विश्लेषकच्या भूमिकेत असताना तुम्हाला संपूर्ण खेळाचं ज्ञान असणं आवश्यक आहे, मैदानावर चाललेल्या अगदी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सतर्क असणं आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करत प्रेक्षकांना खेळाबद्दल व्यवस्थित माहिती देणं आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिला मैदानी खेळांमध्येही मागे नाहीत हे आपल्याला माहिती आहे. अगदी क्रिकेटपासून ते कुस्तीपर्यंत सगळ्या खेळांमध्ये महिला खेळाडू नवनवे विक्रम नोंदवत आहेत. खेळाच्या मैदानातली लैंगिक असमानता कमी होत असली तरीही अजूनही खेळाशी संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये महिला प्रतिनिधित्व पुरेसं दिसत नाही. समालोचक किंवा विश्लेषक हे त्यातलंच एक. त्यातही फुटबॉलसारख्या खेळात तर जिथे महिला खेळाडूंची संख्याच अजून कमी आहे, तिथे महिला विश्लेषक तर अजिबातच दिसत नाहीत. पण आता मात्र ही वाटही खुली झाली आहे. केरळची अंजिता एम हिनं या नव्या वाटेचा मार्ग दाखवला आहे. अंजिताला भारतातील पहिली व्यावसायिक फुटबॉल व्हिडिओ विश्लेषक होण्याचा मान मिळाला आहे. एक फुटबॉलपटू ते विश्लेषक हा प्रवास नक्कीच सोपा नाहीये. विशेषत: पुरुषी वर्चस्व असलेल्या फुटबॉलमध्ये तर नाहीच. हेही वाचा : एकोणिसाव्या वर्षी झाली ‘CA’! गिनीज बुकातदेखील नोंद! कोण आहे ही तरुणी ते घ्या जाणून…. अंजिता ही मूळची केरळची. ती स्वत: फुटबॉलपटू आहे. सध्या ती गोकुळम केरळ महिला टीमबरोबर कार्यरत आहे. फुटबॉलच्या मैदानाबरोबरच मैदानाबाहेरची ही वाट निवडण्याचं श्रेय जातं अंजिताच्या आईवडिलांना. तिचे वडील मणि हे स्वत: उत्तम फुटबॉलपटू आहेत आणि अंजिताचे प्रेरणास्रोतही. अंजिता अगदी लहानपणापासूनच त्यांच्याबरोबर फुटबॉलचे सामने बघायला जायची. आपल्याला फुटबॉलची आवड आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि अंजिता फुटबॉलमध्ये बरंच काही करू शकते हे तिच्या वडिलांच्याही लक्षात आलं. ती आठवीत होती आणि त्याच वेळेस तिच्या शाळेनं मुलींची फुटबॉल टीम तयार करून स्पर्धांमध्ये उतरण्याचं ठरवलं. अंजिताला या टीममध्ये तर जागा मिळालीच, पण त्यानंतर तिच्या खेळामुळे तिला लगेचच केरळतर्फे राज्य स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. आधी ज्युनिअर आणि मग सिनीअर खेळाडू म्हणून खेळताना अंजिताचा खेळ बहरत गेला. शाळेनंतर तिनं सेंट जोसेफ महाविद्यालयातून बी.कॉमचं शिक्षण घेतलं आणि तिथेही ती कॉलेजच्या वतीने फुटबॉल खेळत राहिली. तिच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे केरला ब्लास्टर्सट वुमेन टीमच्या माध्यमातून. या टीमचे कोच शरीफ खान यांना अंजिताची क्षमता जाणवली आणि त्यांनी तिला पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं. काही काळाने ही टीमच रद्द करण्यात आली, पण या टीमबरोबर असताना शिकलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतील असं अंजिता सांगते. हेही वाचा : मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास…. आपलं फुटबॉलचं प्रेम फक्त मैदानापुरतंच मर्यादित नाही हे अंजिताच्या लक्षात आलं आणि ती त्यासाठीचे पर्याय ती शोधू लागली. स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पर्यायाचा तिनं विचार केला, पण त्यापेक्षा तिला विश्लेषकाचा पर्याय अधिक योग्य वाटला. केरला ब्लास्टर्ट रिझर्व्ह टीमचे आनंद वर्धन यांना ती विश्लेषणाच्या क्षेत्रातील आपले मार्गदर्शक, गुरू मानते. अंजितानं प्रोफेशनल फुटबॉल स्काऊट्स असोसिएशन (PFSA) चा एक कोर्सही केला आहे. मैदानावर खेळताना तुम्ही फक्त टीमचे एक खेळाडू असता. तुमचा खेळ उत्तम करणं आणि तुमच्या टीमला जिंकून देणं हेच तुमचं ध्येय असतं. मात्र विश्लेषकच्या भूमिकेत असताना तुम्हाला संपूर्ण खेळाचं ज्ञान असणं आवश्यक आहे, मैदानावर चाललेल्या अगदी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सतर्क असणं आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करत प्रेक्षकांना खेळाबद्दल व्यवस्थित माहिती देणं आवश्यक आहे. त्यासाठी खेळाबद्दल फक्त प्रेम असूनच उपयोग नाही तर खेळाबद्दल माहिती असणं, त्याचा व्यवस्थित अभ्यास असणं, खेळाडूंच्या क्षमता आणि कमतरता दोन्ही जाणून त्याबद्दल विश्लेषण करणं हेही आवश्यक असतं. हेही वाचा : IAS अंजली बिर्ला! लोकसभा अध्यक्षांच्या लेकीचं पहिल्याच टप्प्यातील यश का ठरतंय वादग्रस्त? चर्चेमागील सत्य जाणून घ्या! खेळावर कितीही प्रेम असलं तरी खेळाडू म्हणून असलेलं आयुष्य कमी असतं. मग उरलेला वेळ आपण खेळत असलेल्या काळातले किस्से सांगत बसण्यापेक्षा येणाऱ्या पिढ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देणं अधिक चांगलं, हे अंजिताला माहिती आहे. त्यामुळेच विश्लेषकाबरोबरच आता फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी परवाना मिळवण्याची तिची धडपड सुरू आहे. मैदानावर आपल्याला सिद्ध करण्यासाठी अंजितासारख्या अनेक गुणी खेळाडू अविरत मेहनत करतायेत. जास्तीत जास्त महिला खेळाडूंचा सहभागा वाढावा यासाठी जीवतोड प्रयत्न करतायेत. oपण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येतात. कधी राजकारण, कधी अर्थकारण तरी कधी आणखी काही. त्यावरही मात करत अंजितासारख्या खेळाडू खेळामध्ये आपलं योगदान देतच आहेत. इतकंच नाही तर खेळाडूंचं जग फक्त मैदानापुरतंच नाही तर मैदानापलीकडेही विस्तारलेलं आहे आणि ती खुणावणारी क्षितीजं अंजितासारख्या खेळाडू खुली करून देत आहेत.