scorecardresearch

सुंदर मी होणार : कोंडा झाला तर…

अकाली पांढरे झालेले केस योग्य उपचारांनी आणि औषधोपचारांनी पुन्हा काळे होतात. दाट, सुंदर आणि चमकदार केसांसाठी प्रत्येकजण आज वेगवेगळे उपचार करताना दिसतात. मात्र, अनेकदा केसांच्या समस्यांसाठी जीवनशैलीही कारणीभूत ठरत असते. आपण केस गळणे, तुटणे यांची कारणे, त्यावरील उपाय पाहिले, आता आपण कोंडा होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय लक्षात घेऊ.

सुंदर मी होणार : कोंडा झाला तर…
कोंड्याला प्रतिबंध केला की, केसांचे आरोग्य उत्तम राहते.

वैशाली वलवणकर

कोंड्याची समस्या

केस गळण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे कोंडा. टाळूची त्वचा कोरडी पडल्यामुळे कोरडा कोंडा होतो. तर केसांखाली असलेल्या तैलग्रंथींमधून अतिप्रमाणात तेलाचा स्त्राव झाल्यास चिकट तेलकट कोंडा होतो. सध्या अनेकविध कारणांनी अनेक चतुरा या कोंड्याच्या समस्येने हैराण आहेत. दरखेपेस केवळ बाह्यकारणांनीच कोंडा होत नाही तर अनेकदा आपली जीवनशैली आणि आपल्या खाण्या- पिण्याच्या सवयी त्याला कारणीभूत असतात. मग अशा वेळेस कोंडा झाला तर आपण करायचे, ते समजून घेऊ

आणखी वाचा : सुंदर मी होणार : केस गळतीची प्रमुख कारणे ते उपाय, जाणून घ्या

उपाय

१) कोरड्या कोंड्यासाठी आठवड्यातून दोनदा तेलाने हलक्या हाताने केसांच्या मुयकारणांळाशी मालिश करावी. (उदा – बदाम तेल, कोंडा तेल)

२) केस धुण्यासाठी कंडिशनरयुक्त शाम्पूचा वापर करावा.

३) तेलकट कोंडा असेल तर ‘अँटी फंगल’ शाम्पूने आठवड्यातून दोनदा केस धुवावेत.

४) त्याचप्रमाणे खालील औषधींचा वापर करून आयुर्वेदिक काढा बनवून त्या काढ्याने आठवड्यातून एकदा केस धुवावेत.

(उदाहरणार्थ – शिकेकाई पावडर, नीम साल / संत्रा साल पावडर गुडूचि पावडर, रीठा पावडर नागरमोथा पावडर, त्रिफळा पावडर ही सर्व द्रव्ये समप्रमाणात एकत्र करून पाण्यात उकळून गाळून घ्यावे व त्या पाण्याने केस धुवावेत)

५) तेलकट कोंड्यासाठी वेखंडाच्या पावडरचा वापर करावा.

६) केसांमध्ये कोंडा असताना हेअर ड्रायरचा वारंवार वापर करू नये. त्यामुळे डोक्याची त्वचा आणखी कोरडी होते आणि कोंड्याचे प्रमाण अधिक वाढते.

७) आहारामध्ये ‘अ’ जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा अधिक वापर करावा. तसेच अँटिऑक्सिडंटसचाही आहारात वापर करावा.

८) आठवड्यातून एकदा वापरात येणारे कंगवे गरम पाण्याने धुवून घ्यावेत. घरामध्ये प्रत्येकाचा कंगवा वेगळा ठेवावा. एकमेकांचे कंगवे वापरू नयेत.
केस पांढरे होणे / पालित्य

आणखी वाचा : सुंदर मी होणार- केसांचे सौंदर्य कसे राखाल?

पिंपल्सप्रमाणेच सध्या केस पांढरे होणे ही एक मोठी समस्या “झाली आहे. अगदी बारा – तेरा वर्षाच्या मुलामुलींमध्येही ही समस्या दिसत आहे.
महत्वाची कारणे

कमी वयामध्ये केस पिकणे हा एक प्रकार आहे, तर वयानुसार केस पांढरे होणे हा दुसरा प्रकार आहे.
लहान मुलांमध्ये केस पिकण्याची कारणे
१) जीवनसत्त्वांचा अभाव.
२) पुरेशी झोप नसणे.
३) अभ्यासाचा ताणतणाव
४) अपुरा व्यायाम
५) फास्ट फूड, जंक फूडचे अति सेवन
६) आहारात मैद्याच्या पदार्थांचा अति वापर यामुळे केस पांढरे होतात.

आणखी वाचा : सुंदर मी होणार – चेहरा उजळवण्यासाठी…

उपाय
१) रात्री ८ – १० तास पुरेशी झोप घेणे.
२) संतुलित आहार घेणे.
३) आहारात फळे, पालेभाज्या, डाळी यांचा समावेश करावा.
४) व्यायाम करणे, व्यायामामध्ये विशेषकरून शीर्षासन पद्मासन करावे.
५) मन शांत व आनंदी ठेवावे.
६) फास्ट फूडचे प्रमाण कमी करावे.
७) तसेच काही आयुर्वेदिक तेलांचे नाकात औषध टाकावे. (नस्य करावे.)
उदाहरणार्थ – पंचेद्रियवर्धन तेल, अणू तेल
८) तसेच वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधे पोटातूनही घेता येतात.
वरील उपायांनी अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात.

आणखी वाचा : पसंतीची वरात… साडी घ्या साडी!

मेहंदी

वयानुसार पांढरे झालेल्या केसांसाठी मेहंदी किंवा काही कृत्रिम उपाय करून केस काळे करता येतात.
नैसर्गिक मेहंदीने केसांना काळा रंग न येता लालसर रंग येतो. काळी मेहंदी किंवा ब्लॅक हिना यात हिना शब्द वापरल्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की ही मेहंदी सुरक्षित असते. परंतु या काळ्या मेहंदीमध्येही पीपीडी नावाचे रसायन असते. त्यामुळे अशी मेहंदीही टेस्ट केल्याशिवाय वापरू नये.
केसांना नैसर्गिक मेहंदी लावताना ती तयार करण्यासाटी दोन पद्धती आहेत.

आणखी वाचा : सुंदर मी होणार – काळजी तेलकट त्वचेची

पद्धत १
मेहंदी पावडर (३ भाग), माका पावडर (१ भाग) आवळा पावडर (१ भाग) जास्वंद पावडर (१ भाग) मण्डूर भस्म (१/८ भाग)
वरील सर्व द्रव्ये आवळ्याच्या काढ्यात भिजवून १२ तास ठेवावे व नंतर ती मेहंदी केसांना लावावी. तीन तासांनंतर केस कोमट पाण्याने धुवावेत.

पद्धत २

  • मेहंदी पावडर ( २ कप) + गरम पाणी (१ कप) व्हिनेगर (१ चमचा)
  • वरील मिश्रणाची पेस्ट १ तास भिजत ठेवावी.
  • नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून ते भांडे दुसऱ्या पाण्याच्या भांड्यात ठेवावे.
  • ही पेस्ट नंतर हलवून त्यातील पाण्याचे बुडबुडे मोकळे करून हे मिश्रण पुन्हा १ तास ठेववे.
  • नंतर ही पेस्ट मूळाकडून बाहेर लावत यावे.
  • ३ ते ४ तास ठेऊन केस नंतर धुवून टाकावेत.

v.valvankar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या