विवाहपूर्व समुपदेशन : आमची सिच्युएशनशीप

रिलेशनशिपमध्ये असणं, सिच्युएशनशिपमध्ये असणं काय किंवा ब्रेक-अप होणं काय, सगळं एकाच मापात तोललं जातंय, असं वाटत असतानाच नुसतं ‘बघून’ आयुष्यभराचा निर्णय कसा काय घेता येईल? हा खराखुरा प्रश्नही त्यांनाच पडतो…

विवाहपूर्व समुपदेशन : आमची सिच्युएशनशीप
situationships

वंदना सुधीर कुलकर्णी

“अरे यार, शादी के लड्डू खाये तो हम पछताये और ना खाये तो हमारे मां, बाप पछताये!” असं म्हणत कट्ट्यावर जमलेल्यांपैकी दोन मित्रांनी एकमेकांना टाळी दिली.
“नाही तर काय! भारी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड नातं असताना शादी के लड्डू हवेत कशाला? नाही त्या जबाबदाऱ्या गळ्यात घ्या, बायको आणि आईमधली भांडणं सोडवा, तू नेहमी ‘तिचीच’ बाजू घेतोस, असं म्हणणाऱ्या आई आणि बायकोमधलं सँडविच बना, आपली सुखाची झोप बिघडवा….सांगितलंय कुणी?”
“नाही तर काय! चाललंय हे ठीक चाललं आहे. दिवसभर जमेल तसं चॅटिंग, फोन आणि सुट्टीच्या दिवशी गाठीभेटी. दिन्याची गर्लफ्रेंड तर त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते. रोज, रोज भेट….मजा अन् काय.”
“आ xx , बॉस काय फुकट पगार देतो का? जळता लेकाचे तुम्ही.”
“ए अज्या, तुझ्या गर्लफ्रेंडचं काय?” “अरे, मी कॉल-ऑफ करायचं ठरवलंय आमचं नातं….”
“म्हणजे ब्रेकअप?”

“ काsss?” “यार, ती फार पझेसिव्ह आहे. मी माझ्या इतर मैत्रिणीशी बोललो की ती कटकट सुरू करते… चिडायचं, अबोला धरायचा…सारखं आपलं, तू मला वेळ देत नाहीस… सारखा तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये रमलेला असतोस… मी म्हणतो, ‘तू येत जा ना मग तिकडे, आमच्या अड्ड्यावर! किंवा ट्रेकला.’ पण ते नाही… मला नाही आवडत असं क्लिंगिंग…” “का? आता क्लिंगिंग वाटतं? तेव्हा तर किती कौतुक होतं! माझ्याशिवाय तिचं कसं पान हलत नाही… वगैरे… वगैरे… आम्हाला फाटा देऊन जायचास सारखा तिच्या मागे, मागे… तेव्हा कसं गोड वाटत होतं आं? आता क्लिंगिंग म्हणे!..आणि ती गेली असती तुझ्या मित्रांबरोबर तर तू काय पझेसिव्ह होणार न्हवतास?” “बघ ना यार! मोठा शहाणा बनतो आहे!”

“काय ग अनिका, तू काहीच बोलत नाहीएस? कसं चालू आहे तुमचं अफेअर की काय ते?” “ए, गप्प हं! आमचं काही अफेअर वगैरे नाहीये. आमची ‘सिच्युएशनशिप’? आहे… कळलं का?”
“सिच्युएशनशिप? ही काय असते?”
“काय बावळट आहेस ग तू मेघा! काहीही प्रश्न विचारते? तू तर ना मागच्या पिढीतच शोभतेस… ए हिला जरा शहाणी करा रे कुणी तरी…” “पण अर्थ सांग ना आधी…” “It is when you are not in a relationship but not just friends also…” मेघा संभ्रमात पडली… “अगं, not in a relationship but more than friendship…” “यापेक्षा जास्त काही समजावता येणार नाही हं मेघा… ध्यानच आहेस.”

“काय रे वाटेल ते बोलता मला? मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही हा काही गुन्हा आहे का माझा? मला नाही दिसत कुणी बॉयफ्रेंड मटेरियल मुलगा. माझी प्रायोरिटी आता वेगळी आहे. मला आयआयएमला प्रवेश मिळवायचा आहे. माझा फोकस त्यावर आहे सध्या आणि तुम्ही तरी किती जण कमिटेड आहात रे? सतत unsure… आईबाबा काय म्हणतील ह्याबद्दल गोंधळलेले नाही तर भांबावलेले… आं? आपली सगळ्यांची छान, निखळ मैत्री आहे… मला पुरते तेवढी. मी जेलस झाले आहे का कधी? काय ग आभा?” “ए, तिच्याबाबतीत जेलस होण्यासारखं काय आहे एवढं तिच्या बॉयफ्रेंडमध्ये? आं? नुसता बड्या बापाचा मुलगा म्हणून मिरवत असतो आपला…”

“सम्या, आता तू जेलस होतो आहेस हं! तू लाइन टाकून बघितली होतीस… तिनं रिस्पॉन्स नाही दिला… तिला तिचा चॉइस आहे ना…” “जेलस कसला होतोय? घरचे तगादा लावताहेत सारखे मुली बघ, मुली बघ! घरी जायलाच नको वाटतं… मुली नुसत्या ‘बघून’ काही समजतं का?”

“अरे यार, तुझी तीन अफेअर्स झाली आत्तापर्यंत. मारे भेटत होतात महिनोन् महिने? काय ओळखले एकमेकांना? ब्रेक-ऑफस् च झाले ना शेवटी? आता भेटून बघा आई वडिलांनी आणलेल्या स्थळांना. तिथे तरी काही जमतंय का? प्रेमात नाही जमवून घेता येत याला अन् लग्नात काय जमवून घेणार आहे हा?” सगळे हसायला लागले. लग्न हा विषय यापेक्षा अधिक गांभीर्याने घ्यावा असं कुणालाच वाटलं नाही. नक्की कसा जोडीदार हवा, तसा का हवा, एवढा विचार करण्यात ताकद कोण घालवतो. पुढचं पुढे बघू…. “आत्ता मजा… मग सजा…” असं म्हणत, एकमेकांना टाळी देत, सगळे जण ‘बाय, उद्या भेटू म्हणत पांगले…

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुर्त्याचा नेमका साइज कसा ओळखाल?
फोटो गॅलरी