वेदनारहित बाळंतपण (painless labour) वास्तविक पाहाता बाळंतपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेत असणाऱ्या स्त्रीसाठी एक वरदानच आहे. तरी देखील या पद्धतीचा उपयोग त्यामानाने कमी प्रमाणात होताना दिसतो. या मागची कारणे काय आहेत? या पद्धतीचे प्रमाण वाढल्यास ‘सिझेरियन सेक्शन’चं प्रमाण कमी होऊ शकतं काय? याचा विचार होणं आवश्यक आहे.
नैसर्गिक बाळंतपण (नॉर्मल डिलिव्हरी) म्हटलं की, कळा सहन करणं हे आलंच. ‘सिझेरियन’ म्हणजे कळा सहन करण्याची गरजच नाही असं देखील प्रत्येक वेळी होत नाही. कधी-कधी अगोदर बाळंतपणाच्या कळा सहन करण्याच्या अनुभवातून गेल्यानंतर काही कारणास्तव सिझेरियन केलं जातं. अलीकडच्या काही दशकात ‘सिझेरियन’ करण्याचं प्रमाण खूप वाढलंय, हे सर्वश्रुत आहे. ‘सिझेरियन’चं प्रमाण वाढण्यामागची कारणे कोणती हा एक स्वतंत्र विषय असला तरी, प्रसूतीच्या कळा सहन करण्याची शक्ती आजकालच्या तरुणींमध्ये कमी झाल्यामुळे ‘सिझेरियन’चं प्रमाण वाढलंय असं बोललं जातंय किंबहुना मला ‘प्रसूतीच्या कळाचीं भीती वाटते, मी त्या सहन करू शकणार नाही डॉक्टर, माझं सिझेरियन करून टाका’, असं सिझेरियन करण्याबद्दलची अनुकूलता सूचित करणारी विधानं देखील सर्वसामान्य होत आहेत.
हेही वाचा >>> Success Story : बालपणी लग्न, तर १८ व्या वर्षी मातृत्व; नवऱ्याच्या साथीनं जिद्दीनं पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न
‘सिझेरियन’बद्दलची अशी अनुकूलता जरी दिसत असली तरी, आमच्या प्रत्यक्ष अनुभवात आपलं बाळंतपण ‘नॉर्मल’ व्हावं असं वाटणाऱ्या गर्भवतींचं प्रमाण जास्त आहे. प्रसूतीच्या कळा सहन करण्याच्या मानसिक तयारीने त्या या नैसर्गिक प्रक्रियेला सामोरं देखील जातात, पण कळांची तीव्रता वाढल्यानंतर मात्र त्यांचा धीर खचतो, ‘मी म्हणाले होते, पण मला आता कळा सहन करणं शक्य नाही, माझं सिझेरियन करा,’ असा आग्रह सुरु होतो. हीच ती ‘वेदनारहित बाळंतपणा’ची योग्य वेळ असू शकते. या प्रसंगी कळा ‘गायब’ करण्याचं उपलब्ध असलेलं तंत्र उपयोगात आणलं की, तिला वेदना जाणवणार नाहीत, पण बाळंतपण ‘नॉर्मल’ होण्याच्या दृष्टीने चालू असलेली नैसर्गिक वाटचाल चालू राहील. याला सर्वसामान्यांच्या भाषेत वेदनारहित बाळंतपण म्हणतात. यासाठी Epidural Analgesia अर्थात भूल द्यावी लागते.
