अंजली, एक कर्तबगार महिला. आपले स्वतःचे घर असावे हे तिचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. ऑफिसमधून घरासाठी कमी व्याजदराने कर्ज मंजूर झालेलं होतं. सोयीच्या ठिकाणी फ्लॅटही पसंत पडला. खरेदीची बोलणी करायला ती बिल्डरच्या कार्यालयात पोचली. तिथे तिच्याबरोबर काही अनुचित प्रकार घडल्यावर बावरुन तिने घाईघाईमध्ये तो परिसर सोडला. आणि झालेल्या प्रकाराबाबत एका मैत्रिणीशी चर्चा केली. तिने याबाबत तक्रार करायला हवी असे प्रणोतीने म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिला वारंवार समजावून सांगितले. आधी हे सगळे अंजलीला खूप ऑकवर्ड वाटले. पण तक्रार नाही केली तर त्या व्यक्तिची भीड चेपून तो इतर महिला ग्राहकांबाबतही असे प्रकार करू शकतो हे लक्षात आल्यावर तिने तक्रार करायचे ठरवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सगळ्या चर्चा आणि चिंतनामध्ये जवळपास महिनाभर उलटून गेला होता. आता तक्रार करता येईल का? तर प्रणोतीने सांगितले, हो, नक्कीच. घटना घडलेल्या दिवसापासून तीन महिन्यांच्याआत अशी तक्रार करता येते. कुठे करायची तक्रार? प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती – आयसीसी असते. या समितीमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी ही अध्यक्ष असते. समितीकडे लेखी तक्रार करता येते.
आणखी वाचा : “बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका.. !”

तक्रार नोंदवून घेतली की समिती त्याबाबत चौकशी करते. ही चौकशी तक्रारदार महिलेला कोणताही त्रास होऊ न देता निष्पक्षपातीपणे होईल याची खात्री केली जाते. अंजलीची तक्रार नोंदवून घेतली गेली. चौकशी झाली आणि संबंधित व्यक्तिवर कारवाईची शिफारस समितीने केली.

अंजलीच्या केसमध्ये हे सोपस्कार नीट पार पडले. पण एखाद्या कंपनीमध्ये आयसीसी नसेल तर? तर त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक तक्रार समिती (लोकल कम्प्लेंटस कमिटी – एलसीसी) असते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या समितीची पूर्ण माहिती मिळते. अंजलीबरोबर त्या आफिसच्या प्रमुखानेच काही अनुचित प्रकार केला असता तर? तिला न्याय मिळायची शक्यता किती असणार होती? त्यामुळे एखाद्या कंपनीच्या मालकाबाबत तक्रार करायची असेल तर ती स्थानिक तक्रार समितीकडे करता येते.

ही तक्रार कोण करु शकते?

नोकरी करणारी महिला आपल्या सहकाऱ्याविरोधात, कामानिमित्ताने ऑफिसबाहेर/ दौऱ्यावर गेलेली महिला तिच्या कामकाजादरम्यान अत्याचारास बळी पडली तर, कामानिमित्ताने एखाद्या ऑफिसमध्ये गेलेली महिला तिथल्या अधिकारी/ कर्मचारी/ मालकाच्या विरोधात, घरकाम करणारी महिला त्या घरातील सदस्याविरोधात…

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू?

थोडक्यात लैंगिक अत्याचार कोणत्याही कार्यालयामध्ये अथवा कामाच्या ठिकाणी घडला तर, काम करताना कार्यालयाबाहेर घडला तर, नोकरी करणाऱ्या महिलेवर घडला तर, संबंधित ठिकाणी नोकरी न करणाऱ्या पण केवळ भेट दिलेल्या महिलेवर घडला तर… कामाचे ठिकाण शासकीय कार्यालय, खासगी कंपनी किंवा एनजीओ असेल तर, दवाखान्यापासून क्रीडा संकुलापर्यंत सर्व प्रकारच्या व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक, मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील उत्पादन, पुरवठा, विक्री, सेवा इत्यादी कामकाज होणारी सर्व कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी घडला तर…

अशा कोणत्याही वेळी तक्रार करता येऊ शकते. कायद्याने सुरक्षिततेची खूप हत्यारे दिली आहेत. मात्र त्यांचा वापर करताना ऑकवर्ड वाटून न घेता, संकोच न करता ठामपणे दाद मागणे हे त्या त्या पीडितेसाठी नक्कीच गरजेचे आहे!

More Stories onचतुराChatura
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about posh act what is the purpose nrp
First published on: 19-09-2022 at 19:18 IST