ज्ञानदेव बाबाराव नजान
समोर मोबाईलवरील व्हिडिओ पाहून निहारिकाच्या पायाखालची जमीन सरकली. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तिच्यासारखीच दिसत होती. चेहरा, हावभाव, आवाज… सगळंच जवळपास तसंच. त्या व्हिडिओमध्ये ती काही आक्षेपार्ह विधाने करत असल्याचं दाखवलं जात होतं. हे पाहून निहारिका हादरली.
“ही मी नाही… मी असं कधीच बोलले नाही. हा व्हिडिओ माझा नाही.”
पण तिचं म्हणणं ऐकून घेण्याआधीच तो व्हिडिओ अनेकांच्या मोबाईलवर पोहोचला होता. काहींनी तो खरा वाटला. काहींनी सोशल मीडियावर शेअर केला. काहींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
एका बनावट व्हिडिओमुळे तिच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ही केवळ एका महिलेची काल्पनिक कथा नाही; तर आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) युगात वाढत चाललेल्या एका नव्या सायबर धोक्याची जाणीव करून देणारी परिस्थिती आहे.
AI तंत्रज्ञानामुळे आज फोटो, व्हिडिओ आणि आवाज अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने तयार करता येतात. या तंत्रज्ञानाचा शिक्षण, आरोग्य, संशोधन, चित्रपट आणि अनेक चांगल्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र कोणतेही तंत्रज्ञान जसं सकारात्मक उपयोगासाठी वापरलं जाऊ शकतं, तसंच त्याचा गैरवापरही होऊ शकतो.
यापैकी एक गंभीर प्रकार म्हणजे AI-Generated False Evidence – म्हणजेच AI च्या मदतीनं एखाद्या व्यक्तीनं न केलेल्या गोष्टी केल्याचा किंवा न बोललेल्या गोष्टी बोलल्याचा भास निर्माण करणारे बनावट फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करणे. महिलांच्या बाबतीत हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो.
समजा, एखाद्या महिलेचे सोशल मीडियावरील काही फोटो सार्वजनिकपणे उपलब्ध आहेत. आधुनिक AI साधनांच्या मदतीने त्या फोटोंचा वापर करून तिच्यासारखा दिसणारा किंवा तिच्या आवाजासारखा वाटणारा आवाज असलेला बनावट मजकूर, ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
अशा सामग्रीचा वापर अफवा पसरवण्यासाठी, बदनामी करण्यासाठी, मानसिक त्रास देण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी होऊ शकतो.
म्हणूनच आज कोणताही फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ पाहताच तो खरा आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. विशेषतः निवडणुका, सामाजिक वाद, प्रसिद्ध व्यक्ती, व्यावसायिक स्पर्धा किंवा वैयक्तिक वाद यांसारख्या प्रसंगी बनावट डिजिटल सामग्री तयार करून ती वेगाने पसरवण्याची उदाहरणे जगभरात समोर आली आहेत. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो-
डिजिटल पुरावा दिसतो म्हणून तो नेहमीच सत्य असेल का?
आज तपास यंत्रणा, न्यायवैद्यक (Digital Forensics) तज्ज्ञ आणि न्यायालये डिजिटल पुराव्यांची तांत्रिक पडताळणी करण्यावर अधिक भर देत आहेत.
महिलांनी अशा परिस्थितीत काय करावे?
सर्वप्रथम घाबरू नका. जर तुमच्या नावाने, फोटोने किंवा आवाजाने बनावट सामग्री तयार झाल्याचा संशय असेल, तर ती लगेच हटवण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच तिचे स्क्रीनशॉट, लिंक आणि इतर उपलब्ध माहिती जतन करा.
संशयास्पद सामग्री पुढे पाठवू नका.
संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवा.
गरज असल्यास सायबर गुन्हे शाखेकडे किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करा.
स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी…
- सोशल मीडियावरील गोपनीयता (Privacy) सेटिंग्ज नियमित तपासा.
- वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिकपणे शेअर करताना आवश्यक ती काळजी घ्या.
- अनोळखी व्यक्तींना उच्च दर्जाचे वैयक्तिक फोटो किंवा आवाजाचे नमुने पाठवणे टाळा.
- कोणत्याही व्हिडिओ किंवा ऑडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा स्रोत तपासा.
- आपल्या कुटुंबातील महिलांना, मुलींना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही AI आधारित फसवणुकीबद्दल माहिती द्या.
आजच्या डिजिटल युगात ‘पाहिलं म्हणजे खरं’ हा नियम राहिलेला नाही.
AI मुळे तयार झालेली सामग्री अनेकदा इतकी वास्तवदर्शी असू शकते की सामान्य व्यक्तीला फरक ओळखणं कठीण जाऊ शकतं.
म्हणूनच प्रत्येक व्हायरल व्हिडिओ, ऑडिओ किंवा फोटोवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी विचार करा, पडताळणी करा आणि जबाबदारीने वागा.
कारण…
काही वेळा खोटा पुरावा तयार करण्यासाठी काही मिनिटे पुरेशी असतात; पण त्यातून झालेली बदनामी दूर करण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षे लागू शकतात.
(सायबर फॉरेनसिक विश्लेषक)
dnyandev.najan@yahoo.in
