दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीदेखील आपल्या दिव्यांगावर मात करून अनेकांनी समाजात स्वत:चं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं आहे. या व्यक्तींना पाहिल्यावर आपल्या मनात साहजिकच त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होते. पण यांना मदत म्हणून आपण फार फार तर काय करतो- रस्ता क्रॉस करून देतो, रेल्वे फलाटावर चढण्याउतरण्यास मदत करतो एवढंच काय ते! पण त्याही पलीकडे जाऊन बंगलोरमधील एका ३१ वर्षीय अलीना आलम हिने दिव्यांगांसाठी एक हक्काचं स्वाभिमानाचं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे.

अलीना ‘समर्थनम ट्रस्ट’ द्वारे दिव्यांगांसाठी ‘मिट्टी कॅफे’ नावाचे एक रेस्टॉरंट चालवत आहे. या स्टार्टअपची आयडीया त्यांना त्यांच्या आजीकडून मिळाली. कारण त्यांची आजीसुद्धा एक दिव्यांग महिला होती. ती अलीनाची खूप काळजी घेत असे. घरातील सर्व कामे ती करत असे. आजीकडे पाहूनच तिला दिव्यांग लोकांची काम करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता किती तल्लख असते याचा अंदाज आला. पण समाजाकडून त्यांना मिळणाऱ्या सहानुभूती वागणूकीमुळे किंवा दुर्लक्ष करण्यामुळे त्यांच्यातील टॅलेंट जगासमोर येत नाही. म्हणून अलीनाने कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच ठरवलं होतं की कॉलेज पूर्ण झाल्यावर नोकरी न करता दिव्यांगांसाठी एक एनजीओ सुरू करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं.

Shahnaz Habib who sees a different world through book Airplane Mode
‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
Grandmother taking care of grandchildren
समुपदेशन: मुलांना आजीकडे सोपवताय?
malaika vaz
बिनधास्त, निसर्गप्रेमी मलाइका वाझ
loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!

आणखी वाचा-स्त्री आरोग्य: गर्भवतीची काळजी घेताना…

पुढे वयाच्या १८ व्या वर्षी अलीनाने मुंबईमध्ये ‘विद्यार्थी सामाजिक सुधारणा उपक्रम’ (Student Social Reform Initiative ) नावाची एनजीओ सुरू केले. हे एनजीओ व्यवस्थित चालू असताना काही काळानंतर अलीनाला पुढच्या शिक्षणासाठी बंगलोरला यावं लागलं. इथे सुद्धा तिने ‘पहल’ नावाची आणखी एक एनजीओ सुरू केली. या एनजीओचा उद्देश हाच की, समाजात बदल घडवण्यासाठी तरुण- तरुणी एकत्र येऊन समाजोपयोगी कामे करतील.

नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने पूर्णपणे स्वत:ला यातच झोकून दिले. व ‘समर्थनम्’ नावाची आणखी एक एनजीओ सुरू केली. आधीच्या एनजीओच्या अनुभवाच्या जोरावर अलीनाने ‘समर्थनम्’ ट्रस्ट अंतर्गत मिट्टी कॅफे हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचा उद्देश एकच होता की दिव्यांग लोकांचे जीवनमान सुधारावे. त्यांनादेखील स्वाभिमानाने या समाजात वावरता यावे. तिचा हा उपक्रम चांगला होता. हा उपक्रम सुरू व्हायच्या आधी लोकांनी याची स्तुतीसुद्धा केली. पण हा कॅफे चालू करायला पैसे गुंतवण्यास कोणीही तयार होत नव्हते.

