डॉ. किशोर अतनूरकर स्त्रियांचा विकनेस म्हणजे शारीरिक आणि मानसिक अशक्तपणाचं मिश्रण असतं. अनेकींना सततचा थकवा जाणवतो आणि त्या मुळे त्या कंटाळून जातात. काय करायला हवं अशक्तपणा कमी करण्यासाठी? ग्रामीण भागातील शेतात मजुरी करणाऱ्या स्त्रियांपासून ते शहरातील मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या स्त्रियांपर्यंत, अनेक जणी ‘विकनेस’मुळे वैतागलेल्या असतात. वास्तविक पाहता या अशक्तपणापासून सुटका होऊ शकते. मात्र त्यासाठी या समस्येकडे गांभीर्याने बघणं आवश्यक आहे. अनेक स्त्रिया ‘मला खूप दिवसांपासून अशक्तपणा जाणवतोय डॉक्टर, व्हिटामिनच्या गोळ्या घेतंच असते, अधून-मधून शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषधदेखील घेते, पण हा अशक्तपणा कमीच होत नाही.’ अशी तक्रार घेऊन येतात. अशक्तपणासोबत सर्वसाधारणपणे स्त्रियांकडून केली जाणारी अजून एक तक्रार म्हणजे, चक्कर येणे. हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेसह ‘या’ तीन आर्थिक योजनांमुळे होतो महिलांना फायदा, जाणून घ्या सविस्तर खूप दिवसांपासून अशक्तपणा जाणवतोय, ही तक्रार घेऊन येणारी स्त्री ही प्रामुख्याने वय वर्ष चाळीशीच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असते. अशक्तपणासोबत कधी मला चक्कर येते किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला उत्साहित वाटत नाही, पडून राहावसं वाटतंय अशी तक्रारही असू शकते. असा रुग्ण आल्यानंतर, ‘तुम्हाला दम लागतो का?, तुमची भूक कमी झाली आहे का? झोप कशी आहे?’ असे काही संबंधित प्रश्न डॉक्टर विचारतात. शारीरिक तपासणीत, रक्तदाब पाहिला जातो. डोळे, जीभ, नखं तपासून रक्तक्षय किंवा अनेमिया आहे का नाही याचा अंदाज घेतला जातो. पायावर सूज आहे का हे बघितलं जातं. पोट तपासून लिव्हर किंवा प्लीहा (स्प्लीन) चं आकारमान वाढलंय का हे पण पाहिलं जातं. या शारीरिक तपासणीनंतर रुग्णाला अशक्तपणा किंवा चक्कर का येत असावी याबद्दल प्राथमिक अंदाज बांधला जातो. गरजेप्रमाणे, रक्त, लघवीच्या तपासण्या केल्या जातात. त्यात हिमोग्लोबीनच्या प्रमाणासोबत, रुग्णाला मधुमेह, थायरॉइडची समस्या आहे की नाही हे पाहिलं जातं. काही रुग्णांमध्ये अशक्तपणाचं कारण शोधण्यासाठी रक्तातील ‘व्हिटॅमिन बी १२’ आणि ‘डी’चं प्रमाण तपासून पाहिलं जातं. तपासणीनंतर अशक्तपणाचं कारण, मधुमेह, थायरॉइडची समस्येमुळे असेल, किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असेल तर त्याप्रमाणे उपचार सुरु केले जातात त्यामुळे काही दिवसांत अशक्तपणा कमी होतो. मधुमेह, थायरॉईड वगैरे पेक्षाही आपल्या देशातील स्त्रियांमध्ये अशक्तपणाचं प्रमुख कारण रक्तक्षय किंवा अनेमिया हेच आहे. यात हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी होत असतं हे आता शहरातील,सुशिक्षित स्त्रियांना माहिती आहे. हिमोग्लोबीनच्या वाढीसाठी आयर्नच्या गोळ्या घ्याव्या लागतात, आहारात हिरव्या पालेभाज्या, गूळ-शेंगदाण्याचे लाडू वगैरे खावे लागतात हे देखील त्यांना माहिती असतं. फक्त अडचण आहे की त्या ते सगळं सातत्यानं करत नाहीत. त्यामुळे त्यांची अनेमियामुळे आलेल्या अशक्तपणाची समस्या अर्धवट कमी होते. काही स्त्रियांना मासिकपाळीमध्ये जास्तीचा रक्तस्राव होत असल्यामुळे देखील अशक्तपणा येऊ शकतो. त्या समस्येचं कारण शोधून त्यावर उपचार केल्याशिवाय अशक्तपणा कमी होणार नाही. हेही वाचा >>> निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया मासिकपाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे, गर्भवती असताना नऊ महिने पोटात स्वतःचं रक्तसिंचन करून गर्भ जोपासल्यामुळे, बाळंतपणामध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे, नंतर कराव्या स्तन्यपानामुळे आणि ऋतूसमाप्तीच्या वेळी नैसर्गिकरित्या हाडाची ठिसूळता वाढल्यामुळे, बऱ्याच स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शारीरिक अशक्तपणा येत असतो. या शारीरिक स्तरावर घडणाऱ्या गोष्टी तिला अशक्तपणाकडे नेतात. बऱ्याचदा असं होतं की, अशक्तपणासाठी केल्या जाणाऱ्या सर्व तपासण्या नॉर्मल, तरीही थकवा हा जाणवतच असतो. अश्या परिस्थितीत त्या स्त्रीचं मन तर थकलेलं नाही ना, हे बघणं डॉक्टरचं काम आहे. आजच्या स्त्रिला नोकरी आणि घर दोन्ही सांभाळावं लागत आहे. या दोन्ही भूमिका जबाबदारीने पार पडत असताना तिची प्रचंड शारीरिक आणि मानसिक ओढाताण होत आहे. वाढत्या वयानुसार कुणाचंही शरीर हे थकणारंच. पण ऑफिस किंवा घरातील स्त्रियांकडून अपेक्षित कामं आणि स्त्रियांची स्त्री म्हणून स्वतःकडून अपेक्षित केलेली कामं कमी होत नाहीत. कुटुंबात, नवऱ्याशी जमत नसेल, मुला-मुलींच्या करियरचा ताण, सासू-सासऱ्यांशी असलेला विसंवाद, जेमतेम आर्थिक परिस्थिती या प्रकारच्या समस्यांचा सामना जर तिला करावा लागत असेल तर ती मनाने अशक्त होणार. स्वतःला फीट ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक, मेडिटेशन वगैरे सारख्या गोष्टीचं महत्व तिला माहिती असून देखील तिला ते करायला एक तर वेळ मिळत नाही आणि मिळाला वेळ तर त्यात सातत्य टिकवता येत नाही. आपण पूर्वीसारखं आकर्षक दिसत नाही, आपण स्वतःला मेंटेन केलं नाही किंवा करू शकलो नाही याची खंतही तिला असू शकते. अशक्तपणा घालवण्यासाठी ‘शॉर्ट कट’ नाही. माध्यमातून केल्या जाणाऱ्या ‘शक्ती वर्धक’ उत्पादनांच्या जाहिरातीला बळी पडू नये. डॉक्टरांचा सल्ला, गरजेप्रमाणे काही रक्ताच्या तपासण्या. त्यातून काही आजराचं निदान झाल्यास औषध-गोळ्या घेणे, आहारात बदल करणे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे आणि या मार्गावर सातत्य टिकवून वाटचाल करावी लागेल. ( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com