scorecardresearch

शनिवारची मुलाखत : ‘अंगूरी भाभी’चे आभार- अभिनेत्री शुभांगी अत्रे

“अभिनयाची अजिबात पार्श्वभूमी नसणाऱ्या, मध्यप्रदेशमधून करिअर करायला आलेल्या मला लोकांच्या घराघरांत प्रवेश मिळाला आहे. ‘माझ्या सही पकडे है ना।’ या वाक्याला तर लोकांनी डोक्यावर घेतले आहे. माझं आयुष्य या अंगूरी भाभीने बदलूनच टाकलं आहे.”

Anguri Bhabhi, Bhabhiji gharpar hai
अभिनेत्री शुभांगी अत्रे

एका प्रसिद्ध राजकीय नेत्याने थेट मंचावर जनतेसमोर बोलताना प्रतिस्पर्धी पक्षाची बिंगं उघड करताना अगदी सहजच म्हटलं, ‘क्यों… सही पकडे है नं.’ हल्लीच कॉमन झालेलं, पण नेमका वेळ साधलेलं हे वाक्य नेमक्या जागेवर वापरल्याने एकच हशा पसरला. मग, जमलेला समुदायच म्हणून गेला, ‘हां ! सही पकडे है!’ एकूणच काय, ‘सही पकडे है!’ या तीन शब्दांना विलक्षण लोकप्रियता मिळवून ज्याच्या त्याच्या ओठी हे शब्द रुळवण्यामागे ‘भाभी जी घर पर है’ मालिकेचे लेखक मनोज संतोषी आहेत, या मालिकेच्या दिग्दर्शका हर्षदा पाठक आहेत, पण सर्वाधिक श्रेय लाभलं ते मला. ‘सोनी सब’ मालिकेतील सर्वाधिक पॉप्युलर व्यक्तिरेखा म्हणजे अंगूरी भाभी !

आणखी वाचा : आहारवेद : वजन नियंत्रणात ठेवणारे घोसाळे

अंगूरी भाभी तिवारी जेंव्हा लाडिकपणे ‘सही पकडे है’ म्हणते तेंव्हा तिच्या अदांनी, मधाळ सूराने हजारो स्त्री पुरुष प्रेक्षक तिचे फॅन झाल्याशिवाय राहत नाहीत! ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने हल्लीच २००० एपिसोड्स पूर्ण केलेत. स्वतःला मी अतिशय भाग्यवान समजते, एका आधीच लोकप्रिय असलेल्या मालिकेत अंगूरी भाभीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा मला साकारता आली, विशेष म्हणजे माझ्याही अंगूरी भाभीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. हा अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी. माझ्याआधी अंगूरी भाभीची भूमिका शिल्पा शिंदे या मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली होती आणि लोकप्रिय केली होती. शिल्पा शिंदेची ‘रिप्लेसमेंट’ म्हणून अंगूरी भाभीची भूमिका माझ्याकडे आली. अंगूरी भाभीच्या तोडीस तोड अशी शिल्पाची रिप्लेसमेंट मी कधी होऊ शकणार नाही, असं वाटत होतं, म्हणून मला जमणार नाही, असं ‘चॅनल’ला सांगितलं, पण मी शिल्पा शिंदेंशी होणाऱ्या तुलनेला घाबरतेय, असं त्यांना जाणवलं आणि मग या मालिकेशी संबंधित सगळ्या सिनियर्सनी विशेषतः निर्माते,दिग्दर्शक,लेखक या सगळ्यांनी माझी शाळा घेतली ! सांगितलं, ‘शुभांगी, तुम अंगूरी सिर्फ ‘कन्व्हिक्शन ‘ और ‘कॉन्फिडन्स ‘के साथ निभाना, अँड एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस’, माझ्यापेक्षा इतरांना माझ्याबद्दल विश्वास वाटत होता. त्यामुळे मी होकार दिला. अंगूरी भाभी ‘रिलेटेबल’ वाटावी, म्हणून मी चक्क राबडीदेवी यांना ‘ऑब्झर्व्ह’ केलं, त्यांचे व्हिडिओज् पाहिले, त्या कशा बोलीभाषेत सहज संवाद साधतात, कुटुंबाशी कसं बोलतात याचं निरीक्षण केलं. माझी आई , स्वयंपाक करताना गाणी गुणगुणत असते, ते मी पाहिलंय. ती जेव्हा वडिलांशी बोलत असते, त्यांच्याबरोबर जगते तेव्हा तिचं अस्तित्व वडिलांच्या अस्तित्वात इतकं समरूप झालेलं जाणवतं, की वडिलांचे आणि तिचे विचार एकच असावेत असं मला नेहमी वाटतं. हे सगळं मी माझ्यात उतरवत गेले. उत्तरप्रदेश, बिहार,मध्यप्रदेश येथील सर्वसामान्य गृहिणी ते अगदी माझी आई या सगळ्यांना समोर ठेवून, सगळ्यांचं बेमालूम मिश्रण करून मी अंगूरी भाभी साकारली.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग फुलवणारा पालापाचोळा

