Woman Pilot Plane Crash Controversy India : आपण समाज म्हणून जितके विकसित होतोय, त्यापेक्षा कितीतरी पटीने विकृत अधिक होतोय असं वाटतं. कारण, एखाद्या अपयशाचं खापर तिथे असलेल्या महिलेवर फोडून मोकळे होणारे संकुचित मानसिकतेचे लोक आजही पावलोपावली भेटतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्या विमानातून प्रवास करणारे पायलटसह सर्वजण मृत्यूमुखी पडले. अजित पवारांचं हवाई सारथ्य करणारे हे पायलट अगदी नवखे होते अशातला भाग नाही. दोन्ही पायलट सुमीत कपूर आणि शांभवी पाठक अनुभवी होते. पण नियतीपुढे दोघांचाही अनुभव कामी आला नाही. तरीही या अपघाताचं खापर सर्वस्वी को-पायलट असलेल्या शांभवी पाठक यांच्यावर फोडण्यासाठी आपला समाज सरसावला.
एक्सवर काही पोस्ट समोर आल्या. ज्यात असं लिहिलंय की,” मुलींना अजून स्कूटर चालवता येत नाही आणि त्यांना आपण विमान चालवायला देत असू तर हे असंच घडणार आहे. शांभवी माफ कर. पण पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांना संधी देणं म्हणजे आत्मघात करण्यासारखं आहे. याकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे.” ज्या संकुचित बुद्धीने अशी पोस्ट केली होती, त्याने त्याचं अकाऊंटच डिलिट केलं. अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला, कोणामुळे झाला, कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या हा चौकशीचा भाग आहे. चौकशीअंती अहवाल प्राप्त होईल. पण त्याआधीच महिलांवर दोषारोप करणारे कोणत्या मानसिकतेत राहतात हा प्रश्न आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचं एक जुनं ट्वीट व्हायरल होतंय. त्यात त्यांनी म्हटलंय की “जर विमानाचं लँडींग सॉफ्ट होत असेल तर त्यात महिला पायलट आहे असं समजून जावं.” इतका विश्वास अजित पवारांचा महिला पायलट यांच्याबाबतीत होता.

हा विश्वास फक्त पायलटच्या बाबतीतच नव्हे तर अजित पवारांच्या गाड्यांचं अनेकदा महिला चालकांनीही सारथ्य केलंय. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीच स्त्री-पुरुष असा भेद केला नाही. संपूर्ण पवार कुटुंबातही कधीच अशा प्रकारच्या संकुचित मानसिकतेचं दर्शन झालं नाही. खुद्द शरद पवारांनीही सुप्रिया सुळेंच्या निमित्ताने एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. असं असतानाही अजित पवारांच्या मृत्यूचं खापर एका महिलेवर फोडणं म्हणजे अजित पवारांच्या सामाजिक विचारांवर पाणी फेरण्यासारखं आहे.
आज भारतीय वायुदलात १५ ते २० लढाऊ महिला वैमानिक आहेत. ज्या युद्धजन्य परिस्थितीत कार्य करतात. इतकंच नव्हे तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने २०२१ साली जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण वैमानिकांच्या तुलनेत १५ टक्के महिला पायलट आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगात सर्वाधिक महिला पायलट या भारतात आहेत.
एखादं क्षेत्र पुरुषप्रधान कसं ठरतं?
पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांनी येऊच नये अशी मानसिकता असणाऱ्यांनी हे सांगावं की कशाच्या आधारावर तुम्ही एखादं क्षेत्र पुरुषप्रधान आहे असं समजता? पिढ्यान् पिढ्या महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. ज्या काळात महिला बाहेरच पडू शकत नव्हत्या त्या काळात अशी अनेक क्षेत्र तयार झाली जिथं साहजिकच पुरुषांना संधी मिळाली. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नसताना त्या क्षेत्रात महिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करतीलच कशा? जेव्हा स्त्रियांना उंबरठ्यापलिकडे जाऊ दिलं, त्यांच्या शिक्षणाची कवाडं उघडी केली, त्यांना आभाळ मोकळं मिळालं तेव्हा त्यांनी सर्वच क्षेत्र आपल्या कवेत घेतली. तरीही तुम्ही म्हणता की अमूक एखादं क्षेत्र पुरुषप्रधान क्षेत्र?
शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या असं कोणतंच क्षेत्र नाही, जिथं स्त्री कार्यरत राहू शकत नाही. हुशारी, बुद्धीचातुर्य, निर्णयक्षमता, नेतृत्त्वगुण या गोष्टी लिंगावर आधारित नसतात. त्या मुळातच उपजत असाव्या लागतात. या जगात असंख्य अपघात होतात, विमान अपघातही काही नगण्य नाहीत. त्यावेळी पुरुष वैमानिक होता म्हणून अपघात झाला, असा आरोप केला जातो का? अहमदाबाद विमान दुर्घटनेत महिला पायलट होती का, ज्यामुळे जवळपास २६० जणांचा मृत्यू झाला? प्रत्येक अपघाताची कारणं तांत्रिक असतात. पण महिलांमुळेच अपघात होतात असं म्हणणं म्हणजे २१ व्या शतकात संकुचित वृत्तीचं दर्शन होय आणि समाजाने ही संकुचित वृत्ती सोडून देण्याची वेळ आता आली आहे.

