सुचित्रा प्रभुणे

बाईक चालवित सोलो ट्रीप करणं या स्वप्नाची भुरळ भारतातील अनेक तरुणींना पडते. परंतु एखाद्या पाकिस्तानी तरुणीला असं वाटणं आणि तिने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. हे अनोखं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीचं नाव आहे झेनिथ इरफान. हिच्या या स्वप्नाची कहाणीदेखील तितकीच रंजक आहे.

पाकिस्तान येथील लाहोर शहरात झेनिथ आपल्या आई आणि भावासह राहते. तिचे वडील सैन्यात होते. वयाच्या ३४व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाला, त्यावेळी हे कुटुंब शारजा येथे राहत होतं. असेच एके दिवशी लहानपणीचे फोटो पाहत असताना युनिफार्ममध्ये एका बाईकजवळ उभे असलेला वडिलांचा एक भारदस्त फोटो तिच्या पाहण्यात आला. तो फोटो पाहून आईनं सांगितलं की, बाईकवर बसून जग प्रवास करायचा हे त्यांचं स्वप्न होतं. पण कामात ते इतके व्यस्त होते की, हे त्यांचं हे स्वप्न अधुरेच राहिलं. वडिलांचं अपुरं राहिलेलं हे स्वप्न तू पूर्ण कर, असं आई सहजपणे झेनिथला बोलून गेली. गमंत म्हणजे ,झेनिथनंदेखील हे स्वप्न आपण पूर्ण करायचं असं पक्कं केलं.

आणखी वाचा-“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!

अवघी बारा वर्षांची असताना तिनं आपल्या मोठ्या भावाकडे बाईक चालवायचे धडे घेण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही काळातच ती उत्तम बाईक चालवायला लागली. पुढे काही कारणानिमित्त शारजात वसलेलं हे कुटुंब लाहोर येथं स्थायिक झालं.खरं तर लाहोरला आल्यावर, येथील पारंपरिक वातावरणाशी जुळवून घेताना तिला सुरुवातीला थोडाफार त्रास झाला. पण तिनं आपलं स्वप्न सोडलं नाही. लाहोरमधील वातावरण जरी सनातनी असलं तरीही इथे एकप्रकारची अध्यात्मिक शक्ती आहे, जी नेहमी मला मी योग्य मार्गावर असल्याची खात्री देत असते, असं मत तिनं आपल्या एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

बाईक चालविण्याचा पूर्ण आत्मविश्वास आल्यानंतर झेनिथनं आपल्या सोलो प्रवासाला सुरुवात केली. आणि पाहता पाहता तिनं उत्तर पाकिस्तानातील सुमारे ५५,००० किमीचा टप्पा अगदी सहजतेनं पार केला. दऱ्या-खोऱ्यामधील अवघड वळणातून वाट काढत, मुसळधार पावसाचे पाणी झेलत तर कधी उन्हाचे तडाखे सहन करीत झेनिथने आपला प्रवास सुरू ठेवला. बाईकवरून प्रवास करताना नेहमी आपले बाबा आपल्या सोबत असतात, असं तिला वाटत असतं. बाईक चालविण्यापेक्षा आपण आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतोय, ही भावनाच खूप भारी आहे असं ती म्हणते.

आणखी वाचा-फोन केला बंद अन् सोशल मीडिया केलं डिलीट; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या IAS परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी झेनिथ ही पाकिस्तानसाठी ‘वंडर गर्ल’ ठरली असून पूर्ण देशात तिच्या या प्रवासाचं कौतुक केलं जातंय. इतकंच नाही तर तिच्या या अनोख्या स्वप्नपूर्तीची दखल घेणारा ‘मोटरसायकल गर्ल’ नावाचा चित्रपटदेखील २०१८ मध्ये काढण्यात आला. आपल्या प्रवासात येणाऱ्या अनेक अनुभवांचे चित्रण तिनं वेळोवेळी सोशल मिडीयावरून प्रसारित केलं आहे. अशाच एका प्रवासाच्या वेळी तिच्याच वयाच्या एका तरुणीला बाईकवर बसवून गावापर्यंत लिफ्ट देत असताना, झेनिथनं त्या तरुणीला विचारले की, तुला आवडेल का बाईक शिकायला? त्यावर ती तरुणी म्हणाली, ‘‘माझं लग्न झालं असून या अशा गोष्टींसाठी माझा नवरा आणि माझे सासरे कधीच परवानगी देणार नाहीत.’’

हे ऐकल्यावर झेनिथ म्हणते, ‘‘मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. मला माझं स्वप्न पूर्ण करण्याचा आणि ते जगण्याची संधी मिळाली. दरवेळेचा प्रवास हा मला आयुष्याकडे नवीन नजरेनं पाहायला शिकवितो. आणि त्या त्या प्रत्येक वेळी मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते.”

झेनिथची कहाणी फक्त पाकिस्तानी तरुणींनाच प्रेरणा देणारी नाही, तर जगभरातल्या प्रत्येक माणसांसाठी प्रेरणा देणारी आहे. स्वप्नं पाहा, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती मेहनत जरूर घ्या, मग त्या स्वप्नांवर स्वार होऊन जगत असताना वाटेत येणाऱ्या काट्यांची फुलेच होतील, असा नकळतपणे ती संदेश देऊन जाते.