मालिकेने २००० भागांचा टप्पा पार केला याचा आनंद खूप होतोय, पण फिल्म असो वा टीव्ही शो , त्याच्या यशाचे श्रेय निर्माता, दिग्दर्शक, कलाकार ते बॅक स्टेज, स्पॉटबॉय प्रत्येकाला जातं, त्यामुळे अंगूरी भाभी आणि ‘भाभीजी घर पर है’ या अफाट लोकप्रिय मालिकेचं श्रेय माझ्या एकटीचं नाही. मला अभिनयाच्या क्षेत्रात येऊन १७ वर्ष झालीत. मी या दरम्यान अनेक ‘सास -बहू’ मालिका पाहिल्यात. अशा बहुतेक मालिकांमध्ये सासू -सुनांचं एकमेकींशी पटत नाही, एखादी दुखभरी कहानी मालिकेत चालू राहते, पण ही मी करत असलेली मालिका रडवत नाही तर हसवते, हे त्याचं मोठं वैशिष्टय. यातील अंगूरीची सासू सुनेला म्हणजे मला सल्ला देते, अफेयर करने में कोई हर्ज नहीं है, आता बोला ! अशा वेगळ्या अँगल्समुळे माझी व्यक्तिरेखा, ही मालिका छोट्या पडद्यावरचा ‘गेम चेंजर’ ठरली आहे. अंगूरी भाभीचे चाहते खूप आहेत, म्हटलं तर ही अडल्ट कॉमेडी आहे, पण द्विअर्थी संवाद यात नाहीत ना अंगविक्षेप ना कसली अश्लीलता! त्यामुळे कौटुंबिक मनोरंजनासाठी ही मालिका मोठया संख्येने पाहिली जाते.

आणखी वाचा : लग्नानंतर वर्षभरातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर “तूच पांढऱ्या पायाची” म्हणणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती की…

माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आम्ही मध्यप्रदेशातील ‘पंचमढी’ येथे आम्ही राहत असू. आम्ही तिघी बहिणीच. आईवडिलांनी तिघींना उत्तम शिक्षण दिलं, चांगले संस्कार तर होतेच. मला कथ्थक शिकण्याची आवड होती, त्यालाही दोघांनी प्रोत्साहन दिलं. १२ वर्षे मी कथ्थक शिकले, परफॉर्म केलं. ब्राह्मण कुटुंबातली मी, त्यातही एमबीए शिक्षण घेतलेली. आपल्या मुलीने अभिनयात जावं हा कुटुंबासाठी तसा धक्का होता. पण, अभिनयात जायचंच या हट्टाने मी आईला घेऊन मुंबईत पोचले. मी ‘बालाजी टेलीफिल्म्स’मध्ये ऑडिशन दिल्या आणि ‘कहीं किसी रोज’ या मालिकेत माझी वर्णी लागली. नंतर ‘कस्तुरी’ मालिकेत मला टायटल रोल मिळाला. नंतर मिळाली, ‘दो हंसो का जोडा’ मालिका. माझ्या अभिनयाची गाडी अशी धावतच राहिली आणि या प्रवासात आलेल्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या स्टेशनने अफाट लोकप्रियता मिळाली.
अभिनयाची पार्श्वभूमी नसताना मी टिकले, काम मिळत राहिले हे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद! पुढे देखील वैविध्यपूर्ण भूमिका मला मिळाव्यात अशी इच्छा आहे .
अंगूरीने माझं करियर आणि जीवन दोन्ही बदललं, एवढं मात्र खरं!
samant.pooja@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 08:30 IST

संबंधित बातम्या