scorecardresearch

आरोग्य – ‘डिमेन्शिया’ग्रस्त व्यक्तींचे वागणे का बदलते?

‘डिमेन्शिया’ अर्थात अधिक करून वयस्कर व्यक्तींमध्ये दिसणारे गंभीर विस्मरण आणि त्याच्याशी निगडित इतर लक्षणे, याकडे २१ व्या शतकातील आव्हानात्मक आरोग्यप्रश्न म्हणून पाहिले जाते. हा आजार नीट समजून घेतल्यास त्याचा सामना करणे रुग्णांसाठी आणि त्यांच्या आप्तजनांसाठीही काहीसे सोपे होईल.

आरोग्य – ‘डिमेन्शिया’ग्रस्त व्यक्तींचे वागणे का बदलते?
विस्मरण होणाऱ्या व्यक्तींची कुटुंबियांनी विशेष काळजी घ्यावी.

मंगला जोगळेकर
डिमेन्शिया हा आजार रुग्णाची काळजी घेण्याच्या दृष्टिने काहीसा क्लिष्ट समजला जातो. परंतु रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय वा काळजीवाहक यांनी हा आजार, लक्षणांमागची कारणे आणि एकमेकांची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केल्यास काही गोष्टी सुकर होतात. म्हणूनच या आजाराबाबत काही उपयुक्त माहिती घेतल्यास त्याचा फायदा निश्चित होऊ शकेल.
डिमेन्शियामधील वर्तन समस्या कोणत्या?

आणखी वाचा : बीपी खूप वाढलंय…! मग आहार व जीवनशैलीत करा असे बदल

रुग्णाचे आप्तजन किंवा त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना रुग्णाचे वागणे बदलले आहे हे दिसते, पण त्यामागची कारणे त्यांना नीटशी माहीत नसतात. डिमेन्शियाच्या आजारात ‘वर्तन-समस्या’ हे एक मोठे आव्हान होऊन बसते. कित्येकांना आजाराची लक्षणे बदलत जाणाऱ्या वागणुकीतून दिसायला लागतात. जशी डिमेन्शियाची लक्षणे वाढत जातात तसे रुग्णाच्या वागण्यात बदल होताना दिसतात. हे बदल इतरांच्या समजापलीकडचे असू शकतात. रुग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी ते आव्हानात्मक ठरतात. प्रत्येक व्यक्तीमधील बदल वेगवेगळे, त्यांची तीव्रता, प्रमाण सगळेच वेगळे. या बदलांना तोंड देताना त्याच्या पाठीमागील कारणे समजून घेतल्यास आपली त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. कारणे समजून घेण्याचा प्रयत्न रुग्ण आणि काळजीवाहक दोघांसाठी महत्त्वाचा ठरतो.

आणखी वाचा : ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार

आपल्याला डिमेन्शिया झाला आहे याचे आकलन झाले नाही तरी आपल्या शरीराची घडी विस्कळीत झाली आहे याची उमज प्रत्येक रुग्णाला होते. त्यामुळे निराशा, चिंता, भीती, असुरक्षितता अशा भावना या व्यक्तीच्या मनात दाटून येतात. आजारामुळे आपली काय स्थिती होईल? या स्थितीचा कुटुंबियांवर काय परिणाम होईल? आपली काळजी घेतली जाईल का? आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत का? अशा चिंता त्यांना वाटतात. त्यांचे इतरांशी संबंध बदलत चालले आहेत असे त्यांना जाणवते. त्यांचे वेळ, काळाचे भान जाते. दिवस आहे की रात्र असे प्रश्न पडतात, रस्ते समजत नाहीत, साधी कामे जमत नाहीत, स्वतःवरचा विश्वास कमी होतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो. स्वतःवरचा राग इतरांवर निघू शकतो. आपल्याशी योग्य संवाद होत नाही असे वाटते. स्वतःच्या आवडीची कामे करायला जमत नाहीत. वागण्यातील बदलांमध्ये खालील गोष्टींचाही समावेश असू शकतो- तेच तेच बोलणे, तेच प्रश्न विचारणे, गोष्टी हरवणे, लपवणे, संशय घेणे, भास होणे, इतरांशी कसे बोलावे, वागावे, यावर काही बंधन नसणे, अती खाणे, काहीही करावेसे न वाटणे, भरकटणे, चिडचिड, आक्रस्ताळेपणा, आक्रमकता, अस्वस्थता, झोप न लागणे किंवा अती झोप इत्यादी.

आणखी वाचा : तोल सांभाळण्यास शिकवणारे आसन

डिमेन्शिया रुग्णाची काळजी घेण्याची उद्दिष्टे-
या परिस्थितीतून जाताना आपले उद्दिष्ट काय हवे याची जाणीव असल्यास आपला प्रवास योग्य मार्गाने होतो.

  • आजारी व्यक्तीला राहाण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ ठिकाण देणे, जिथे त्याच्या सर्व गरजांकडे लक्ष देता येईल तसेच त्याच्या क्षमतांप्रमाणे त्याचे स्वावलंबन जपता येईल आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी/ टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल
  • आजारी व्यक्तीची काळजी घेताना कुटुंबीय ताण-तणावांची पातळी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतील. आपले आरोग्य जपतील आणि रुग्णाची जबाबदारी घेता घेता आपल्यावरच्या इतर जबाबदाऱ्या देखील पार पाडतील.
    कोणताही आजार समजून घेणे आणि रुग्णाची काळजी घेताना आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे डोक्यात ठेवणे आवश्यक ठरते. हे केल्यास डिमेन्शियासारख्या आजारांमध्ये आपण काळजीवाहकाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकू आणि रुग्णाचे आयुष्य अधिक सोपे करू शकू.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या