सुचित्रा प्रभुणे : बंगळूरु मधला प्रसंग… महिला रिक्षाचालक नेहमीप्रमाणे आपल्या एका प्रवाशाला पिकअप करण्यासाठी आली होती. या रिक्षाचालक महिलेच्या गुगल मॅपचा काहीतरी घोळ झाला होता, म्हणून तिने प्रवासी महिलेला हे मॅप नीट चालू करून देण्यास सांगितलं. महिला प्रवाशानं तिचा तो घोळ दूर केला आणि मॅप नेहमीसारखा सुरू झाला. मग काय, दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. महिला प्रवाशानं विचारलं, ‘‘तुला रिक्षा चालवावी असं का वाटलं?”

त्यावर रिक्षाचालक म्हणाली, ‘‘भांडी घासण्यापेक्षा रिक्षा चालवणं मला आवडतं. कामाचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. तुमची इच्छा असेल तर प्रवाशाला ‘नाही’देखील म्हणता येतं. मला फिरण्याची आवड असल्यामुळे कामाच्या निमित्तानं फिरता येतं. कधी कंटाळा आला तर थोडावेळ आराम करून पुन्हा काम करता येतं.”महिला प्रवाशानं सहज म्हणून घेतलेला त्या रिक्षाचालक महिलेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आणि अल्पावधीतच लोकप्रियदेखील झाला. तिच्या या मतावर भरभरून कमेंट्सचा पाऊस पडला. काहींना वाटलं की, भांडी घासणं हे काम कमी दर्जाचं आहे असं ती रिक्षाचालक म्हणत आहे. तर काहीना ती खरे बोलली म्हणून कौतुकदेखील वाटलं.

मुळातच कोणतंही काम हे कमी अथवा चांगल्या दर्जाचं असं नसतंच. एका एमएनसी कंपनीत सीईओ बनून कंपनीचा कारभार चालविणं जितकं महत्त्वाचं आहे तितकच रस्त्यावर झाडू मारण्याचं कामदेखील महत्वाचं आहे. साफ, स्वच्छ रस्त्यावरून चालायला सर्वांनाच आवडतं. पण हेच जर रस्त्याच्या कडेला कचरा पडलाय, जागोजागी लोक थुंकली आहेत अशा रस्त्यावरून चालायला कोणाला आवडेल?

मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या धर्तीवर सांगायचं झालं तर ‘काम हे काम असतं, तुमचं-आमचं सेम नसलं तरी प्रत्येकाला काम हे करावंच लागतं.’ आपल्यापैकी बहुतांश जणांना त्यांच्या आवडीचं काम करण्याची संधी फार कमी वेळेला मिळते. काहीजण पगाराचा आकडा बघून काम स्वीकारतात तर काहीजण स्वत:च्या आवडीसाठी काम स्वीकारतात. परिणामी, स्वीकारलेल्या कामाचे जे काही फायदे-तोटे असतात, ते प्रत्येकालाच स्वीकारावं लागतात. शिवाय आपल्या कामापेक्षा दुसऱ्याचं काम हे नेहमी सहज-सोपं वाटत असतं. आता हेच पाहा ना, सरकारी नोकरी मिळावी, हे आजही बहुतांश भारतीयांचं स्वप्न असतं. कारण एकदा का भरती झाली की निवृत्त होईपर्यंत नोकरीची चिंता नसते. शिवाय विविध भत्ते व इतर सुखसोयी मिळतात खऱ्या. पण कामात मात्र एकसुरीपणा आढळतो, त्यामुळे बऱ्याचदा कामाचा आनंद घेण्यापेक्षा त्यात ‘पाटी टाकण्याचा’ आनंद अधिक असलेला दिसतो.

वर उल्लेखिलेल्या रिक्षाचालक महिलेनं स्वत:चं मत अगदी सहजतेनं मांडलं आहे. भांडी घासणं हे काम कमी दर्जाचं नसून, त्या कामामध्ये तिला जाणविणाऱ्या अडचणी तिनं मांडल्या आहेत. जसं रोजची ठराविक घरं आणि ठराविक वेळा, एखाद्या घरी थोडाजरी उशीर झाला तर पुढच्या सर्व कामांना उशीर होतो. एखाद्या दिवशी काम करून कंटाळा आला तर मध्येच आराम करण्याची सोय नसतं. कामं पूर्ण करूनच आराम करता येतो.

पण रिक्षा चालविताना कामाचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. एखाद्या प्रवाशाला नकार देण्याचं स्वातंत्र्य असतं. दिवसभर रिक्षा चालवून कंटाळा आला असेल तर थोडावेळ ती आराम करू शकते. ती आराम करतेय म्हणून तिला कोणाची बोलणी खावी लागत नाही. तिला स्वत:ला फिरण्याची आवड असल्यामुळे रिक्षा चालविताना तिची फिरण्याची हौस पूर्ण होते. त्यासाठी तिला वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या कामाचे फायदे आणि तोटे तिला चांगलेच ठाऊक असल्यामुळे ती रिक्षा चालविताना आपल्या कामाचा पूर्णपणे आनंद घेत असते.

स्वीकारलेलं काम करताना, स्वत:ला त्यातून काय अपेक्षित आहे हे प्रत्येकाने तपासून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कामाचे फायदे-तोटे हे असतातच. पण स्वीकारलेलं काम आपण आनंदासाठी करतोय की गरज आहे म्हणून की पर्याय नाही म्हणून हा ज्याचा त्याचा निर्णय आहे,हे मात्र खरे.