अन्वय सावंत
भारत हा युवकांचा देश असल्याचे अलीकडच्या काही घडामोडींनी अधिक ठळकपणे अधोरेखित केले. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने लाखो मुलं देशभर रस्त्यावर उतरली असताना, अनाहत सिंग या १८ वर्षीय युवतीने कॅनडा येथे झालेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत विजेतेपद पटकावत इतिहास घडवला आणि युवा भारताची ताकद जगाला दाखवून दिली.
लहान वयातच देशाचं प्रतिनिधित्व, जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी आणि स्पर्धागणिक खेळात होत गेलेली सुधारणा असा अनाहतचा प्रवास राहिला. भारतात स्क्वॉश हा खेळ अजूनही क्रिकेट, बॅडमिंटन किंवा टेनिसइतका लोकप्रिय नाही. त्यामुळे या खेळातील खेळाडूंना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीतही अनाहतने आपल्या गुणवत्तेची ठसठशीत छाप पाडली. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही ती सातत्यानं विजेतेपदं पटकावत राहिली. प्रत्येक यशानंतर तिच्याकडून अपेक्षा वाढत गेल्या. मात्र, त्या अपेक्षांचं ओझं न मानता तिनं त्यालाच प्रेरणेचं रूप दिलं. आता भारताची पहिली कनिष्ठ विश्वविजेती स्क्वॉशपटू होण्याचा मान मिळवला. यामागे तिची नैसर्गिक प्रतिभा आणि दशकभराची कठोर मेहनत आहे.
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी दिल्लीतील इंडिया ओपन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा खेळ पाहून अनाहतला बॅडमिंटनची भुरळ पडली. स्वतःला सिंधूची मोठी चाहती म्हणवणाऱ्या अनाहतने सुरुवातीची काही वर्षे बॅडमिंटनमध्ये यश मिळवले. मात्र, मोठी बहीण अमिरा स्क्वॉश खेळत असल्यानं ती तिच्याबरोबर सराव आणि स्पर्धांना जाऊ लागली. दोन्ही खेळ काही काळ एकत्र खेळल्यानंतर व्यावसायिक कारकीर्दीसाठी तिने स्क्वॉशची निवड केली आणि तिच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.
वडील गुरशरण सिंग आणि आई तानी वढेरा सिंग यांचा खेळाशी (दोघेही माजी हॉकीपटू) असलेला संबंध, तसेच बहिणीचं आणि अन्य प्रशिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे अनाहतची प्रगती झपाट्यानं झाली. काही वर्षांतच ती भारतासह आशिया आणि युरोपमधील विविध वयोगटांमध्येही अव्वल क्रमांकावर पोहोचली.
२०१९ मध्ये ब्रिटिश खुल्या स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आणि त्यानंतर तिची विजयी घोडदौड सुरूच राहिली. २०२१ मध्ये कोणत्याही वयोगटात अमेरिकन खुली स्क्वॉश स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली. त्यानंतर जर्मन, डच, ब्रिटिश आणि आशियाई कनिष्ठ स्पर्धांतील विजेतेपदं तिच्या नावावर जमा होत गेली.
अनाहतला खरी ओळख मिळाली ती वरिष्ठ स्तरावरील तिच्या झुंजार कामगिरीमुळे. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झालेली ती सर्वांत युवा खेळाडू होती. वरिष्ठ स्तरावरील पहिल्याच स्पर्धेत तिने विजयाची नोंद केली. ‘‘त्या वेळी मी इतकी घाबरले होते की सामन्यांशिवाय खोलीबाहेरही पडत नव्हते,’’ अशी आठवण अनाहतने नंतर सांगितली. त्या अनुभवानेच तिच्या आत्मविश्वासाचा पाया अधिक मजबूत झाला.
२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनाहतने दोन कांस्यपदकं जिंकत भारतीय क्रीडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. अवघ्या १५ वर्षांच्या वयात ती आशियाई स्पर्धेतील भारताच्या सर्वांत युवा पदकविजेत्यांपैकी एक ठरली. २०२४ मध्ये तिने नऊ पीएसए चॅलेंजर विजेतेपदं जिंकली आणि सलग राष्ट्रीय जेतेपद कायम राखलं. २०२५ मध्ये ती भारताची अव्वल महिला स्क्वॉशपटू बनली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ स्तरावर पदार्पण करताना तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल ३० मधील खेळाडूला पराभूत करून धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याच वर्षी भारताला पहिले स्क्वॉश विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यातही तिचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
कोर्टवरील तिचा खेळ जितका वेगवान, तितकाच संयमीही असतो. प्रत्येक चेंडूसाठी झुंज देण्याची वृत्ती, कोर्टवरील चौफेर नियंत्रण आणि निर्णायक क्षणी अचूक फटके मारण्याची क्षमता यामुळे ती प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरते.
यंदाचे वर्ष अनाहतसाठी अविस्मरणीय ठरले आहे. ‘स्क्वॉश ऑन फायर ओपन’ स्पर्धेत राष्ट्रकुल विजेत्या जॉर्जिना केनेडीचा पराभव करून तिनं पहिलं पीएसए कांस्य विजेतेपद मिळवलं आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या २० मध्ये प्रवेश केला. हा टप्पा गाठणारी ती सर्वांत युवा आशियाई खेळाडू ठरली. त्यानंतर कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं इतिहास घडवला. अंतिम फेरीत इजिप्तच्या रुकय्या सालेमचा पराभव करत अनाहतनं भारताला पहिलं जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवून दिलं. तब्बल १५ वर्षे या स्पर्धेवर इजिप्तचे वर्चस्व होतं, ते अनाहतने मोडीत काढलं.
भारतासाठी यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २००५ मध्ये जोश्ना चिनप्पाचे उपविजेतेपद. भारतीय स्क्वॉशमध्ये आधीच जोश्ना, सौरव घोषाल, दीपिका पल्लिकल यांसारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचा झेंडा उंचावला होता. अनाहतच्या या यशामुळे त्या परंपरेला नवी ऊर्जा मिळाली आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अनाहतने भारतीय स्क्वॉशला नवं स्वप्न दाखवलं आहे. लॉस एंजलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये प्रथमच स्क्वॉशचा समावेश करण्यात आला असून भारताच्या संभाव्य पदकविजेत्यांमध्ये अनाहतचंही नाव घेतलं जात आहे. ती या अपेक्षा पूर्ण करून पुन्हा इतिहास घडवेल आणि यशस्वी वाटचाल अशीच सुरू ठेवेल, हीच आशा.
