scorecardresearch

Navratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप

नवरात्र म्हणजे स्त्रिया आणि मुलींना नटण्याचं छान निमित्त. नवरात्रीत नवीन कपडे घालून तयार होताना, तसंच गरबा-दांडिया खेळायला जाताना मेकअप कसा असावा, ते जाणून घेऊ या…

Navratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप
नवरात्री मेकअप

वैष्णवी देशपांडे

नवरात्रीचे नऊ दिवस अनेक स्त्रिया कपड्यांमध्येही नवरंग ‘फॉलो’ करत आहेत. आता मोठ्या शहरांत ठिकठिकाणी गरबा-दांडियाचे मोठमोठे कार्यक्रम रंगू लागले आहेत. ‘ए हालो’च्या आरोळ्या आणि दांडियाची विशिष्ट ताल असलेली गाणीही ऐकू येऊ लागली आहेत. तरूण मंडळींची अशा कार्यक्रमांना विशेष हजेरी असते. मित्रमैत्रिणींच्या घोळक्यांनी मिळून, मस्त नटूनथटून, पारंपरिक पोशाख आणि दागिने घालून दांडिया खेळायला जाणं म्हणजे मजाच. त्यातही स्त्रियांच्या पेहरावांमध्ये, दागिने आणि मेकअपमध्ये वैविध्य अधिक. गरबा-दांडिया खेळायला जाताना आणि एकूणच नवरात्रीत नटताना मेकअप कसा करता येईल हे आज जाणून घेऊ या.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

दिवसा करायचा मेकअप

१. पाण्यानं किंवा फेस वॉश वापरून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
२. नॅपकिननं चेहरा व्यवस्थित टिपून प्रथम मॉइश्चरायझर लावा आणि २ मिनिटं व्यवस्थित मसाज करून ते त्वचेमध्ये मुरवून घ्या.
३. यानंतर आपल्या त्वचेच्या रंगानुसार फाउंडेशन हलकेच लावून चेहऱ्यावर नीट ‘ब्लेंड’ करा. फाऊंडेशन फार सफेद वापरू नये, तसं केल्यास मेकअप ‘ग्रे’ दिसू शकतो.
४. फाउंडेशन सुकल्यानंतर ते फिक्स करण्यासाठी हलकेच पावडर लावा. फाउंडेशन ओलं असताना पावडर लावली, तर मेकअप केकी किंवा सफेद दिसतो, त्यामुळे हे टाळावं. कपाळ, नाक, ओठांभोवती आणि हनुवटीवर पावडर व्यवस्थित लावावी, म्हणजे या जागी तेलकट झालं तरी ते लवकर दिसून येणार नाही.

५. डोळ्यांच्या मेकअपसाठी रंग कुठले वापरावे, हे ठरवताना आपण विरुद्ध रंग वापरू शकतो. रंगचक्र पाहिलंत तर विरुद्ध रंग कोणते ते लगेच समजेल. उदा. हिरव्या रंगाचा ड्रेस घालणार असाल तर त्याच्या विरुद्ध- म्हणजे केशरी रंगाचं आय शॅडो करू शकता. फार गडद रंग न वापरता दिवसा सौम्य मेकअप करावा. एखाद्या विशिष्ट रंगाचं आय शॅडो तुमच्याकडे नसेल, तर ब्राऊन रंग कुठल्याही ड्रेसवर उठून दिसतो.
६. आयलायनर, काजळ, मस्कारा लावून आपला आय मेकअप पूर्ण करा.
७. भुवयांसाठी काळी पेन्सिल वापरू नये. ब्राऊन रंग वापरावा, तो अधिक नैसर्गिक दिसतो.
८. ब्लश आवडत असेल तर तेही आपण लावू शकता. पण शक्यतो पीच रंगाचं ब्लशर वापरावं.
९. दिवसा नैसर्गिक रंगाची लिपस्टिक- म्हणजे पीच, गुलाबी, न्यूड रंग इत्यादी वापरावं, म्हणजे मेकअप फार गडद दिसणार नाही.

आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

गरबा-दांडियासाठी ‘ग्लॅमरस आय मेकअप’

१. आधी डोळ्यांवर काळं किंवा ब्राऊन रंगाचं काजळ लावून घ्यावं.
२. ते नीट पसरवून घेण्यासाठी ब्राऊन रंगाचा वापर करून नीट ब्लेंड करावं.
३. काजळ लावलेल्या भागावर आपण आपल्या आवडीनुसार काळा, चॉकलेटी, हिरवा, निळा, जांभळा अशा कोणत्याही रंगांचं आय शॅडो (पावडर स्वरूपातलं) लावून व्यवस्थित ब्लेंड करुन घ्या.
अशा प्रकारे आपला सोपा, लवकर होणारा आणि सुंदर दिसणारा ‘स्मोकी आईज’ मेकअप तयार!

ही टिप लक्षात ठेवा –
‘आय मेकअप’ सौम्य केला, तर लिपस्टिक गडद लावता येते आणि आय मेकअप गडद केला तर लिपस्टिक सौम्य ठेवावी, म्हणजे लूक उठून दिसेल.

आणखी वाचा : नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व का दिले जाते?

चला तर मग, आता वाट पाहू नका. आपल्याला असा मेकअप करायला जमेल का, ही शंकाही नको! थोड्या सरावानं तुम्हाला हा मेकअप नक्की जमेल आणि तुम्हालाही त्यात आणखी काहीतरी चांगली भर घालणं सुचेल. मग छान मेकअप करुन नटा, सजा आणि मस्त फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठीही तयार व्हा!

(लेखिका मेकअप क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
vaishnevideshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या