वेदनारहित बाळंतपण म्हणजे काय? हे अगोदर समजावून घेऊ. बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यावर रुग्णालयामध्ये दाखल व्हायचं. यासाठी प्रसूतीशास्त्रतज्ञाला भूलतज्ञांची ( Anaesthesiologist) मदत घ्यावी लागते, कारण हे कौशल्य त्यांना प्राप्त असतं. दोन्ही डॉक्टर मिळून त्या स्त्रीच्या आरोग्याची तपासणी करून ती वेदनारहित बाळंतपणासाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवतात. ही निवड झाल्यानंतर, ‘सिझेरियन’करण्यापूर्वी जसं पाठीच्या मणक्यातून इंजेक्शन देऊन कमरेखालचा भाग बधीर करतात (spinal anaesthesia) त्याच प्रमाणे epidural analgesia इंजेक्ट करताना त्या स्त्रीला दोन मणक्यांमध्ये ठराविक पद्धतीने इंजेक्शन देतात. या दोन्ही तंत्रात थोडासा फरक असतो. इंजेक्शनचा परिणाम असा होतो की, कळा येतात पण त्या स्त्रीला ते जाणवत नाहीत. बाळंतपणाची नैसर्गिक प्रक्रिया चालूच राहाते. इंजेक्शनचा परिणाम काही तासानंतर कमी होतो आणि ती स्त्री वेदना होत आहेत असं सांगते, मग डॉक्टर पुढचा डोस रिपीट करतात आणि पुन्हा कळा गायब होतात. बाळंतपणाची नैसर्गिक प्रक्रिया होऊन बाळंतपण काही तासानंतर ‘नॉर्मल’ होतं. बाळंतपणाच्या वेळी खाली टाके देण्याची गरज पडल्यास अथवा काही कारणास्तव बाळंतपणाची प्रगती न झाल्यामुळे ‘सिझेरियन’चा निर्णय घ्यावा लागल्यास वेगळा ॲनेस्थेशिया देण्याची गरज पडत नाही.
हेही वाचा >>> Kolkata Rape-Murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीच्या वकील म्हणून नियुक्त झालेल्या महिला वकील कोण?
मोठ्या शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटमध्ये या तंत्राचा वापर करून बाळंतपण करण्याची सोय उपलब्ध आहे पण यासाठी फी च्या रुपाने भरपूर किंमत मोजावी लागते. बाळंतपण वेदनारहित असो वा वेदनेसह असो, ‘नॉर्मल’ होण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागते. एका बाजूला बाळंतपण किती तासात होईल याबद्दलची अनिश्चितता, आणि दुसऱ्या बाजूला ‘सिझेरियन’च्या स्वरूपात ‘झटपट रिझल्ट’ देणारा पर्याय सहज उपलब्ध झाल्यामुळे ‘सिझेरियन’साठीची अनुकूलता वाढत आहे, हे देखील खरं आहे. ही झाली त्या स्त्रीची बाजू.
‘सिझेरियन’च्या वेळी बधिरीकरणतज्ञ फोन केल्यावर लगेच येतात, ॲनेस्थेशिया देतात, ‘सिझेरियन’ संपल्यानंतर साधरणतः ४० ते ५० मिनिटांत मोकळे होतात. वेदनारहित बाळंतपणासाठी ते बाळंतपण होईपर्यंत अनेक तास भूलतज्ञांना देखील त्या स्त्रीची जबाबदारी सांभाळावी लागते, प्रसंगी खोळंबून राहावं लागू शकतं. दरम्यान त्यांना दुसऱ्या स्त्रीची जबाबदारी घेता येत नाही. कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये २४ तास बधिरीकरणतज्ञ उपलब्ध असतात. त्यांना ऐन वेळेवर बोलवण्याची गरज नसते. छोट्या शहरात तशी सोय सहज उपलब्ध झालेली नाही. एकूणच ‘सिझेरियन’साठी जो spinal anaesthesia दिला जातो, त्याचं कौशल्य असणारे बधिरीकरणतज्ञ संख्येने जास्त आहेत, वेदनारहित बाळंतपणासाठी जो Epidural Analgesia दिला जातो त्याचं कौशल्य असणारे बधिरीकरणतज्ञ संख्येने कमी आहेत.
आज परिस्थिती अशी आहे की,अगदी ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ‘सिझेरियन’ माहिती आहे, परंतु ‘वेदनारहित बाळंतपणा’चा देखिल पर्याय आहे याची माहिती देखील लोकांपर्यत पोचली नाही. असं का झालं असावं ? या आघाडीवर आम्ही डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणाचं कमी पडली की काय असं वाटतं. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतानापासूनच या तंत्राचा उपयोग करण्याचं आवश्यक ते कौशल्य आणि मानसिकता अवगत केल्यास; जनजागरण केल्यास भविष्यात बाळंतपणाच्या कळा सहन करण्याच्या दिव्यातून जाण्यापासून काही प्रमाणात का होईना सुटका होऊन सिझेरियनचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी मदत होऊ शकते.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com