तरीदेखील अलीना हताश झाली नाही. तिने तिचे प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी एक दिवस तिच्या प्रयत्नांना यश आले. तिच्यातील जिद्द पाहून कर्नाटकातील हुबळीमधील देशपांडे फाऊंडेशनने अलीनाला तिचा स्वप्नातला मिट्टी कॅफे चालू करण्यासाठी परवानगी दिली. कॉलेजमधील सहकाऱ्यांच्या मदतीने त्या पहिल्या कॅफेचा सेटअप स्वत: उभारला. कॅफेमधील तिची पहिली कर्मचारी होती कीर्ती. तिच्याकडे व्हीलचेअर नसल्याने ती जमिनीवर सरकत सरकत तिच्याकडे नोकरीसाठी आली होती. अलीना आणि कीर्ती या दोघींनी मिळून पहिला मिट्टी कॅफे एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. कीर्तीदेखील खुश होती. कारण कॅफेमध्ये काम मिळाल्यानंतर तिने स्वत:साठी व्हीलचेअर घेतली. आणि ती स्वत:चं घर देखील सांभाळत होती. सध्या ती कीर्ती ही हुबळी येथील आऊटलेटची मॅनेजर आहे. पहिल्या आऊटलेटला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर मिट्टी कॅफेने कर्नाटक, दिल्ली, कलकत्ता याठिकाणी जवळपास २६ आऊटलेट उघडले आहेत.

आणखी वाचा-समुपदेशन: मुलांना आजीकडे सोपवताय?

संपूर्ण आऊटलेट मिळून जवळपास २५० – ३०० दिव्यांग कर्मचारी काम करत आहेत. या कॅफेमध्ये चहा कॉफीसोबतच छोले भटूरे, पास्ता, मॅगी, जेवणसुद्धा बनवले जाते. यातला एक कॅफे बंगलोर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरसुद्धा आहे. हा कॅफे २४ तास चालू असतो. कोणत्याही विमानतळावर दिव्यांगांद्वारे चालवला जाणारा हा एक एकमेव कॅफे आहे.

अलीना मिट्टी कॅफेच्या माध्यमातून फक्त कॅफेच चालवत नाही तर ती दिव्यांगांना विविध गोष्टींचे प्रशिक्षणसुद्धा देत आहे. आतापर्यंत जवळपास तिने तिच्या एनजीओच्या माध्यमातून ३००० दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षित केले आहे. या प्रशिक्षणाच्यामाध्यमातून काहीजणांनी स्वत:चे व्यवसाय चालू केले आहेत तर काहीजण अजून अनय दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासोबत इतरत्र नोकरीसुद्धा करत आहेत.

अलीनाच्या मते, मिट्टी कॅफे हे तिच्या उदरनिर्वाहाचे साधन नसून समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचा सन्मान मिळवून देणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आपण अपंग आहोत याची त्यांना जाणीव होऊ न देता नेहमी आनंदी ठेवणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्देश आहे. अपंग असल्याने बहुतेक ठिकाणी त्यांना नकारच सहन करावा लागतो. पण मिट्टी कॅफेमुळे त्यांना आता नकार ऐकण्याची काही गरज पडणार नाही. कारण मिट्टी कॅफे हा त्यांचे हक्काचे रोजगाराचे व्यासपीठ आहे. पुढे अलीना सांगते की, आता हा उपक्रम केवळ देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू करायचा आहे. जगभरातील दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांची स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करून देणे हेच आमच्या मिट्टी कॅफे आणि एनजीओचे ध्येय आहे.

आणखी वाचा-उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास

अलीनाच्या या अभिनव उपक्रमामुळे आजपर्यंत तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये ‘आझादी चा अमृतमहोत्सव’ सोहळत्यात नीती आयोगातर्फे अलीनाला वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (WTI), हेलेन केलर ॲवॉर्ड, युनायटेड नेशन्स इंटरकल्चर इनोव्हेशन ॲवॉर्ड, कर्नाटक वुमन अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०२० मध्ये आशियामधील सोशल एंटरप्रेन्युअर अंडर ३० च्या यादीत अलीनाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि चिफ जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांनी या कॅफेला भेट दिली व अलीनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत तेथील दिव्यांग कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा सुद्धा मारल्या.

rohit.patil@expressindia.com