Akshaya Devdhar Hardeek Joshi Wedding Open Letter From a 24 year Old Girl To mother Why She dont want to marry | Loksatta

नवरा नको गं आई, मला नवरा नको!

पत्रास कारण की, तू गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी बोलत नाहीयेस….

नवरा नको गं आई, मला नवरा नको!
नवरा नको गं आई, मला नवरा नको! (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सिद्धी शिंदे

प्रिय आई,

पत्रास कारण की, तू गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी बोलत नाहीयेस. तू, मी आणि आपली चिनू (छोटी बहीण) कित्येक वेळी तुझ्यासासरच्या माणसांसमोर एक टीम म्हणून उभे राहतो. तुला दिला जाणारा त्रास आम्ही रोज पाहातो, तुझ्याबाजूने बोलतो म्हणून कित्येक वेळा बाबांचे टोमणेही खातो; पण आज मी तुझं ऐकलं नाही तर तू त्यांच्या बाजूने उभी राहिलीस? असं का? तुझ्यावर आरोप नाही करायचाय मला. तुझ्या मनात माझं वाईट व्हावं हे चुकूनही येणार नाही, याची खात्री आहे मला. पण आई, तुला जे माझ्यासाठी चांगलं वाटतंय; ते कदाचित मला नकोय, निदान आता या क्षणी तरी!

मुलीच्या लग्नाची काळजी वाटणं यात काहीच चुकीचं नाही. आणि तुला तर नवरीची आई म्हणून मिरवण्याची किती उत्सुकता आहे हे मी लहानपणापासून ऐकलंय. पण लग्न एक दिवस असतं, संसार रोजचा आहे. तुझी हौस मी समजू शकते आणि खरं सांगू, मलाही या लग्नाच्या दिवसाची तितकीच हौस आहे. आजीने जपून ठेवलेली नऊवारी कशी मॉडर्न टच देऊन नेसायची हे ही मी ठरवून ठेवलंय. माझ्या एकटीसाठी नाही तर चिनू आणि तुझ्यासाठी पण मी मेकअपवाली बुक करणार आहे. पण आई, हे सगळं आता लगेच व्हावं अशी माझी इच्छा नाही.

तू लहानपणापासून मला माझ्या पायावर उभं राहायला शिकवलंस, मग आता आयुष्यात स्थैर्य येण्यासाठी मला लग्नाच्या कुबड्या घ्यायला का लावतेयस? आई तुला शोधायचा तर माझ्यासाठी जोडीदार शोध, कारण फक्त माझा सांभाळ करण्यासाठी तू आणि बाबांनी मला नक्कीच सक्षम बनवलं आहे. लग्नाला विरोध नाही, पण या लग्नाच्या हट्टाने मला त्रास होतोय. मला कळतंय की तुम्हाला नातेवाईक विचारतात पण खरं सांग आई, हे नातेवाईक आपल्याला लग्नाचं विचारतात; तेवढी कधी आपल्या तब्येतीची, परिस्थितीची विचारपूस करतात का गं?

तुला आठवतंय, माझ्या यंदाच्या बर्थडेला ‘हॅप्पी बर्थडे’ म्हणायच्या ऐवजी घरात सगळ्यांनी मला बघून काय म्हंटल होतं? हो बरोबर, ‘तुझं काही असेल तर सांगून टाक’, खरं सांगू तर आहे माझं काहीतरी. माझं स्वप्न आहे मला कोणत्याही बेडीत अडकण्याआधी एकदा स्वतःसह आनंदी राहायला शिकायचंय. मला नाही म्हणायला शिकायचंय, मला समजून घ्यायला शिकायचंय, समजावून द्यायला शिकायचंय. एकवेळ पोळ्या भाकऱ्या जमल्या नाहीत तर यूट्युबवर पाहाता येईल पण या बाकीच्या गोष्टी जमल्या नाहीत तर काय करणार? निदान तोपर्यंत मला वेळ दे.

राहिला प्रश्न तुझ्या नेहमीच्या युक्तिवादाचा तर हो माझ्या शाळेतल्या मैत्रिणी एक एक करून लग्न करतायत आणि मी नक्कीच त्यांच्यासाठी खुश आहे. पण जेवढी त्यांच्या मनाची तयारी झाली आहे, तेवढी कदाचित माझी झाली नाही. लग्नासाठी तू आणलेली स्थळं चांगलीच असतील, कदाचित. पण हा असा मोजून मापून होतो तो व्यवहार आणि अमाप होतं ते प्रेम. संसार प्रेमाने टिकतो व्यवहाराने नाही. लग्नानंतर प्रेम होत नाही का? तर असं मला म्हणायचं नाही; पण तेवढी रिस्क घेण्याची आता माझी तयारी नाही, निदान मला प्रेमात पडल्याचा एकदा अनुभव घेउदे, तोपर्यंत मला वेळ दे.

हे ही वाचा << मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

आई तू आजवर स्वतःच्या सासरी संसार करून मला माहेर दिलं आहेस, माझ्या प्रेमळ माहेरासारखंच माझं सासर असावं ही तुझी इच्छा मी समजू शकते पण या हट्टापायी आणि केवळ नातेवाईकांच्या भीतीने माझ्या माहेरीच सासुरवास सुरू करू नकोस. एक इमोशनल पत्र लिहीन असं डोक्यात होतं पण आजवर तुझ्या भावूक होण्याचा फायदा घेऊन तुला कितीतरी नातेवाईकांनी स्वतःच्या म्हणण्यानुसार वागायला लावलं आहे, मला हे करायचं नाहीये. माझे स्पष्ट मुद्दे तुला पटत असतील तर एकदा तुझ्या लेकीची स्पष्टपणे बाजू घे. स्वतःसाठीही आणि माझ्यासाठीही उभी राहा. कुठलंच कारण न देता एकदा मनाला वाटतं म्हणून ‘नाही’ म्हण!

तुझीच…

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:39 IST
Next Story
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मध्यस्ती नकोच