scorecardresearch

Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

पत्रास कारण की… चित्राताई वाघ उर्फी जावेदनंतर आता गौतमी पाटील यांच्याकडे केव्हा वळणार?

Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?
उर्फी जावेद चित्रा वाघ विवाद

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ,

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही फार आक्रमकतेने चित्रविचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदचा विषय लावून धरला आहे. तिच्या अटकेची मागणीदेखील तुम्ही केली आहे. तुमची मागणी ऐकल्यानंतर खरं सांगू तर एक महिला म्हणून फारच छान वाटलं. तुम्ही उचलेला हा मुद्दा खरंतर गंभीर आहे, याचे महत्त्वही पटलं. पण तरीही तुम्हाला पत्र लिहिण्याची हिंमत करतेय. काही दिवसांपूर्वी चित्राताई तुम्ही उर्फीबद्दल एक ट्वीट केले होते. “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतीच्या शिकार होताहेत. तर ही बया आणखी विकृती पसरवत आहे असे तुम्ही यात म्हटले होते. त्यानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पत्रही दिलंत. पण उर्फी जावेद हा विषय काढून तुम्ही राजकीय पोळी तर शेकत नाही ना? असा प्रश्न सहज मनात येऊन गेला आणि त्यामुळेच पत्र लिहिण्याचे धाडस केलं

उर्फी जावेद ही बया साधारण गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रस्त्यावर चित्रविचित्र कपडे घालून फिरतेय. खरे तर कोणी, कोणते कपडे घालायचे हे ठरविण्याचा अधिकार त्या त्या व्यक्तीला आहे, ते स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने दिलेलाच आहे. पण ते कपडे कसे असावे, कसे नाही याचा विचार तिने निश्चितच करायला हवा. कारण अनेकदा ती कपड्यांच्या नावाखाली जे काही करते, त्याला कपडे तरी म्हणावे का, हाही प्रश्नच आहे. परंतु काल परवा तुम्ही एक ट्वीट केले आणि हा विषय अगदी ज्वलंत झाला. पण गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर विचित्र कपडे घालून फिरणाऱ्या उर्फी जावेदवर कारवाई व्हावी, तिला अटक केली जावी ही मागणी तुम्ही यापूर्वी का केली नाही? तिला काहीतरी अद्दल घडवावी असे तुम्हाला तेव्हाच का वाटले नाही?

चित्राताई, तुम्ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असता. तुमचे ट्वीट, तुम्ही मांडलेल्या विषयांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण अचानक उर्फी जावेद हा विषय काढण्यामागचे नेमकं कारण काय, हेच अद्याप समजलेले नाही. उर्फी जावेद असे अर्धनग्न कपडे परिधान करते, हे तुम्ही निश्चितच आज पाहिलं नसेल. मग जेव्हा कधी तुम्ही तिचा पहिला व्हिडीओ, फोटो पाहिलात तेव्हाच तुम्ही तिच्या अटकेची मागणी का केली नाही? त्यावेळी तुम्ही गप्प का बसलात? मग आता तुमच्याकडे राजकीय विषय नाहीत, बोलण्यासाठी काहीही नाही म्हणून चर्चेत राहण्यासाठी तुम्ही उर्फी जावेदला खेचून आणलात का?

मी उर्फी जावेदचे अजिबात समर्थन करत नाही. तिचे कपडे, बोल्ड अंदाज याची मलाही तितकीच चीड आहे जितकी तुम्हाला आहे. पण तुम्ही अचानक तिच्या अटकेबद्दल केलेली मागणी अजिबात रुचलेली नाही. तुम्ही उर्फीचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर लाखो लोक तिला फॉलो करतात. कधी तरी तुमच्याही सोशल मीडिया पेजवर तिचा एखादा अश्लील व्हिडीओ आलाच असेल की? मग त्याचवेळी तुम्हाला तिच्यावर आक्षेप घ्यावा असे का वाटले नाही?

चित्राताई, फक्त उर्फी जावेदच नव्हे तर लावणी नृत्य करणारी गौतमी पाटील, अभिनेत्री पूनम पांडे, अंजली अरोरा या देखील अशाचप्रकारे चित्रविचित्र कपडे परिधान करत असतात. अंगविक्षेप करुन अश्लील डान्स करत असतात. यांचे व्हिडीओही व्हायरल होतात. मग यांच्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही यांच्यावरही कारवाई करणार आहात का?

चित्राताई, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतच राहता आणि ती उर्फी जावेद असे कपडे घालून मुंबईतच फिरत असते. मग तुम्ही तेव्हाच तिला अडवण्याची हिंमत का केली नाही? अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, त्यांचे कॅमेरामॅन तिचे फोटो काढतात, व्हिडीओ पोस्ट करतात. उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून कित्येकदा तर आम्हालाही लाज वाटते. तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असूनही गेल्या दोन वर्षांपासून उर्फी जावेदबद्दल कोणीही तक्रार का केली नाही?

असो… चित्रा ताई त्या बयेमुळे मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पुढची पिढी चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. फक्त उर्फी जावेदच नव्हे तर इतर ज्या कोणी महिला अशाप्रकारचे प्रसिद्धीसाठीचे स्टंट करतात त्या सर्वांना तुम्ही धडा शिकवायला हवा. तुम्ही उचलेल्या या कठोर पावलाचे एक महिला म्हणून मला तरी निश्चित कौतुक आहे. तुम्ही उर्फी जावेद हा विषय अगदी पूर्णत्वास न्यावा अशी माझी तरी इच्छा आहे. परंतु काही काळाने हा विषयही एखाद्या सरकारी फाईलसारखा धुळखात कोपऱ्यात पडू नये, हीच माझी अपेक्षा.

तुमची कृपाभिषाली

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या