scorecardresearch

आहारवेद बदाम : अन्न आणि औषधदेखील

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. मेंदू, हृदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं.

almond-milk-pic-1-freepik

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मांमुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो.

आणखी वाचा : पहिली रोहिंग्या ग्रॅज्युएट-ताश्मिंदा आहे तरी कोण?

औषधी गुणधर्म
शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक आहे. त्यामुळे बदाम बी स्निग्ध, बलकर, पौष्टिक, वातनाशक व कफकर आहे. या सर्व गुणधर्मांमुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये बदामाचा वापर करतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, स्निग्धता ही घटक द्रव्ये बदामामध्ये असतात. या घटकांनी उत्साह वाढतो व शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहून दीर्घायुष्य लाभतं. बदामाच्या देशी व जंगली अशा दोन जाती आहेत. जंगली बदाम हा चवीला कडू असतो. तर देशी बदाम हा गोड असतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : दुटप्पी वासनेमागेपासून सावध

उपयोग
– बदामाचं तेल केसांच्या मुळाशी लावलं असता केसांना पोषक घटक मिळाल्यानं केसांची वाढ चांगली होते व केस गळणं, कोंडा होणं, अकाली केस पिकणं या समस्या दूर होतात.
– डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार झाली असतील तर बदाम दुधामध्ये उगाळून त्यांचा लेप लावावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. नियमितपणे ही प्रक्रिया केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जातात.
– बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
– बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी सोलून खावेत. याने स्मृतिभ्रंश, विस्मरण हे आजार कमी होतात.

आणखी वाचा : आवडीचं मुल!

– भिजलेल्या बदामाची पेस्ट दुधात कालवून दूध उकळावे व गाईचे तूप, वेलची, साखर घालून त्याची खीर बनवावी. ही खीर खाल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. यासह वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे या खिरीचं सेवन करावं.
– वारंवार डोकेदुखी होत असेल तर बदामाची खीर खावी. तीव्र डोकेदुखीमध्ये बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
– शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यासाठी नियमितपणे ४ बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावेत. यामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलची (एच.डी.एल) निर्मिती होते व वाईट कोलेस्टेरॉलला (एल.डी.एल.) प्रतिबंध केला जातो. तसंच हदयविकार, रक्तदाब हे विकार टाळले जातात.
– जुनाट मलावरोधाची तक्रार असेल तर नियमितपणे झोपताना ६-८ बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.
– चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.
– त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.
– मेंदू, हदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं.
– शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढविण्यासाठी, तिच्या शरीराची झीज भरून तसंच वातप्रकोप कमी करण्यासाठी बदाम, काजू, डिंक, खोबरं, मनुका, चारोळी, पिस्ता, खारीक यांचे गूळ घालून लाडू बनवावेत. रोज नियमित एक लाडू खाल्ल्याने खूप फायदा होतो.

सावधानता
सहसा बदाम बी ही कवचाच्या आत असल्यामुळे सुरक्षित आहे. फक्त बदाम खाताना अति प्रमाणात खावू नये. ते सारक गुणधर्माचे असल्यामुळे अति खाल्ल्यास जुलाब होण्याची शक्यता असते.
sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 07:39 IST