disease the patient eats garlic chatura article ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×