ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बनीज यांनी नुकतीच लेफ्टनंट जनरल सुझान कॉयल यांची ऑस्ट्रलियाच्या ‘लष्करप्रमुख’ या पदासाठी निवड केल्याचे जाहीर केले आणि अवघ्या काही मिनिटांतच फक्त ऑस्ट्रेलियातच नव्हे तर जगभरात हे नाव सर्वतोमुखी झाले. त्याला कारणही तसेच आहे. कारण ऑस्ट्रलियाच्या गेल्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला हा सन्मान मिळालेला आहे. तुमच्याकडे योग्यता आणि कामाप्रती तितकेच समर्पण असेल तर पद कितीही महत्त्वाचे असो, तिथे कोणताही लिंग भेदभाव टिकत नाही, हा एक महत्त्वाचा विचार या निमित्ताने समोर आला आहे.

५६ वर्षीय असलेल्या सुझान कॉयल यांचा जन्म न्यु साउथ वेल्स येथील एका छोट्या शहरात रहात असलेल्या एका सामान्य कुटुंबात २१ मे १९७० साली झाला. त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नव्हती. वडील एका कारखान्यात काम करायचे तर आई घर सांभाळायची. सुझान यांना एक मोठी बहिण आणि अन्य तीन भांवडे आहेत. सुझान यांच्या मोठ्या बहिणीने सैन्यात प्रवेश केल्यानंतर तिच्या कामाचे स्वरूप पाहून सुझान यांनादेखील सैन्यात प्रवेश घेण्याची उर्मी निर्माण झाली. सुझान त्यांच्या हायस्कूलच्या शेवटच्या टप्प्यात असताना, त्यांची निवड ऑस्ट्रलियन डिफेन्स फोर्स अकॅडेमीच्या प्रशिक्षणासाठी झाली.

हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करीत विज्ञान विषयातील पदवी घेत सुझान कॉयल यांनी १९९१-९२ च्या सुमारास आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे २००० साली आणखी एका शिष्यवृत्तीच्या निमित्ताने अमेरिकेतील ‘ब्रिगेड सॅटेलाईट इंजिनिअर’ या प्रशिक्षणासाठी निवड झाली. या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी इतकी चोख बजावली की त्यासाठी त्यांना ‘आर्मी कमांडेशन मेडल’देखील मिळाले. हे प्रशिक्षण पूर्ण करून त्या जेव्हा २००१ मध्ये ऑस्ट्रलियाला परत आल्या, त्यानंतर लष्कराच्या विविध विभागांत कार्यरत राहू लागल्या.

यामध्ये मध्य पूर्वेतील विविध मोहिमा, अफगाणिस्तान मधील संघर्ष यासारख्या जागतिक तसेच अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमा आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वीरित्या हाताळल्या. यामुळेच ऑस्ट्रेलियन लष्करातील अनेक महत्त्वांच्या पदांवर त्यांची नियुक्ती झाली.

या व्यतिरिक्त अनेक लष्करी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीदेखील त्यांना बोलवले जाते. शिवाय अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. दळणवळण संचार क्षेत्रातील विविध यंत्रणा, आधुनिक सायबर तंत्रज्ञानाचा लष्करासाठी होत असलेला वापर हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपले लष्कर अधिकधिक कसे सक्षम आणि प्रभावी करता येईल, यासंदर्भात त्यांचा अभ्यास सुरू असतो.

कायम कामात गुंतलेल्या सुझान आपल्या वैयक्तिक आयुष्यातदेखील तितक्याच रममाण असतात. त्यांचे पती हे लष्कर विभागात इंजिनिअर म्हणून कार्यरत असून, या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. वेळ मिळाला की त्या भरपूर वाचन करतात. याशिवाय फिरण्याची, नवीन प्रदेश बघण्याची त्यांना खूप हौस आहे.

जुलै २०२६ पासून त्या लष्करप्रमुख म्हणून आपला कार्यभार सांभाळणार आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशाला एक महिला ‘लष्कर प्रमुख’ म्हणून मिळण्यासाठी १२५ वर्षे वाट पाहावी लागली, ही नुसतीच दखल घेण्याजोगी बाब नाही, तर ती तितकीच ऐतिहासिक आहे. कारण ऑस्ट्रलियन संस्कृतीमध्ये लिंग भेदापेक्षा त्या कार्य पद्धतीला, विचारांना जास्त प्राधान्य दिले जाते. पद कोणतेही असो, त्यावर कार्यरत असणारी व्यक्ती तितकीच सक्षम असेल तर ती पुरुष आहे का महिला, याने काहीच फरक पडत नाही, हे वास्तव सुझान कॉयल यांच्या नियुक्तीने जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळेच हे फक्त ऑस्ट्रलियासाठीच नव्हे तर जगातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.