अरुणाचलप्रदेश निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या २५ वर्षीय हिलांग याजिक या तरुणीने बॉडीबिल्डींग आणि फिजिक या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रजत पदकांची कमाई करीत देशाच्याच नाही तर अरुणाचलप्रदेशच्या इतिहासात आपले नाव कोरून अरुणाचलप्रदेशला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. जाणून घेऊया तिच्या या कामगिरीविषयी-
गेल्या काही दिवसांपासून अरुणाचलच्या हिलांग याजिकचे नाव चर्चेत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. नुकत्याच भूतान येथील थिमपू शहरात झालेल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग आणि फिजिक स्पर्धेच्या चम्पिअनशिपमध्ये महिला गटात एक सुवर्ण आणि एक रजत पदक जिंकून तिने इतिहास निर्माण केला. याशिवाय अशा स्वरूपाच्या खेळांमध्ये अरुणाचलप्रदेशमधून सहभागी होणारी ती पहिली महिला ॲथलीट आहे. आपल्या या कामगिरीने तिने भारतासाठी नाही तर अरुणाचलप्रदेशसाठी देखील एक नवा इतिहास रचला आहे.
अरुणाचलप्रदेश मधील कुरुंग कुमे या काहीसा मागास आणि अविकसित असलेल्या ठिकाणी हिलांगचा जन्म २००० साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. महाविद्यालयात गेल्यानंतर तिला बॉडीबिल्डिंगमध्ये अचानक रस निर्माण झाला. जसजसा ती या खेळाचा सराव करू लागली, तसतशी तिच्या मनात पोलिसमध्ये भरती होण्याची उर्मी निर्माण झाली. पोलिस बनायचे असेल तर शारीरिकदृष्ट्या फिट असणं महत्त्वाचं आहे, याची जाणीव तिला होती. त्यादृष्टीने ती स्वत:वर मेहनत घेत होती.
एकीकडे मेहनत चालू असताना राज्यशास्त्र हा विषय घेऊन तिने आपले एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्याचबरोबर ती नृत्य प्रशिक्षक आणि फिटनेस ट्रेनर म्हणून देखील काम करीत होती. या खेळासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक उपकरणे देखील तिच्याजवळ नव्हती. तरीदेखील न खचता तिने घरगुती गोष्टींच्या सहाय्याने वेट ट्रेनिंगचा सराव सुरू केला.
इतकेच नाही तर पुरुषप्रधान क्षेत्र असलेल्या खेळाची निवड केली म्हणून तिला लोकांकडून अनेकदा कुत्सित बोलणीदेखील खावी लागली. पण या साऱ्या गोष्टींचा जरासुध्दा परिणाम तिने आपल्या मनावर होऊ दिला नाही.
पुढे २०२२ मध्ये सिक्कीम येथे झालेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत तिने पहिल्यांदा पदार्पण केले. यावेळी ती अनेक खेळांमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने आपल्या यशाची झलक दाखविली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही. २०२४ मध्ये गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील तिने उल्लेखनीय कामगिरी केली. मिळत असलेल्या यशाने हिलांगला चांगलाच हुरूप आला. आणि जून २०२५ मध्ये भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने बॉडीबिल्डींग बरोबर फिजिकमध्ये देखील उतरण्याचा निर्णय घेतला. एक सुवर्ण आणि एक रजत पदकांची कमाई करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार इतिहास निर्माण केला. या दोन्ही प्रकारच्या खेळांमध्ये पदक मिळविणारी ती अरुणाचलप्रदेश मधील पहिलीच महिला आहे.
तिच्या या ऐतिहासिक कामगिरीविषयी गौरव उद्गार काढताना अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘हिलींगची शिस्तबद्धता, खेळाबाबत असलेले समर्पण आणि सातत्य या गुणांच्या जोरावर देशातच नाही तर अरुणाचलप्रदेशसाठी देखील नवा अध्याय लिहिला आहे.’’
आपल्या या यशाविषयी एका मुलाखतीत हिलींग म्हणाली की, ‘‘बॉडीबिल्डींग हा खेळ अरुणाचलप्रदेशमध्ये आजही तितकासा लोकप्रिय नाही. मसल्स असलेली स्त्री पाहायला लोकांना आवडत नाही. सातत्याने नकारात्मक वातावरणात राहून तुमच्या आवडीची गोष्ट करणे हे खूप अवघड आहे. पण अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा यशस्वी ठरतात, तेव्हा मात्र निश्चितच चांगला बदल दिसू लागतो. म्हणून मला माझ्या या पदकांचे विशेष महत्त्व वाटते.
ऐतिहासिक कामगिरी केलेल्या हिलींगचा प्रवास वाटतो तितका सहज सोपा नव्हता. मुळातच तिला ज्या खेळामध्ये रस निर्माण झाला तो खेळ अरुणाचलप्रदेश सारख्या भागात तितकासा लोकप्रिय नाही. त्यातही खेळासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरणही नाही आणि तशी साधने देखील नाही. वरून लोकांचे टोमणे. अशा स्थितीत एखाद्याने या खेळात करिअर करण्याचा विचार नक्कीच गुंडाळला असता. पण हिलींग ने स्वत:वरचा विश्वास कायम ठेवत आपला प्रवास चालू ठेवला. अगदी पार गेल्यावर्षी काही काही स्पर्धांमध्ये ती अपेक्षित कामगिरी करू शकली नाही.पण तरीदेखील न खचता तिने आपले प्रयत्न सुरु ठेवले.एकूणच तिच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर, तिच्यातील हीच चिकाटी इतिहास निर्माण करायला पुरेशी होती,हे मात्र आवर्जून लक्षात येते.