डॉ. शारदा महांडुळे
विवाहसमारंभ, डोहाळेजेवण, बारसे त्याचबरोबर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी बऱ्याच वेळेला भरली वांगी ही भाजी केली जाते. वांग्याचे भरीत, भाजी, रस्साभाजी, भरली वांगी, वांगी पुलाव, भजी, काप, वांगे पोहे अशा विविध पाककृती वांग्यापासून केल्या जातात. आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदशास्त्रातही वांग्याचे महत्त्व विशद केले आहे. मराठीत ‘वांगे’, हिंदीमध्ये ‘बैंगन’, संस्कृतमध्ये ‘वर्ताक’, इंग्रजीमध्ये ‘ब्रिंजल’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘सोलॅनम मॅलॅनजेना’ (Solanum Melongena) या नावाने ओळखली जाणारी वांगी ‘सोलॅनसी’ कुळातील आहे.
हेही वाचा >>> आहारवेद: उत्साहवर्धक नारळ
फार प्राचीन काळापासून वांगे या फळभाजीची लागवड भारतात केली जाते. ते मूळचे भारतातीलच आहे. साधारणतः तेराव्या शतकात त्याची लागवड युरोपमध्ये सुरू झाली. त्यानंतर इराण, चीन येथे त्याचे पीक घेतले गेले व आज भारत, चीन, इंडोनेशिया, मलाया, थायलंड, म्यानमार, फिलिपिन्स, कॅरीबिया, आफ्रिका व अमेरिका या सर्व ठिकाणी त्याची लागवड केली जाते. वांगी अतिशय चविष्ट व गुणांनी समृद्ध असल्यामुळे हिवाळा ऋतूमध्ये त्यांना भाज्यांचा राजा म्हणून संबोधले जाते. वांग्यामध्ये प्रामुख्याने जांभळी व पांढरी असे दोन प्रकार आहेत. तसेच आकारानुसार लांबट व गोल असेही दोन प्रकार आहेत. जांभळी लंबगोल वांगी अधिक गुणकारी असतात. वांगी ही आकाराने लिंबापासून ते टरबुजाएवढी असतात. थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत हे सर्वांचेच आवडते जेवण असते. या ऋतूत ते सकसही असते.
औषधी गुणधर्म :
आयुर्वेदानुसार : वांगी ही मधुर, तीक्ष्ण, उष्ण, कफहारक, अग्निप्रदीपक, वीर्यवर्धक, पित्तकारक व पचण्यास हलकी असतात.
आधुनिक शास्त्रानुसार : वांग्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, स्निग्धता हे सर्वच शरीरास लाभदायक असे पोषक घटक असतात.
उपयोग :
१) वांगी ही कफनाशक, अग्निप्रदीपक व सौम्य सारक गुणधर्माची असल्यामुळे भूक न लागणे, अपचन, मलावष्टंभ या विकारांवर गुणकारी आहेत. वांग्याचे सूप प्यायल्यामुळे भूक चांगली लागते व घेतलेल्या आहाराचे पचन होऊन शौचास साफ होते.
२) ज्यांना निद्रानाश विकाराचा त्रास होतो, त्या व्यक्तींनी कोवळी वांगी विस्तवावर भाजून त्याची साल काढून मधात कालवून रात्री चाटून खाल्ली, तर त्यांना चांगली झोप लागून निद्रानाश विकार दूर होतो.
हेही वाचा >>> आहारवेद: प्रथिनांचे भांडार शेंगदाणे
३) ज्या स्त्रियांना हिवाळ्यामध्ये मासिक पाळीत रक्तस्राव कमी प्रमाणात होतो, त्या स्त्रियांनी वांग्याची भाजी, गूळ आणि बाजरीची भाकरी असा आहार काही दिवस नियमितपणे घेतला, तर स्रावाचे प्रमाण व्यवस्थित होते.
४) ज्या स्त्रियांचा वारंवार गर्भपात होतो, तसेच ज्यांना वंध्यत्व ही समस्या आहे, अशा स्त्रियांनी जांभळी वांगी उकडून त्याचे कमी तिखट भरीत करून खावे व त्यासोबत ग्लासभर ताक प्यावे. असे महिनाभर केल्यास शरीरामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व शोषून घेण्याची शक्ती वाढते. तसेच गर्भधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावाचे प्रमाणही वाढते व गर्भपाताचा धोकाही टाळला जातो.
५) जीर्ण खोकला, कफयुक्त खोकला, दमा या विकारांवर वांग्याच्या पानांचा एक चमचा ताजा रस त्यात थोडा मध घालून दिवसातून तीन वेळा घ्यावा. यामुळे फुफ्फुसांमध्ये दाटलेला कफ बाहेर पडून खोकला थांबतो.
हेही वाचा >>> आहारवेद : स्मृतीवर्धक मध
६) यकृताच्या विविध तक्रारींवर वांगी गुणकारी आहेत. कावीळ, ॲनिमिया या विकारांमध्ये होणाऱ्या यकृतवृद्धीवर सतत काही दिवस वांगी उकडून खावीत. फक्त वांगी खाताना मसाल्याचा वापर करू नये. किंचित मीठ-तिखट, तेल, कोथिंबीर, मिरे घालून भरीत तयार करून बाजरीच्या भाकरीसोबत खावे. या प्रयोगाने शरीरातील पित्त अधिक प्रमाणात तयार होते व यकृतवृद्धी हा आजार आटोक्यात येतो.
७) लहान मुलांच्या यकृतवृद्धीवर वांग्याचे ‘ब्रिजल कल्प’ हे औषध वापरले असता चांगला फायदा दिसून येतो.
सावधानता :
वांगी पित्तकारक व उष्ण असल्यामुळे पित्तप्रकृती असणाऱ्यांनी, तसेच मूळव्याध व आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी वांगी खाणे सहसा टाळावे किंवा वांगी खायचीच असल्यास भाजी बनविताना अतिरिक्त मसाला वापरू नये. अतिरिक्त मसाल्यामुळे डोळ्यांची, तसेच शौचास होताना आग होते. तसेच पोटामध्येही जळजळ, आग जाणवते.