अक्षिताला लष्करी सेवेचा वारसा तिच्या गावातून मिळाला आहे. हरिणायातील झज्जरमधील कसनी हे तिचे गाव. लष्करी सेवेतील परंपरेसाठी हे गाव ओळखले जाते. त्यामुळे लष्करी सेवा, कर्तव्य आणि देशप्रेमाच्या कहाण्या ऐकतच ती मोठी झाली. अक्षिताच्या वडिलांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकदा सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या वडिलांना कर्तव्य पथावर परेडमध्ये संचलन करताना पाहून अक्षिताचा उर अभिमानाने भरून आला होता. ती भारावून गेली होती. याच ऐतिहासिक ठिकाणावर एक दिवस लष्करी गणवेशात उभे राहण्याचे स्वप्नं तिने पाहिले.

प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर होणारे संचलन म्हणजे भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक समृध्दतेचे, विविधतेतून एकतेचे प्रदर्शन असते. पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देशातील स्त्री शक्तीचे, स्त्री सामर्थ्याचेही हे प्रतिक मानले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्रातील महिलांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्याचबरोबर अधिकारपदावर सैन्यातील महिलांची संख्याही वाढत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड.

यंदाच्या म्हणजे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर ध्वजारोहण करण्याच्या वेळेस असण्याचा मान फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता धनखडला मिळाला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सोहळा मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या बरोबर ध्वज फडकवताना त्यांच्याबरोबर असणे हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. यंदा हा मान तरुण महिला अधिकारी अक्षिताला मिळाला आहे. अक्षिताला मिळालेल्या या सन्मानामुळे एक इतिहास रचला जाणार आहे.

कोण आहे अक्षिता धनखड?

अक्षिताला लष्करी सेवेचा वारसा तिच्या गावातून मिळाला आहे. हरिणायातील झज्जरमधील कसनी हे तिचे गाव. लष्करी सेवेतील परंपरेसाठी हे गाव ओळखले जाते. त्यामुळे लष्करी सेवा, कर्तव्य आणि देशप्रेमाच्या कहाण्या ऐकतच ती मोठी झाली. अक्षिताच्या वडिलांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकदा सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या वडिलांना कर्तव्य पथावर परेडमध्ये संचलन करताना पाहून अक्षिताचा उर अभिमानाने भरून आला होता. ती भारावून गेली होती. याच ऐतिहासिक ठिकाणावर एक दिवस लष्करी गणवेशात उभे राहण्याचे स्वप्नं तिने पाहिले. हे स्वप्नंच तिचं ध्येय बनलं आणि ते पूर्ण होईपर्यंत ती थांबली नाही, अखंड मेहनत करत राहिली. दिल्ली विद्यापीठातील श्री. गुरू तेज बहाद्दूर खालसा कॉलेजमध्ये अक्षिताचं शिक्षण झालं. पण इथंच एनसीसीच्या रुपाने तिच्या स्वप्नांनाही पंख मिळाले.

एनसीसीमुळे शिस्त, नेतृत्व या तिच्यातील अंगभूत गुणांचा विकास झाला ज्याचा फायदा तिला पुढे सतत होत राहिला. एनसीसीतील कॅडेट सर्जंट मेजरची रँकही तिनं मिळवली. हवाई दलासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या सज्ज होण्यात एनसीसीतील लष्करासारख्या प्रशिक्षणाची तिला खूप मदत झाली. अक्षिताच्या प्रचंड मेहनती स्वभावामुळे तिला आजही एनसीसी युनिटमध्ये माजी- सीएसएम म्हणून ओळखलं जातं. महाविदयालयीन शिक्षणानंतर अक्षिता एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) उत्तीर्ण झाली. जून २०२३ मध्ये भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून तिची नियुक्ती झाली. तिची कामावरची निष्ठा, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्यामुळे तिला लवकरच फ्लाईट लेफ्टनंट पदावर पदोन्नती देण्यात आली.

आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती जेव्हा ध्वजारोहण करतील तेव्हा त्यांच्यासोबत फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता असेल. स्त्री-पुरुष कोणीही असलं तरी भारतीय हवाई दलामध्ये कर्तृत्वाचाच सन्मान केला जातो, याचं हे प्रतिक आहे. ही संधी तिच्या आयुष्यातील सोनेरी क्षण असेल यात शंका नाही. भारताचा तिरंगा आकाशात फडकल्यानंतर २७ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी तिरंग्याला तर असेलच, पण आपल्या लष्करी सामर्थ्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या अक्षितासारख्या कर्तृत्ववान महिलांसाठीही असेल.

एका छोट्याशा गावातून आलेली देशाच्या भव्यदिव्य सोहळ्यात गणवेशात एक दिवस सहभागी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका ध्येयवेड्या मुलीची ही यशोगाथा फक्त तिच्यापुरती मर्यादित नाही. हवाई दलात अधिकारी होण्याचं आणि देशसेवेचं स्वप्नं पाहणाऱ्या कित्येक तरुणींसाठी तिची कहाणी नक्कीच प्रेरणादायी असेल यात शंकाच नाही.

अक्षिता धनखडबोबरच यावेळेस भारतीय हवाई दलासाठी आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाच्या (IAF) बँडमध्ये नऊ महिला अग्निवीर सहभागी होणार आहेत. सार्जंट चार्ल्ट अँटनी डेनियल यांच्या नेतृत्वात ७५ सदस्यीय हा बँड असेल. त्यात ६६ अग्नीनीरांमध्ये या नऊ महिलाही कर्तव्य पथावर संचलन करणार आहेत.